पृष्ठे

गुरुवार, १८ ऑक्टोबर, २०१२

दशरथ मांझी आकळले प्रेम ज्याला !

दशरथ मांझी [१९३४ ते १७ ऑगस्ट २००७] बिहारमधील एक छोटसं गाव गेहलोर इथला एक साधा सरळ  गरीब माणूस  ! प्राणप्रिया 'फाल्गुनी' वरचं त्याचं अत्युत्कट प्रेम हाच त्याचा खजिना ! त्या प्रेमफुलाचा अपघाती  मृत्यू ! कशानं ? अनघड पहाडाची ती जीवघेणी अवघड वाट त्याच्या प्रियेचा प्राण घेवून गेली. तिचं पाय घसरून पडणं, तिला वेळेवर जवळच्या शहरात योग्य औषधौपचारांपर्यंत न पोचवता येणं याला हाच पहाड कारणीभूत आहे हे कळताच हा पठ्ठ्या कोलमडला तर नाहीच उलट त्यानं जनाची पर्वा न करता थेट त्या पर्वताला हटवायला सुरुवाट केली.

या पहाडाला ७० किमीचा वळसा घालूनच शहरात जावं लागे. आजवर अशा अनेक फाल्गुनी व दशरथांना या ७० किमीनं यमपुरीचा पत्ता सांगितला होता. आता मात्र त्याची गाठ होती एका खऱ्या भगीरथ  वारसाशी ! पुढचे २२ वर्षं [१९६०-१९८२] दशरथ मांझीनं त्या लाल पहाडावर आपलं रक्त आटवलं व अखेर रस्ता तयार केला.

गेलेल्या फाल्गुनींच्या स्मरणार्थ नवीन फाल्गुनींना वाचविण्यासाठी ७० किमीचं अंतर फक्त ७ किमीवर आणलं सुरुवातीला वेडा ठरवून नंतर 'साधुजी' करणाऱ्या लोकांना न जुमानता, सरकार व जनतेच्या सहकार्याशिवाय, छातीचा कोट करून यमपुरीच्या वाटेला संजीवन महामार्गात बदललं एका डोळस प्रेमवीरानं !

       उत्कट प्रेमाचा दरवळ पत्थराला ही पाघळवतो  हेच या प्रेमधीरानं आपल्या अदम्य कार्यानं दाखवून दिलं आहे. प्रियवराच्या थडग्यावर आत्माप्रौढीची इमारत उभारण्यापेक्षा 'इतरेजनाय सुखाय ' अशी उदात्त कार्याशिल्प उभारून आयुष्य गंध दरवळत ठेवण्याचा आदर्श देणाऱ्या या बावनकशी प्रियकरास ही शब्दफुले सादर समर्पित !

 "प्रेमफुला आठवून ...." 

येशील ना प्राणप्रिये आता तरी परतून
बघ केलाय रस्ता तुझ्यासाठी पाषाणाला हटवून ||१||

आठवणींची साजलेणी लेऊया परतून
चल शुभ्र शीडे उभारुनी जग पाहूया फिरून ||२||

शरदाच्या त्या रात्री बेधुंद जगूया प्रेमून
मुग्ध फुले वेचीत चालू हात गळा गुंफून ||३||

चाललो होतो चार पावले आणा भाका खावून
आली असती चार फळे मज प्रेमफुला बहरून ||४||

 डाव अर्धा टाकून अशी गेलीस कशी सोडून
वाटलं नव्हतं घात होईल जाशील डोळां पाणी देवून ||५||

घट्ट मिटले ओठ अन् काढला तुझा माग शोधून
घेवून घास पाषाणाचा पाऊलखुणा ठेवल्या कोरून ||६||

केली नाही तमा जरी दिलो वेडा ठरवून
कळलो तेव्हा जगा जेव्हा रस्ता गेला उतरून ||७||

गेली जरी बावीस वर्षे जी येतील ना परतून
तप्त जना तृप्त केले तुज दरवळ आठवून ||८|| 

'दशरथ मांझी' आळवितो आला जीवनभानू सांजावून
बघ 'फाल्गुनी' प्रिये एकदाच पुन्हा तशीच मान वेळावून ||९||