पृष्ठे

शुक्रवार, २० जानेवारी, २०१२

एका दाण्याचे अर्थशास्त्र

'भूकेला कोंडा अन् निजेला धोंडा' अशी एक म्हण आहे. तिचे सकारात्मक व नकारात्मक असे दोन्ही अर्थ आहेत. सकारात्मक अर्थाने निस्पृहाचे हे एक महत्त्वाचे लक्षण आहे. भूकेला कोंडा अर्थात जेवणाची आसक्ती नसावी [एवढाच व असाच अर्थ घ्यावा कोंड्याचे अथवा कोंड्यासारखे निसत्त्व जेवण जेवावे असा घेवू नये.] निजेला धोंडा अर्थात शारीर सुखांची फार फिकीर करू नये. उशी घेतल्याशिवाय झोप येत नाही असे नाही पण झोपताना डोके थोडेसे उंचावर असावे यामागे शरीरशास्त्राचा आधार आहे म्हणून धोंड्याची / दगडाची उशी ही चालेल इतकेच.[कधी बौद्ध लेण्या,विहारात गेल्यावर बारकाईने पहा दगडाचीच उशी, पलंग दिसेल झोपायची व्यवस्था म्हणून !]

आता नकारात्मक अर्थ पाहू - अत्यंत दारिद्र्याचे, गरिबीचे वर्णन करताना या म्हणीचा वापर करतात. कोंडा अर्थात टाकून देण्यालायक सत्वहीन पदार्थ जेवायला व धोंड्याची उशी झोपायला. आहार आणि निद्रा या अनिवार्य गरजाही ज्यांना पुरवता येत नाहीत अशांचं वर्णन या म्हणीने अत्यंत समर्पकपणे केले आहे.

आज हे आठवण्याचं कारण म्हणजे गेल्या काही दिवसात घडलेल्या दोन घटना ! जगातल्या सर्वात बलाढ्य राष्ट्राच्या तशाच बलाढ्य अशा एका उच्च पदाधिकाऱ्याने म्हटलं की जगात अन्न टंचाई जाणवतेय, महागाई वाढतेय कारण भारतीय [यासोबत आफ्रिका व आशिया खंडाची नावे आहेत] लोक खूप खातात. [ खूप खाल्याने लट्ठपणा ही ज्यांची राष्ट्रीय समस्या बनतेय त्यांची ही मुक्ताफळे बरं का ! ]  

दुसरी घटना - मा.सर्वोच्च न्यालायाचे पाय मुर्दाड सरकारला लाथा घालून थकले पण लाखो टन अन्नधान्य गोदामात सडून गेले तरी सरकारला खरे गरीब कोण ते सापडले नाहीत. सरकारच्या तांत्रिक समस्या लक्षात घेतल्या तरी ही बाब समर्थनीय नाही की अपुरी यंत्रणा, अधिकारी व लोक यांच्या संगनमताने होणारा भ्रष्टाचार या कारणांमुळे अन्नधान्य  वाटप न करता ते चक्क सडू द्यावे.

कोणत्याही निकषाने शोधले तरी आज रोजी भारतात कमीत कमी २० कोटी लोक तरी निश्चितच गरीब सापडतील ज्यांना दोन वेळचे पोटभर जेवण मिळत नाही.[अंगभर कपडा व पुढच्या किमान गरजांची तर बातच सोडा.] आता आपण काही अर्थशास्त्रज्ञ नाही त्यामुळे खूप काटेकोर व पुस्तकी आकडेमोड न करता वरवरचा हिशेब करू.

भारतात १२० कोटी लोक आहेत. ज्या किमान २० कोटींना दोन वेळचं पोटभर जेवण मिळत नाही ते एक वेळ कोरभर काहीतरी खावून जगत आहेत.त्यांच्या एका जेवणाची ते काळजी घेतच आहेत. आपण त्यांच्या दुसऱ्या जेवणाची चर्चा करू.

प्रत्यक्ष भारतीय भूमीवर खाणारी तोंड १०० कोटी त्यातले ७५ कोटी नवजात शिशू, बालके, आजारी लोक,  उपवास करणारे कर्मकांडी, मांसाहारी, फास्टफूडवाले, अन्य काही कारणाने भात न खाणारे सोडून देवू. उरले २५ कोटी जे रोज दोन वेळा भात खातात असे मानू कारण भात भारताचेच नव्हे तर एकूणच मानव जातीचे मुख्य अन्न आहे.

आता रोज दोन वेळा भात खाणारे २५ कोटी लोक एकावेळी फक्त एक भाताचं शीत किंवा दाणा वाया घालवतात असं समजू. म्हणजे २५ कोटी दाणे वाया जातात. गृहीत धरा एका किलोत ५ लाख दाणे असतात. तर २५ कोटी दाण्यांचे  किती किलो तांदूळ होतील ? [२५ कोटी भागिले ५ लाख = किती ? २५,००,००,००० / ५,००,००० = ५०० ] २५ कोटी दाण्यांचे  ५०० किलो तांदूळ होतील. म्हणजे ५ क्विंटल किंवा १०० किलोचे एक पोते धरले तर ५ पोते होतील.

प्रत्येकी २०० ग्राम धरल्यास एका किलोत ५ माणसे जेवतील. ५०० किलोत २५०० लोक जेवतील. हा हिशेब फक्त एका वेळचा आहे. दोन वेळचा धरल्यास ५००० लोक जेवू शकतील. जर २५ कोटी लोकांनी दर दिवशी फक्त दोन दाणे वाया घातले नाहीत तर ५००० लोक जेवतील. एका वर्षात ५००० * ३६५  = १८,२५,००० [अठरा लाख पंचवीस हजार ] लोक जेवू शकतील. पाहिलीत एका दाण्याची शक्ती !  

हे झालं घरच्या जेवणाचं. बाहेरच्या जेवणातली उधळपट्टी तर कहरच आहे. बाहेरचं जेवण दोन प्रकारचं एक- स्वत:च्या पैशांनी , दुसरं - पार्टी, लग्न इ. समारंभातलं. हॉटेलात कोणी घरच्यासारखं ताट, वाटी, भाजीची प्लेट इ.तील सर्व पदार्थ संपवत नाहीत.[ किमान लेखकाचा तरी प्रत्यक्ष तसा अनुभव आहे.] कारण तसं करणं भिकारपणाचं दिसतं [म्हणे!]. वेटरला टीप दिल्यासारखं लोक बरेच पदार्थ ताटात तसेच ठेवतात. याची खात्री करायची असेल तर कोणत्याही लहान मोठ्या हॉटेलच्या मागच्या मोरी,गटाराचे निरीक्षण करावे.

आता एका वेळी एक व्यक्ती एक ग्राम खाद्यपदार्थ वाया घालवत असेल व संपूर्ण भारतात रोज असे फक्त एक लाख लोक असतील तर एक लाख ग्राम खाद्यपदार्थ वाया जातात म्हणजे १०० किलो अन्न वाया जाते. म्हणजेच किमान ५०० लोक जेवायचे पदार्थ वाया गेले.

असाच हिशेब पार्टी, समारंभात दिसून येतो. आपली श्रीमंती दाखविण्यासाठी लोक खूप पदार्थ करतात. अन्न संस्कृतीचा संस्कार नसल्यानं लोक काहीही कारण नसताना, अगदी वाह्यातपणे अन्न टाकून देतात. पुन्हा सोपा हिशेब करू. १ ग्राम अन्न, १ लाख लोक वाया घालवतात. म्हणजेच १०० किलो अन्न -जे ५०० लोकांची भूक भागवू शकले असते- वाया जाते.

हा झाला खाण्याचा अगदी वरवरचा हिशेब. आता जरा पिण्यावर बोलू. फक्त एकच उदाहरण घेवू. परम प्रिय चहा. बरेच महाभाग कटिंगचाही खालचा भाग सोडून देतात. त्यात चहापत्ती असते हा भाग वेगळा.पण चहापत्ती देणारा चहा तुम्ही पैसे खर्चून घेताच कशाला ? म्हणजे स्व:तचे पैसे देवून कमी चहा प्यायचा. चहा प्यावा की नको हा अजून वेगळा विषय आहे. किमान पैसे देवून वाया तरी घालवू नका ना !

समजा एक व्यक्ती एका वेळी १ मिली चहा वाया घालवते.[चहा हे भारताचे राष्ट्रीय पेय आहे म्हणून ] किमान ५० कोटी लोक १ मिली चहा वाया घालवतात असे गृहीत धरले तर ५० कोटी मिली चहा वाया जातो.म्हणजेच ५ लाख लिटर चहा वाया जातो. या चहा सोबत साखर, दूध, चहापत्ती, पाणी, पैसे,वेळ  इ. ही वायाच जाते. 

वरील अन्न व पेयासोबत ऊर्जाही वायाच जाते. याकडेही आपण लक्ष दिले पाहिजे. हा कचरा पर्यावरणास हानीकारक होतो ते वेगळेच. आता हे खरे आहे की या अन्नपदार्थांची विशेषत: चहाची आपली अशी एक अर्थव्यवस्था आहे  पण ती बऱ्याच अंशी विघातक ही आहे.

वाया घालण्याच्या आपल्या या विघातक सवयीला पायबंद बसला पाहिजे. समारंभातल्या खर्चावर, अन्नाच्या उधळपट्टीवर जगभरातील सरकारांनी कायदेही केले आहेत. पण सगळ्याचं गोष्टी कायद्याने कुठं होतात ? जनामनाची समज वाढल्याशिवाय ही अर्थहीन, अंतिमत: विनाशक उधळपट्टी थांबणार नाही.

पृथ्वी पूर्वी प्रमाणेच भरपूर अन्न देत आहे. गरज आहे ती समान वितरणाची. ढिम्म सरकार हालो तेव्हा हलो. अन्न किती खावं हा पुढचा विषय आहे. कसं खावं हे तर सोप्पं व साधं आहे. निस्पृहाच्या अर्थाने जरी नसलं तरी गरीब भूकेल्यांच्या भूकेचा कोंडा दूर करण्यासाठी खूप काही करायची गरज नाही. फक्त आपला एक दाणा वाचवला म्हणजे झालं.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा