पृष्ठे

स्वगत रामायण लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
स्वगत रामायण लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

मंगळवार, २४ जानेवारी, २०१२

प्राणभेदी वरदान

माणसाला खरं सुख दु:खाच्या जाणीवेत, सुखशोधाच्या अस्वस्थतेत मिळत असावं. म्हणजे दु:ख ते सुख म्हणून स्वीकारतानाच त्याचा नकार दाखवत रहायचं. असल्याच्या आनंदापेक्षा नसल्याच्या टोचणीमागे धावायचं.कुठून कुठपर्यंत न कळत. 

सगळ्यांसारखं माझं हे असं होतं असतं. जगान्त पराक्रम व त्यामुळं नाव हे असं खूप मोठं - दशरथ, महाराज दशरथ ! आजवरचा, त्रिभुवनातला, देवेन्द्रालाही मदत करणारा सर्वश्रेष्ठ योद्धा दशरथ ! सारी सुखं, सौंदर्यसुंदरीच्या रूपानं हात जोडून समोर उभी असताना मी असा गर्दगडद अंधाऱ्या रात्री एका जुनाट मचाणावर दगडी पुतळ्याच्या स्तब्धतेनं, जंगली चिरटाच्या चाव्यांनी बेजार होत, स्मशानातल्या वेताळासारखा स्वत:ला टांगून घेतल्यासारखा उभी रात्र घालवतोय कसल्या सुखाच्या प्रतीक्षेत ? माझं मलाच समजेनासं झालयं.

या भवभ्रमाच्या भोवऱ्यातही माझ्यातला शिकारी दक्ष आहे. पाऊस पडून गेल्यानं पानावरून गळत्या टीपटीपीनं नेमक्या आवाजाचा कानोसा घेणं कठीण झालंय पण त्या ताणानंच मी दुसऱ्या कुठल्या तरी टोचणीला विसरू शकत होतो. किमान तसा भास तरी निर्माण करून स्वत:ची फसवणूक करत होतो. पण त्या शिकाऱ्याला सतत ढुसण्या देणारे राजेपण, माणूसपण काही स्वस्थता मिळू देत नव्हते. उतार वयाची चाहूल लागलीय अन् तीन महाराण्या [अधिक बाकीचे ..... महाल] असूनही न मिळालेलं बापपण आणि एवढ्या पराक्रमी राज्याच्या उत्तराधिकाराचा प्रश्न एकाच वेळी भावनिक गुंतागुंत व राजकीय अस्वस्थता वाढवत आहेत.

राजाशिवाय राज्य म्हणजे वृक्षाशिवाय वेली असण्याचा असा माझा काळ अन् काळाच्या जबाबदाऱ्या. या जबाबदाऱ्याही मोठ्या खट्याळ असतात त्या मजबूत खांद्याचाच आधार शोधत फिरत असतात. एका वारुळातल्या अगणित मुंग्याप्रमाणेच जबाबदाऱ्याही मजबूत खांद्यावर दाटीवाटीनं लगडलेल्या असतात. मजबूत खांद्यावर जर जबाबदारी पार पाडण्यासाठीचं भान असणारं डोकं असलं तर मग झालंच !

 " बुडबुड बुडबुड" "सूंम्म्म्म्म्म्म्म्म खच् क" " आई गग्ग्ग्ग्ग्ग" क्रिया प्रतिक्रिया व प्रतिक्रियेवरची प्रतिक्रिया काही कळलंच नाही. शब्दभेदी धनुर्विद्येचा मी जागतिक धनुर्धर माझ्याच विचारात गुंगलो असताना पाणवठ्यावर बुडबुड असा आवाज ऐकताच माझ्या प्रतिक्षिप्त क्रिया संचालक यंत्रणेनं सरावानं बाण सोडला व  आई गग्ग्ग्ग्ग्ग ची कळ उठवून गेला. क्षणात मी उडी मारून आवाजाच्या दिशेनं धावलो. एक तरुण कळवळत होता. माझं क्षमापुराण मधेच थांबवून त्यानं म्हटलं," राजन, इथे जवळच एका पडक्या शिवमंदिरात माझे वृद्ध आई-बाप तहानेनं व्याकूळ होवून माझी वाट पहात आहेत. त्यांना एवढं पाणी द्या लवकर. अन् राजा आहे म्हणता तर त्यांची पुत्राप्रमाणे काळजी घ्या." कणभर चमकलेल्या विजेनं त्याच्या डोळ्यातली अपार वेदना अन् त्या निष्प्राण देहस्पर्शानं आलेली चेतनेची बधिरता कर्तव्यकर्माच्या भावनेनं गतिमान झाली. 

" बाळा, बोलत का नाहीस ?" चाहूल लागूनही भयाण शांतता त्या वृद्ध दंपतीस असह्य होवून बोलती झाली. मी हळूच पाण्याचं भांडं सरकवलं. " रागावलास ना ! रागव बेटा, जरूर रागव. तुझ्यासारख्या लक्षगुणी पोरानं तरी दुसऱ्या कोणावर रागवावं रे ! " आईबाप लागोपाठ बोलत होते. जणू एकच  महान कलाकार स्त्री-पुरुषाच्या वेगवेगळ्या आवाजात बोलत असावा.

 " आज आता तुला सांगितलंच पाहिजे सारं. दारिद्र्याच्या असह्य उन्हात पोळून निघताना घरावर गोकुळसुख छाया आयुष्याची संध्याकाळ होत आली तरी उगवलीच नाही बघ. कोणा एका तापसावर विश्वास ठेवून या निबिड अरण्यात आलो त्या भोळ्या शंकरावर पुत्रफळाच्या आशेने कठोर तपाची संततधार धरण्यासाठी. इथे जवळच एक पाणवठा आहे बघ. तिथूनच पाणी आणतोस ना तू तोच ! अन् शेजारचं तेच मचाण. श्वापदांपासून जीवंत राहण्यासाठी बांधलेलं. आता तितकं मजबूत आहे की नाही कुणास ठावूक. पण तेव्हा तरी मोठ्या प्रयासानं उभारलं होतं खरं. पुत्र झाला तर दर श्रावणातले सोमवार अभिषेक करायला इथंच येवू असा नवस करूनच येथेच कंदमुळे खात राहिलो बघ. हा वनवास स्वत:हून पत्करला होता. अपत्यप्राप्तीची आशा अपत्यप्राप्तीच्या वाटेतल्या साऱ्या दु:खांना सहन करायला लावते बघ."    

 "असा घुमा राहू नकोस रे राजा ! " मी दचकलो. मी गप्पच राहिलो. बोलणार तरी काय अन् कसे ? पण ते दोघं बोलतच राहिले. खूप वर्षांपासून साठलेलं गुज ते वृद्ध मायबाप आपल्या प्रियपुत्रापाशी उकलत होते. " बऱ्याच उशिरा, बऱ्याच आशेनं जन्मलेला तू आमच्या प्राणांचं बहिश्च रूपचं होतास. नवसाच्या नावाखाली आम्ही आमचं प्रेम - जे खरोखर दुरावण्याच्या भीतीचं निव्वळ दिखावू रूप होतं - तुझ्यावर थोपत राहिलो ज्यानं तुझ्या गुरुगृही जाण्याच्या इच्छांना बंदिस्त केलं. घरातचं तू बरंच काही शिकलास तरी ते पुरेसं कुठं होतं. हे कळूनही आम्ही मूक राहिलो.कारण थकलेले हातपाय, सुरकुतलेलं शरीर शारीर गरजांनाही थकवू शकत नाही ना ! श्रावणातल्या नवसाचा बाळ म्हणून श्रावण जो आपल्या सात्विक वृत्तीनं अकाली वृद्धत्वाने आपल्या वृद्ध आईबापांची मनोभावे सेवा करत आहे. जगानं हेवा करावा असं जगणं तू आम्हांला देतोयस. कळतंय आम्हांला एवढ्या रात्री पाणी आणणं किती कठीण आहे ते. एखादं श्वापद, कालसर्प टपून बसला असेल, पडल्या पावसानं बनवलेला गुडघाभर चिखल, उघड्या अंगाला बोचणारे चिरट अन् बोचरी थंडी किती अन् काय ! " ............... एक प्रदीर्घ उसासा जीवघेणी शांतता देवून गेला. 

 " एवढं सगळं कशासाठी तर तुझ्यासाठी दिल्या - घेतल्या आमच्या वचनासाठी. पण बाळा, आजचं हे शेवटचं बरं का ? आज तुला सोळावं लागलं. आपली ही तीर्थयात्रा आता थांबली हं ! आमची ही गात्रं आता खूप थकलीत रे ! कधीही हे  पिकलं पान आता गळून पडेल. पण तू असा बोलत का नाहीस. किती रागावशील बाळा ? बोल न रे !" चाचपडत्या हातानं भांडं लवंडलं अन् मला अंधारून आलं. भात्यातले सारे बाण खणखणत विखरून पडले.

 " कोण आहे ? कोण आहे तिथं ? बोल कोण आहे ? श्रावणा ! बाळा ! कुठं आहेस तू ?"  माझ्या कठोर खांद्यावर ती सुरकुतली पण मजबूत पकड रुतत होती. "आमचा बाळ कुठं आहे ? तू कोण आहेस ?"  "तुमचा .... तुमचा बाळ .... मी.... मी राजा ... " आयुष्यात पहिल्यांदा दशरथाची वाचा अडखळत होती. " मी राजा दशरथ शिकारीसाठी पाणवठ्यावर श्वापदांची वाट पहात होतो. इतक्यात तुमचा बाळ तेथे आला अन्  माझ्या शब्दभेदी बाणानं ......"

 " देवा ! " सारा आकांत नंतरच्या भयाण शांततेनं विस्फोटीत केला. इतकी असह्य तगमग त्या अंधुक उजेडात माझे प्राण कंठाशी आणत होती. "बाळा,बाळा" पुटपुटत म्हातारी प्राण बाहेर टाकण्यासाठी की आत धरून ठेवण्यासाठी सारं शरीर आखडत तगमगत, तडफडत होती. प्राणजात्या मुलाला दिलेल्या वचनाला जागूनही मी त्या वृद्ध मातापित्यांची पुत्राप्रमाणे काजळी घेऊ शकत नव्हतो. राजा म्हणून तर दूरच राहो.  

"मला क्षमा करा." माझा हात झिडकारत पत्नीच्या त्या निष्प्राण कुडीला कुरवाळत तो सुरकुतला आवाज शापवाणी बरसून गेला, " आमच्यासारखाच तूही राजा, असाच पुत्रवियोगानं तगमगत, तडफडत प्राण देशील ! " मस्तकावर वीज कोसळावी तसा अंतर्बाह्य हादरून गेलो मी. अन् म्हाताऱ्यानंही मान टाकली काही क्षणातच. तीन मृत्यू इतक्या लवकर, इतक्या जवळून माझ्याचमुळे. 

 पुढं काय केलं काय घडलं फारसं काही आठवतंच नाही. मृगया सुटली की सोडली कळलं नाही. राजकर्तव्य चालूच होती बोचणीच्या टोकावर. वसिष्ठांनी यज्ञ मांडला. बरंच समुपदेशन केलं. "शाप खरा व्हायला आधी पुत्र तर हवा. म्हणजे तो शाप नसून वरदान आहे राजन. दीर्घायुष्य व पुत्रप्राप्तीचा आशीर्वादच जणू ! "

 हळू हळू चित्तवृत्ती पालवल्या. मनवसंत पुन्हा बहरला. राम, लक्ष्मण, भरत अन् शत्रुघ्न तीन महालातले चार चंद्र माझ्या मनाला आपल्या बाललीलेनी रंजवू लागले. पण सल कायम होती. सुकुमार राम - लक्ष्मणाला विश्वामित्रासोबत धाडताना ती पुन्हा उफाळून वर आलीच. गुरुगृही जाण्याची परंपरा, जनमानस, मंत्रीगण,कैकयी, वसिष्ठ,विश्वामित्र, प्रत्यक्ष राम-लक्ष्मणाची इच्छा यामुळं मला मन आवरावं लागलं. तसा त्यांचा आश्रम जवळच होता. तरी मन खुरडतच होतं.


काळ जातच होता. जातच होता. अन् मन बेटं किंचित सुखावत होतं. पण ........... 

पण  आजची गोष्ट काही निराळीच होती. या राजकारणाच्या निमित्तानं ते प्राणभेदी वरदान आपली वेळ साधू पाहत होतं. राजाचं कर्तृत्त्व, कर्तव्य, प्रजेचा विकास व सुख-सुविधा यासाठी रामानं आकाशाला गवसणी घालणं गरजेचं होतं.त्याचं `रामपण` सिद्ध व्हायला दक्षिण-दक्षिणा मिळवायलाच हवी पण ती काळीजकातरी तगमग थांबत का नाही ? राजकारणातल्या नाटकातला मी एक नटसम्राटाची भूमिका वठवतोय की जीवनसंग्रामातला मी एक वठलेला बाप बनत चाललोय काही कळत नाही. हात पुन्हा पुन्हा छातीकडेच जातोय वाचा राम, राम याशिवाय कश्यातच रमत नाही. राजवैद्यांना नाडी, श्वास, डोळे, ऊर्ध्व लागत आहेत.

पण  माझे मलाच कळतंय की खरोखर प्राणच आता ऊर्ध्व लागले आहेत.
 

शनिवार, २६ नोव्हेंबर, २०११

अंताचा आरंभ !

बस अजून काही क्षण आणि हे घटिका पात्र भरेल अन् मग 'राम'राज्याबाहेर. अगदी अखेरचे. प्राणप्रिय राम चालला म्हणून प्रजा रडत आहे, अयोध्या सोबत यायचं आग्रह धरते आहे. नेहमीप्रमाणे. पण आज कशातच लक्ष लागत नाही. मन सारं सैरभैर झालंय. काय करावं काही कळत नाही. पुरोहितांचा मंत्रघोष कानांना बधीर करतोय. पर्जन्यराजाची कृपा की रामाच्या मागोमाग रामाचा सारा प्रभाव धुवून काढायची जणू लगबग सुरु झाली आहे. शरयूनंही आज नेहमीपेक्षा जास्तच अंग फुगवलं आहे. लक्ष्मण शरयुतच झेपावला असं कळलं होतं. हे पक्कं होतं की तो शरयू पार करून गेला नाही, जाणारही नाही. अन् सीता ? तीही आता परत येणार नाही.

कुठे जावं ? सीते पाठोपाठ की लक्ष्मणाच्या मागे ?

सीता. ती खरी भूमिकन्या होती. अरण्याचं तिला खूप आकर्षण. जन्मलीचं होती शेतात. झाडे, वेली, झरे, गुहा, खिंडी, वाटा, धबधबे, मूलकंद सारं सारं तिला आवडायचं. राजमहालापेक्षा तिला झोपडीत शांत झोप यायची. सारं आयुष्य नियतीनं तिला अरण्यावासाचंच वरदान दिलं.

अन् लक्ष्मण ? एक वेडा जोगी. रामावर जीवापाड प्रेम केलं त्यानं. का ? कुणास ठाऊक ! रामासाठी बापावर तलवार घेऊन धावणारा.लक्ष्मण. त्यालाच ह्या रामानं जायला सांगितलं. का ? तर वचन. रामवचन! सीतेला पाठवलं, लक्ष्मणाला पाठवलं, का ? तर रामवचन ! लोकापवाद ! अन् म्हणे रामराज्य. रामानं आयुष्यभर कुरतडत जगायचं, प्राणप्रियांना छळायचं, आयुष्यभराची भळभळती जखम द्यायची अन् घ्यायची का , कशासाठी ? तर रामराज्यासाठी ! मर्यादांच्या उत्तम पालनासाठी !!

का मिळाली ही चेतना 'राम' म्हणून जगण्याची ? का मिळालं हे 'रामपण' वानरांना ही आकर्षिणारं ?  का मिळाली ही 'जाण' राजेपणाची ? का मिळाले हे 'भान' समूह संघटनाचे  ? का मिळालं 'मोठेपण' ज्यानं राजसिंहासनाची जबाबदारी दिली ? का मिळालं ते 'सामर्थ्य' साक्षात विश्वमित्रांना साह्य करणारं ? का मोडलं गेलं परशुरामाचं ते शिवधनुष्य ज्यानं सीता मला मिळाली ? का मिळाली सीता मला आयुष्यभर सलवणारी ? का ? का ? का ?

मला तर हवा होता तो चंद्रमागता राम,  मला तर हवा होता तो दशरथश्वास  राम,  मला तर हवा होता तो गुरुसेवक राम,  मला तर हवा होता तो सीताभारीत राम,  मला तर हवा होता तो अरण्यसेवी राम ! असा 'राम' रामाला कधीच मिळाला नाही.

रामानं तेव्हाच 'राम' म्हणायला हवं होतं जेव्हा सीता तिच्या बागेला सजवत होती अन् राम गुरुपूजनासाठी त्याच बागेतील फुले तोडत होता. तिथेच आम्हां दोघांची पहिली भेट झाली. " ऋषीकुमार," तिच्या मंजुळ पण ठाम स्वरांनी माझी एकाग्रता भंग झाली. मी दचकलो. गुलाबाच्या काट्यांनी क्षमा केली नाही. रक्ताळ अंगठ्याला दाबून धरत मी वळलो. " ही माझी बाग आहे व आपण पूर्व परवानगी न घेता खुशाल फुले तोडत आहात." तिच्या धनुष्याकृती भुवया अधिकच वक्रावल्या होत्या. मी घायाळ. स्तब्ध. दोन क्षण आणि ती खुदकन हसली. " एवढं घाबरू नका ऋषीकुमार." तिनं वाकून जखम जोडीचा पाला तोडला, चिमटीत दाबून रस काढला व तो माझ्या  रक्ताळ अंगठ्यावर लावून माझा अंगठा दाबला. मी शहारलो तेव्हाच सीता नाम धन्य झालो !

........किंवा मग धनुष्याला प्रत्यंचा लावताना माझ्या कपाळावर फुगलेली शीर पाहून विवाह साजसज्जित, शृंगार सुंदरा सीता नजरेला नजर देत मंद स्मित करत होती. ते स्मित माझ्या दंड बाहुंना आव्हान देवून गेलं अन् क्षणांत ते मजबूत शिवधनुष्य कडाड कड आवाज करून दोन भागात भंगलं. खरा विश्वामित्र शिष्य शोभलो जेव्हा सीतेने स्वीकारोक्ती नजरेनं पापण्या झुकवल्या. इथे ही 'राम' म्हणाला हरकत नव्हती. दुसऱ्यांनी राम नावाचा जयघोष केला अन् मी नियतीच्या फेऱ्यात अडकलो.

........किंवा मग वल्कलधारित सीतेच्या हातची कंदमुळे ओठांची गोडी वाढवत असताना  लक्ष्मण रक्षित शरदाच्या रात्री श्वासांची उष्णता चंद्राला धुसर बनवत असताना .........

.........किंवा आश्रमहरिणी सुस्नात सीता धबधब्याच्या धारेपल्याड पद्मासनात ध्यानास बसायची तेव्हा त्या जलप्रपाताचं ते प्रचंड संगीत त्या स्वच्छ नितळ पाण्याच्या पडद्या आडच्या त्या प्राणप्रियेचं जे रूप मनावर कोरायचं तेव्हा तरी 'राम' म्हणायची वेळ नक्कीच होती किमान माझ्यासाठी तरी.

पण........

आयुष्यात एक सीता 'पण' जिंकला आणि आणि आयुष्यभर सारा 'राम' पणात हारत गेलो. 'राम' कळायला अजून किती वेळा राम व्हायला हवं ते काही उमगत नाही.

लव-कुशासह आम्हां भावंडाची सारे मुले - सुना व त्यांची दळे घटिका पात्रावर नजरा ठेवून आहेत. माझ्या पाठोपाठ सारे आपापल्या क्षेत्रास जातील. आमची मुलं म्हणजे आम्ही तर नव्हेत ना ! त्यांना पराक्रमासाठी दिशा वाटून दिल्या. लव-कुश राम-लक्ष्मण आहेत पण राहतीलच कशावरून ? नकोच ते. अश्वमेधाचे वारू नेहमीच केंद्रोत्सारी हवेत.

राजवस्त्रे उतरत होती. जगासाठी मी वानप्रस्थाला जात होतो पण मला माहित होतं मी आता वनात जाणार नाही. सीतेच्या भेटण्याची भीती नव्हती तरीही. मला माहितेय, 'राजा' रामावर कोणीही प्रेम करत नाही, केलं नाही. ना सीतेनं, ना लक्ष्मणानं, ना अगदी रामानंही. 'राजा' राम अगदी ....... अगदी एकटा होता, असतो, राहील. आज राजेपणाची सारी चिलखतं उतरवून निघालो होतो 'रामापार' !

   

सोमवार, २१ नोव्हेंबर, २०११

पुसती लक्ष्मणरेषा

सरत्या पावसाची भुरभूर तनामनाला भिजवत होती तरीही थंडावा काही मिळत नव्हता. नेहमीच्या गतीने जात होतो तरी पायातलं जडत्व मरणयातना देत होतं. पहाटतारा उगवण्यापुर्वी जायचं होतं दूर. खूप दूर. अनंतापार. माझी दत्तचित्त चेतना गेल्या काही रातींपासून प्रचंड अस्वस्थ झाली होती. आता असह्य झालं होतं. उर्मिलेला ते जाणवलं होतं पण तिनं काही विचारलं नाही. नेहमीप्रमाणे. आजची सांज एक गहन स्वस्थता देवून गेली. आता निर्णय पक्का झाला होता.

रामद्वारावरचा हा शेवटचा पहारा असणार होता. पहाऱ्यासाठी नेहमीच भांडणारा भरत आज कसा कोण जाणे एकदम तयार झाला. दुसरा प्रहर होईस्तोवर प्रकृती, नगर आणि राजकाज शांत झालं. नेहमीची शांतता असह्य होत होती. रामदादाचे डोळे माझ्या अस्तित्वानं अर्धोन्मिलीत झाले. अर्धा लक्ष्मण तेव्हांच मेला होता ज्यावेळी रामानं सीतेची लंकेत अग्निपरीक्षा घेतली होती. त्यावेळेपासून लक्ष्मणाचे ओठ अन् रामाचे डोळे परस्परांसाठी अर्धोन्मिलीत झाले.

नेहमीप्रमाणे  साष्टांग नमस्कार न करता मी गुडघे टेकून दोन्ही हात व कपाळ रामाच्या पायावर ठेवलं कारण आता निर्णय पक्का झाला होता. साष्टांग नमस्कार केला अन् पुन्हा त्या जुन्या रामप्रेमानं उसळी मारली तर ....  हा तर टाळायचाच होता. तरीही शेवटी डोळ्यांनी दगा दिलाच. अश्रूंच्या शरयूधारा रामचरणांना भिजवू लागल्या. पण नेहमीची लक्ष्मणवाणी खोल ह्रदयगर्भातून कपाळ टेकल्या वेदनेतून वर आली.

" दादा, आता आज्ञा द्यावी."  शेवटच्या हस्तस्पर्शानं शेवटची मागणी केली.

" तूही जाणार लक्ष्मणा  ? "  रामाच्या त्या दोन अश्रूंनी धनुष्य ठेवून राकट झालेल्या माझ्या खांद्यांना विचारलं.

सारं  बोलणं न बोलताच संपलं. मी उठलो. रामाच्या अश्रूंनी भिजलेला कंठा मंद उजेडात चमकला. प्राणप्रिया सीतेच्या वियोगानं झाडांना कवटाळून रडणारा राम मी पाहिला होता, शक्ती लागल्या लक्ष्मणाला मांडीवर घेवून रणांगणावर रडणारा राम मी पाहिला होता त्या `रडक्या` रामांनी मला आपल्या प्रेमात बांधून ठेवलं होतं पण आजचा हा अश्रूनयन राम मी स्वत:हून सोडून जात होतो.

रामाशिवाय मी जगूच शकत नव्हतो पण आता रामासोबत जगणं ही शक्य नव्हतं. जिच्या रामप्रेमाच्या प्रेरणेनं आजवर मी रामासोबत होतो ती रामप्रिया सीता ही आता नव्हती. आजवर ज्या लोकसेवेच्या निष्ठेनं राजकर्तव्यांचा  काटेरी सहवास सहन केला, ज्यांनी रामाला राम म्हणून जगू दिलं नाही,सीतेला सीता म्हणून जगू दिलं नाही त्यांच्यासाठी आता लक्ष्मणानं का जगावं ?

सीता  वहिनी गेली आणि मी  त्या वचनातून मुक्त झालो जे तिला वाल्मिकीच्या आश्रमात सोडताना दिलं होतं. अजून ही लख्ख आठवतंय, सीतेला वाल्मिकींच्या आश्रम सीमेवर सोडलं तेव्हा आभाळही रडत होतं.

"लक्ष्मणा रथ का थांबवला ?" या प्रश्नानं दाबून धरलेला माझा बांध फुटला. एक क्षण आणि तिच्या चेहऱ्यावरचं आश्चर्य मावळलं.

" पुन्हा एकदा 'राजा' राम !" आपलं गर्भार जडत्व सावरत ती एवढंच म्हणाली.

मी रथाचा ध्वजदंड धरून स्वत:ला सावरत होतो. सीतेनं माझ्या खांद्यावर हात ठेवला.

" मला आधार दे, लक्ष्मणा ! " वाणीची धार व हाताची पकड त्या सुकुमार शरीराला जुळत नव्हती. ही सीता माझ्यासाठी नवीन होती. मी शहारलो.

सावकाश रथातून उतरत ती म्हणाली," ही बेहद्द रामप्रेमाची फळं आहेत बाबा."

माझा हात हातात घेवून ती म्हणाली," आठवतंय का लक्ष्मणा, ती मारीच हाक ? परशुरामाला हरवणाऱ्या रामाची आसमंतात गर्जलेली ती आभासी हाक त्या मारीच्याची शेवटची मृगमरीचीका ठरली. अन् माझ्या हृदयानं तुझ्या चारित्र्यावर असूड फोडले त्या वेड्या रामाप्रेमानंच ना ! कधी कधी संस्कृतीचे संस्कार संहारास कारणीभूत होतात. तू नको म्हणाला होतास तरी मी भिक्षादानाच्या महान पुण्य प्रेमाला बळी पडून लक्ष्मणरेषा ओलांडली अन्  रामायण घडवून आणलं तेही प्रेमानंच ना ! आज पुन्हा त्या प्रेमानंच तुला मला एक वचन द्यावं लागेल बघ."

"माझ्या  मागे रामाची साथ सोडणार नाहीस ना ! तो खूप एकटा आहे रे ! आणि एक गुपित सांगू का ? रामाला सोडून सगळ्यांना सांग. सीतेपेक्षा ही लक्ष्मण रामाच्या खूप जवळ आहे रे !"

ही वेदना होती की काय मला कधीच कळलं नाही. मी भरल्या गळ्यानं म्हणालो," सीताराम हेच माझे प्राण,वहिनी !" तिचं तेव्हाचं भविष्य सूचक मंद स्मित मला आज उमगलं.

अंधाऱ्या चिखलात तिची पद्म पावलं उमटवत  जाता जाता  मात्र ती कडाडली ," आणि म्हणावं त्या महाबाहोला - ज्यानं ते महान शिवधनुष्य मोडून मला जिंकलं होतं - सीता ही एक क्षत्राणि आहे, जिनं त्याच शिवधनुष्याचा गाडा-घोडा करून आपले खेळ खेळले होते, तिच्यावर असं सामान्यांसारखं प्रेम करू नकोस. सोहेच्या क्षमतेने ही भूमी कन्या सीता सारं काही सहन करील पण असा लेचापेचा, कुंपणाआडून प्रेम करणारा  राम तिला बिलकुल आवडणार नाही."

सीता  गेली अन् रामातला `राम' गेला म्हणजे आता सीताही नाही आणि राम ही नाही मग लक्ष्मणाचं  अस्तित्व ते काय ?  मी निघालो. अनंताच्या प्रवासाला.

रामाच्या महालाबाहेर येवून मी उर्मिलेला एवढंच म्हणालो," मी जातो उर्मिला " तिनं माळता गजरा तसाच ठेवला. थंड दगडी पाउल वाटेवरच्या माझ्या पावलांनी राम, उर्मिला व अयोध्येचा निरोप घेतला. अथांग शरयूच्या प्रवाहानं मला अलगद कवेत घेतलं तेव्हा कोणतंही प्रेमळ अस्तित्व साक्षीला नव्हतं मला अडवून धरायला.


शुक्रवार, १८ नोव्हेंबर, २०११

हेचि फळ तव तपाला !

"मुनिवर, हे काम तुम्हीच करू शकता. माझी शपथ आहे तुम्हांला. लिहून ठेवा हे सगळं. त्याशिवाय जगाला कळणार कसं की ही रमवणारी रामकथा नसून सतावणारी सीताकथा आहे." असं म्हणून कोसळत्या पावसात मला सावरायची संधी न देता सीता गर्द अरण्यात निघून गेली.

मला माहीत होतं ती तिच्या नेहमीच्या आवडत्या त्या काळगुहेतच जाणार. पण यावेळी पुन्हा परत न येण्यासाठी. बऱ्याचदा मी तिचा पाठलाग करत तिथंवर गेलो होतो.पण आत जायची हिम्मत झाली नव्हती. मृत्युदर्शी लांबीचा गडद अंधार होता आत अन् त्यावेळी त्या गर्भवती सुकुमार राजमहिषीचं ते एक अत्यंत आवडतं ठिकाण होतं. आजसुद्धा आहे. बऱ्याच वर्षांपासून त्या भागात रहात असूनही मला ही गुफा सापडली नव्हती.पण सीतेनं कसं कुणास ठावूक ते ठिकाण आश्रमात येताच शोधलं होतं. त्या गुहेचा आकार - उकार अनाकलनीय होता जणू भूगर्भीय पाताळाचं प्रवेश द्वारच !

गेली. सीता गेली. परत न येण्यासाठी गेली. ती भूमिपुत्री आपल्या भूमातृ गर्भात सामावली. त्या काळगुहेत गेली अखेरची. अन् रामातला सारा रामच गेला.सारी रम्यता गेली. सारी सीतलता गेली. तो आजानुबाहू राम आपादहस्त राम झाला.

मी नयनाभिराम पाहिला होता. मी बाणपाणि राम पाहिला होता. मी राजदंडपाणि राम पाहिला होता. मी राजा राम पाहिला होता. मी रणसिंह राम पाहिला होता. मी अगतिक राम ही पाहिला होता पण हा निसत्त्व राम मला पाहवेना. पडत्या पावसाची कृपा की राजमुकुटावरून ओघळत्या जलधारांसह ते रामाश्रू ही मुक्तपणे झरत होते.

दिसूनही कळत नव्हतं जगाला की हा रमवणारा ही  रडतोय. अदृश्य राजमुकुटाचे मोती ओघळत होते. आयुष्यात पहिल्यांदा. सर्वांसमोर. मुक्तपणे. राजासह प्रजा खालमानेनं राजधानीकडे वळली.त्या शापित राजधानीकडे जिला व जिच्या राणीला परस्परांचं सहवास सौख्य नव्हतं.

सीमेचं आपलं असं अस्तित्व जवळ जवळ नसतंच पण काम मात्र खूप मोठं असतं दोन खंडांना जोडण्याचं. नियतीला आपल्या खेळात स्वत:कडून स्वत:च स्वत:ला  रडवून घ्यायची खूप वाईट खोड आहे. नारदाच्या नादानं 'बी घडलेला' मी - वाल्मिकी - चिखल तुडवत माघारा वळलो.

ना त्या दिवशी तो नारद भेटला असता ना मी वाल्या कोळी वाल्मिकी बनलो असतो. अजूनही आठवतंय. त्यादिवशी माझ्यारुपानं साक्षात मृत्यु समोर असताना ही नारदानं मला स्वत: साठी जगायची नजर दिली कारण मी ज्यांच्यासाठी जगत होतो ते माझ्या अनिष्टाचे भागीदार होऊ इच्छित नव्हते. हा स्वचा शोध मला माहीत नव्हता. नारादानं काही तरी साधना करायला सांगितली. मला काय माहीत साधना कोणत्या घरी राहायची ते.

हसून नारदानं म्हटलं होतं," तुझं मन ज्यात रमेल ते कर." तो खरा गुरु बनत होता.मी इरसाल शिष्य झालो होतो. मला त्याच्याकडूनच मंत्र,साधन हवं होतं. माझी इच्छा गुरूनं नुसतं मार्ग दाखवण्याइतपतच मर्यादित राहावं अशी नव्हती तर मला काही काळ तरी उचलून घ्यावं अशी होती.नारादानं एक पांगुळ गाडा हाती दिला. "राम,राम,राम." कधीतरी मी स्वत:हून चालावं यासाठी. भले शाबास ! आम्ही पांगुळ गाड्यालाच विमान समजून चालत राहिलो. त्यातच रमलो. त्या ऋणानुबंधानंच ऋषी झालो.

अजूनही आठवतोय तो दिवस. पावसानं  सृष्टीला न्हाऊ घातलं होतं. सवयीनं मी प्रात:स्नानाला निघालो होतो. उगवत्या सूर्याच्या साक्षीनं त्या रम्य वेळी एक क्रौंच जोडपं मैथुन प्रेमात मग्न होतं. माणसापेक्षा हे पक्षीच खरे हुशार ज्यांनी मैथूनाला अंधाऱ्या रात्रीची काळीमा दिली नाही. सहज लक्ष गेलं अन् कळायच्या आत एक जोडीदार शिकाऱ्याच्या बाणाला बळी पडला. इतक्या दिवसांची तपश्चर्या बनली की बिघडली हे कळलंच नाही. ह्रदयानं पहिल्यांदा तोंड उघडलं.

" रे दुष्टा,अधमा मारीलेस ह्या निष्पाप क्रौंच मिथूनाला |
 ध्वंसीलेस त्या सौंदर्या ह्या पोटाची खळगी भरण्याला  || "

नियतीचं  हे वरदान शापित ठरलं हे आज जाणवलं सीतेच्या या शब्दांनी. लव-कुशांना मांडीवर बसवून "रामो
राजमणी " ची विभक्ती शिकवतानाही सीतेच्या नजरेला ना जुमानलं ना अस्वस्थ झालो. पण आज भरल्या डोळ्यांनी सीतेच्या आत्म्याची ही काळकथा रामाच्या नावावर खपवायची होती. न स्वीकाराताही हे शिवधनुष्य सीता-राम प्रेमानं अंगावर आलं होतं. हे आदिकवित्व अनंताची ठसठस देवून जात होतं.