पृष्ठे

रविवार, २५ डिसेंबर, २०११

साहेबाची भाषा

 भाषा आपल्या भावभावना इतरांपर्यंत पोचवायचे एक माध्यम आहे. मानवी गरजांची पूर्ती करण्यासाठी भाषा एक महत्त्वाचे साधन आहे. सामान्यत: भाषेचे मातृभाषा व परभाषा असे दोन प्रकार करता येतात. मातृभाषा आपण जगत असतो.त्यामुळे तिचा वेगळा अभ्यास करायची गरज लक्षात येत नाही.परंतु पराभाषेचे आपले असे महत्त्व असते.

एखादी परभाषा एखाद्या प्रदेशात बोलली जाण्यात बऱ्याचदा आक्रमण, गुलामगिरी,व्यापार, मनोरंजन अशी बरीच कारके महत्त्वाची ठरतात. मराठी आणि अन्य भाषा एक स्वतंत्र अभ्यासाचा विषय आहे पण सहज उल्लेख केला तर  -
१] जननी भाषा म्हणून संस्कृत,
२] धार्मिक चळवळींची भाषा म्हणून अर्धमागधी [जैन] व पाली [बौद्ध],
३] आक्रमक म्हणून
       अ] अरबांची अरबी,
       आ] इराण्याची फारसी,
         इ] पोर्तुगीजांची पोर्तुगीज     
४] अरबी,फारसी व भारतीय भाषांची मिश्रित उर्दू
५] मराठ्यांच्या वाढत्या विस्ताराने कन्नड, मलयालम, तमिळ,तेलुगु, उडिया,बंगाली, हिंदी, राजस्थानी, गुजराती इ.

 या भाषांचा मराठीशी आलेला, येत असलेला संबंध आपल्या रोजच्या जगण्याचा व भाषेचा व्यवहार बदलत असतात. यात सर्वात प्रमुख भाषा म्हणजे साहेबाची भाषा - इंग्रजी होय.

 आपली इच्छा असो वा नसो आज [किमान भारतात] तरी इंग्रजी भाषा जीवन जगण्यातला एक अनिवार्य टप्पा ठरत आहे. बहुभाषिक असणं एका विकसित व्यक्तिमत्त्वाचं लक्षण आहे. कोणतीही भाषा चार टप्प्यांनी आत्मसात करता येते.
१] श्रवण  - लक्षपूर्वक व समजून घेवून ऐकणे.
२] भाषण  - इतरांना समजेल असे अर्थपूर्ण बोलणे.
३] वाचन - समजून घेवून वाचणे.
४] लेखन - इतरांना समजेल असे लिहिणे.

इंग्रजीच्या संदर्भात आपण बर्याचदा व्याकरणाच्या पुस्तकापलीकडे जात नाही. आपली इंग्रजी एक व्याकरणाचे पुस्तक [ सर्वप्रसिध्द तर्खडकर आणि  रेन व मार्टीन (Wren & Martin) ] अन् एक बऱ्यापैकी शब्दकोश या दोन चाकावर चालत असते. यात गैर काही नाही. या [दोन] मजबूत पायामुळेच भारतीय लोक जगात सर्वात जास्त चांगले व शुद्ध इंग्रजी बोलणाऱ्यांपैकी एक मानले जातात. एक वेळ खुद्द इंग्रज चुकीचं बोलेल पण खरा भारतीय आंग्लभाषी कधीच चूक इंग्रजी बोलायचा नाही. यामुळे मातृभाषेप्रमाणे लालित्यपूर्ण इंग्रजी जरा मागे राहून जाते असे वाटते.

या स्तंभात इंग्रजी भाषेतील शब्दांचा खजिना शब्द-परिवार [Word Family]  या प्रकाराणे सजविण्याचा प्रयत्न केला जात आहे.

मंगळवार, २० डिसेंबर, २०११

पायतानापासनं सुरुवात

'उफाड्याचा माल ते मातृदेवो भव मार्गे लीलासहधर्मचारिणी' इतक्या विस्तृत प्रतलात स्त्री पुरुषाच्या आयुष्याला व्यापून राहते. या स्तंभात एक मैत्रीण - हो, कोणत्याही विशेषणाशिवाय फक्त मैत्रीण - व फार झालं तर एक प्रेमळ जीवनसाथी एवढाच विस्तार अपेक्षून 'लेखनप्रपंच' केला जाईल. 

सामान्यत: मलमूत्र विसर्जनावर नियंत्रण येवू लागलं की व्यक्तीच्या लैंगिक भावनांचा विकास सुरू होतो. [याला अपवाद असू शकतो.] शरीरशास्त्र याला पौगंडावस्था म्हणतं. येथे आपण या कालाचा विचार करणार नाहीत तर या पुढच्या अवस्थेचा म्हणजेच तारुण्याचा विचार करणार आहोत.

तर महाराजा, आता आपण तरूण सुंदरी कशी आपलीशी करावी ते पाहू. [ पोरगी पटवायचे हे तोडगे प्रामाणिकपणे केल्यास एकापेक्षा जास्त पोरी मागे लागतील हा सावधगिरीचा इशारा देवून आम्ही सुरुवात करीत आहोत. ]

सामान्यपणे  कोणतीही पोरगी कोणाही पुरुषाच्या नजरेला नजर देत नाही तर एका नजरेत त्याला वरपासून खालपर्यंत पाहून आपली दृष्टी जमिनीकडे वळवते. याचा अर्थ असा नव्हे की ती तुमच्याकडे पहात नाही. डोळ्यांच्या कडातून नजरेची बंदूक नेम धरून उभी असते बरं का !

व्यक्ती म्हणजे काही पुतळा नाही. अंतर्बाह्य अभिव्यक्ती म्हणजेच जीवंतता होय. आता अडचण अशी की ही आंतरिक सुंदरता एका नजरेत दिसत नाही म्हणून आधी दृश्य शरीराच्या सौन्दर्यापासून सुरुवात करू. सार्वजनिक ठिकाणी चेहरा व हात वगळता सारं शरीर कपड्यातच बंदिस्त असतं म्हणून आपल्या सुंदरतेचे बरेचसे गुण कपड्यांनाच जातात.संपूर्ण वेशभूषेमध्ये पादत्राणांचा ही समावेश होतो.

आता जर पोरगी नजरेला नजर न देता पायाकडे पाहत असेल तर ? ......... तर महाराजा, चांगली वहाणे वापरावीत दुसरं काय ! [ विक्टोरियन काळात पियानोचेही नागवे पाय झाकले जायचे. तुम्ही तर चक्क एकविसाव्या शतकातील पुरुष आहात की राव ! ] पायतानं चांगली  म्हणजे महागडी नव्हेत. नायके किंवा रिबॉकचेच बूट हवेत असे नव्हे. बूटच हवेत असेही नव्हे. किंवा नेहमीच कोल्हापुरी चप्पल असावी असे ही नव्हे.  

आज पाय कशातही न घालता किंवा पायात काहीही न घालता कोणी फिरत नाही. विशेषत: जिथे पोरी पाहतील अशा ठिकाणी तर नाहीच नाही. [ म्हणजेच कॉलेजात, रस्त्यावर, ट्युशनला इ.इ.] मग मूळ मुद्दा पायतानं हा नाही. ती असावीत व ठीकठाक असावीत एवढेच ! 

मंग महाराजा, पोरगी  पटावी कशी ? तर राजे हो, पोरगी तुम्ही पायतान कसलं घालता याच्यानं नाही पटत तर घातलेलं पायातन कसं वापरता अन् वापरून झाल्यावर कसं सोडता, ठेवता याच्यानं तुमच्यावर मरते. जरा आपलं पायतान [ यात चप्पल, बूट इ.इ. सारं आलं.] काढून त्याचा तळ पहा. घासलेल्या टाचेवरून स्वभाव ओळखायचं एक शास्त्र आहे म्हणे ! आपल्या घासलेल्या टाचेवरून आपला स्वभाव ओळखा. डावीकडचा भाग जास्त घासला आहे की उजवीकडचा ? दिडक्या, पाऊण चालीनं संपूर्ण तळ न घासता विशिष्ट भागच घासला जातो. असं चालणं चुकीचं आहे व ते मुलींना बिलकूल आवडत नाही. तुमच्या पायतानाचा  संपूर्ण तळ जर सगळीकडे समान घासला जात नसेल तर तुमच्या चालण्यात व कदाचित पायातही दोष आहे. असा लंगडा घोडा शर्यत कशी जिंकणार ?

आता या बाबीकडं दुर्लक्ष केलं तरी पोरगी अजूनही उंबरठ्यातच आहे असं समजा. तिला जर मनमंदिरात आणायचं असेल तर आपण पायतान कसं सोडतो ते जरा पहा. पायतान सोडण्यापूर्वी ते घातलेलं असलं पाहिजे. म्हणून आधी पायतान नीट घाला व नीट चाला.  

बऱ्याच जणांना पाय फरफटत, पाय घासत चालायची सवय असते त्यामुळे चालताना पायतानांचा आवाज होतो. ते बरोबर नाही. अर्ध्या चपलेतच पाय ठेवून काही जण चालतात. हेही बरोबर नाही. पायाला घट्टे पडतील अशी घट्ट पायतानं नसावीत. बुटाचे बंद नीट बांधलेले असावेत. ते लोंबणारे नसावेत. सैन्डलचे पट्टे व्यवस्थित बांधलेले,लावलेले असावेत.

पायतानं  जशी नीट घालावीत तशी ती नीट सोडावीत.बंद बांधलेले असतानाच बुटातून पाय काढणारे विद्वान ही आहेत. ते काही विद्वत्तेच लक्षण नाही. बंद सोडून बूट काढावेत. पादत्राण कोणतंही असो  ते एका शेजारी एक असं एका बाजूला आडव्या ओळीत किंवा उभ्या रांगेत किंवा पायठेवतान [ पादत्राणे ठेवायचे लाकडी वा लोखंडी कपाट] जे जसे उपलब्ध असेल तसे ठेवावे. पुढे मागे, आडवे तिडवे, तिरपे असे कसे ही सोडू नये. सगळ्यात महत्वाचे म्हणजे अगदी दारातच, उंबरठ्यातच  अशी कुठेही आपली पादत्राणे सोडू नयेत. 

दाराबाहेर  एका बाजूला, एका ओळीत सोडलेली पादत्राणे घरादाराची तशीच मनाची ही सुंदरता वाढवतात. घाई गर्दीच्या वेळी नेमक्या ठिकाणी कमी वेळात सापडतात. योग्य प्रकारे वापरल्यास पायतानं दीर्घकाळ टिकतात. त्यांच्याशी घसट वाढली की त्यांचा घसारा कमी होतो. अर्थव्यवस्था बचतीची बढती दाखवते. अशा वाचलेल्या पैशातून सिनेमाची दोन  तिकीटं, मोगऱ्याचा गजरा किंवा गुलाबाचं फूल, दोघात शेअर करता येईल असा कटिंग चहा किंवा मलईदार नारळ किंवा.......किंवा........ असं बरंच काही येवू शकतं. 

दारासमोर 'सुंदर रांगोळी काढणारी कोणी एक' दारा आत हवी असेल तर सुंदर घरादारासोबतच ..... सुंदर मनाची ही  गरज असते असं सुंदर मन सजग प्रामाणिकतेनेच निर्माण होतं. अशी सजगता पायतानं नीट काढल्या-घातल्यानं वाढते. 

पोरीवाहो, गळयाच्यान सांगा बरं असला मैतर तुम्हाला नको का ?

[.......... आता अशा जातीच्या सुंदराला कोणती सुंदरी नाकारील बरं ? ]

गुरुवार, १५ डिसेंबर, २०११

मराठीतले एक अक्षरी शब्द

येथे मराठीतल्या एक अक्षरी शब्दांची यादी दिली जात आहे. ही यादी परिपूर्ण असेलच असे नाही. कृपया वाचकांनी यादी पूर्ण करावयास सहकार्य करावे.

१] अ = मराठीतील सर्व प्रथम स्वर. पूर्ण अर्थाचा शब्द म्हणून वापर होतो असे वाटत नाही. उद्गारवाचक शब्द  म्हणून वापर होत असावा. दीर्घ उच्चारीत अ हा ही उद्गारवाचक शब्द म्हणून वापरला जातो.

२] आ = मराठीतील दुसरा स्वर. पूर्ण अर्थाचा शब्द म्हणून वापर होतो असे वाटत नाही. उद्गारवाचक शब्द म्हणून वापर होत असावा. दीर्घ उच्चारीत आ हा ही उद्गारवाचक शब्द म्हणून वापरला जातो.

३] इ = मराठीतील तिसरा स्वर. पूर्ण अर्थाचा शब्द म्हणून वापर होतो असे वाटत नाही. उद्गारवाचक शब्द म्हणून वापर होत असावा. दीर्घ उच्चारीत इ हा ही उद्गारवाचक शब्द म्हणून वापरला जातो

४] ई = मराठीतील चौथा स्वर. पूर्ण अर्थाचा शब्द म्हणून वापर होतो असे वाटत नाही. उद्गारवाचक शब्द म्हणून वापर होत असावा. दीर्घ उच्चारीत ई हा ही उद्गारवाचक शब्द म्हणून वापरला जातो.

५] उ = मराठीतील पाचवा स्वर. पूर्ण अर्थाचा शब्द म्हणून वापर होतो असे वाटत नाही. उद्गारवाचक शब्द म्हणून वापर होत असावा. दीर्घ उच्चारीत उ हा ही उद्गारवाचक शब्द म्हणून वापरला जातो.

६] ऊ = मराठीतील सहावा स्वर. पूर्ण अर्थाचा शब्द म्हणून वापर होतो. ऊ केसांत राहणारा जीव आहे.माणसात उवा [या अनेकवचनाचा उच्चार 'वा' असा ही केला जातो.]  होतात. तशाच त्या माकडासह इतर काही केसाळ प्राण्यातही होतात. वचन = एक ऊ, अनेक उवा. उद्गारवाचक शब्द म्हणून वापर होत असावा. दीर्घ उच्चारीत ऊ हा ही उद्गारवाचक शब्द म्हणून वापरला जातो.

७] ए = मराठीतील सातवा स्वर. पूर्ण अर्थाचा शब्द म्हणून वापर होतो. एखाद्याचे लक्ष वेधणे, हाक मारणे, बोलावणे, संबोधन, पतीने आपल्या पत्नीला हाक मारण्यासाठी इ. साठी याचा वापर करतात. उद्गारवाचक शब्द म्हणून वापर होत असावा. दीर्घ उच्चारीत ए हा ही उद्गारवाचक शब्द म्हणून वापरला जातो.

८] ऐ = मराठीतील आठवा स्वर. पूर्ण अर्थाचा शब्द म्हणून वापर होतो असे वाटत नाही. उद्गारवाचक शब्द म्हणून वापर होत असावा. दीर्घ उच्चारीत ऐ हा ही उद्गारवाचक शब्द म्हणून वापरला जातो.

९] ओ = पूर्ण अर्थाचा शब्द म्हणून वापर होतो. हाकेला ओ देणे, प्रतिसाद, संबोधन, उद्गारवाचक शब्द म्हणून वापर होतो. दीर्घ उच्चारीत ओ हा ही उद्गारवाचक शब्द म्हणून वापरला जातो.

१०] औ = पूर्ण अर्थाचा शब्द म्हणून वापर होतो असे वाटत नाही. होय या अर्थाने हाव असा उच्चार करता करता औ असा ही उच्चार करून प्रतिसाद दिला जातो. उद्गारवाचक शब्द म्हणून वापर होत असावा. दीर्घ उच्चारीत औ हा ही उद्गारवाचक शब्द म्हणून वापरला जातो.

११] अं = पूर्ण अर्थाचा शब्द म्हणून वापर होतो असे वाटत नाही. उद्गारवाचक शब्द म्हणून वापर होत असावा. दीर्घ उच्चारीत अं हा ही उद्गारवाचक शब्द म्हणून वापरला जातो.

१२] अः = पूर्ण अर्थाचा शब्द म्हणून वापर होतो असे वाटत नाही. वेदना दर्शक व इतर उद्गारवाचक शब्द म्हणून वापर होत असावा. दीर्घ उच्चारीत अः हा ही उद्गारवाचक शब्द म्हणून वापरला जातो.

सामान्यत: उद्गारवाचक शब्द अर्थाच्या दृष्टीने सापेक्ष असतात कारण कोणती व्यक्ती कोणत्या कारणासाठी कोणत्या वेळी कोणता ध्वनी अर्थात उद्गार काढेल हे काही सांगता येत नाही. एकाच उद्गाराचे वेगवेगळया कारणांमुळे वेगवेगळे अर्थ होतात. उद्गार व्याकरणाच्या नियमांना बघून निघत नाहीत. त्यामुळे कोणताही ध्वनी जो उत्स्फूर्तपणे काही तरी व्यक्त करतो, कोणती न कोणती भावना प्रकट करतो तो उद्गारवाचक शब्द असू शकतो. या अर्थाने प्रत्येक वर्ण - स्वर व व्यंजन - उद्गारवाचक शब्द असू शकतो.



सोमवार, १२ डिसेंबर, २०११

प्रबुद्ध कृष्ण - काही छटा

'संत' या शब्दाची माझी व्याख्या अशी आहे - संत म्हणजे 'संबुद्ध तरुणता' ! संबुद्धता तारुण्याच्या कालजयी उत्साहाने वावरू लागली, की अमर 'अभंग' संतवचने अवतरतात. त्यातीलच एक म्हणजे -
" अंतरी निर्मळ वाणीचा रसाळ | त्याचे गळा माळ असो नसो |"
 यालाच मी 'प्रबुद्ध कृष्ण' म्हणतो.

अंतरीचे निर्मळत्व म्हणजे प्रबुद्धत्व ! खरे तर निर्मळ हा शब्द नकारार्थी आहे पण येथे तेच गरजेचे आहे. मळ, मलीनत्व काढून टाकणे ही प्राथमिक व अनिवार्य पायरी आहे  कारण एकदा का मालिन्य निघून गेले, की मग जे काही उरते ते शुद्ध, बुद्ध, सत्त्व अस्तित्त्व ‘असते जरी त्याला तत्वज्ञान्यांनी 'शून्य' म्हटले असले तरी !

असे पहा, की आपण एक खूप जुना किंवा खूप मलीन असा दिवा घेतला व त्याला घासून पुसून निर्मळ केले तर काय होईल ? मूळ धातू चकाकू लागेल ना ! आपण फक्त धातू वरील धूळ काढून टाकायची आतली स्वच्छता सुंदरता आपोआप दिसू लागेल. येथे नवीन काही निर्माण करायचे नाही. नवी कल्हई नाही, नवा धातू नाही, नवे मूलद्रव्य नाही ! काही काही नाही. फक्त वरचा अज्ञानाचा थर बाजूला करायचा की आत ‘अस्तित्त्व’ आहेच ! किती सोप्पं काम आहे ना ! पण हे निर्मळ करणं म्हणजे प्रबुद्धत्व नाही महाराजा ! ही क्रिया हे तंत्र आहे तत्व नव्हे. क्रियेचा परिणाम हे तत्त्व आहे. निर्मलीनत्त्व म्हणजे बुद्धत्त्व !

'दिव्याचा' मूळ धातू, रंग - रूप, स्वभाव जो नित्य, कोणत्या ही बंधनाने रहित असा आहे, स्वांतमग्न स्वानंद आहे तो  म्हणजे मूळ भाव, ते मूलतत्व हे आपले साध्य आहे. ते 'तत्' आहे. अंतस्थ दिव्याला साफ,निर्मळ करण्याची क्रिया म्हणजे तंत्र ही पहिली पायरी तर त्या साफसफाई नंतर जे मूळ सत्व उरते, दिसते, असते ते म्हणजे मूलतत्व हे अंतिम साध्य होय. हे तत्व बाहेरून थोडेच आणावे लागते ? ते तर आतच असते. फक्त दार उघडायची खोटी की प्रकाशाने  सारे घर उजळून निघालेच. हे आपले  मूळ सत्व म्हणजेच दिव्यत्व ! हे आपले  मूळ सत्व म्हणजेच बुद्धत्व ! प्रकृतीच्या  या मूळ चेतनेलाच मी 'प्रबुद्ध' म्हणतो.

प्रबुद्धत्वाची ही अवस्था खूप व चिरस्थायी आनंदाची आहे असा अनुभव ज्यांनी ती अवस्था प्राप्त करून घेतली त्यांचा आहे. हा आनंद प्रत्येकाला घेता येतो. नव्हे नव्हे तो त्याचा अधिकार आहे.ते प्रत्येकाचे जीवन ध्येयच आहे. का म्हणून आम्ही आनंदात राहायचे नाही ? का म्हणून आम्ही निराशेत, दु:खात राहायचे ? बिलकुल नाही. आनंद हा जगण्याचा मूलाधार आहे. तो आम्ही प्राप्त करून घेणारच घेणार ! आम्ही प्रबुद्ध होणारच होणार !

आता  हा आनंद, प्रबुद्धपण कसे मिळवायचे ? त्याचे अनेक मार्ग आहेत. आपापल्या आवडी निवडीवर, परिस्थितीवर ते अवलंबून आहे की कोणी कोणता मार्ग निवडायचा. सर्वात सोपा, सर्वाधिक लोकांनी वापरून सिद्ध केलेला, खूप खूप प्राचीन तरीही  आधुनिक असा मार्ग म्हणजे डोळे ‘उघडे’ ठेवून पहायचा मार्ग. नुसतं पाहणं नाही तर विशेषत्वाने पाहणं म्हणून वि + पश्यना. विपश्यना ही पद्धत सार्वकालिक, सार्वभौमिक, सार्वदेशीय तर आहेच शियाय सजीवाच्या - श्वास घेणाऱ्या सर्व सजीवांच्या - अस्तित्वाइतकीच आदिम व प्रत्येक श्वासाइतकीच प्रासंगिक ही आहे. ही पद्धत किंवा अशा पद्धती वारंवार जगाला आठवण करून देणाऱ्यांनाच ऋषी, बुद्ध, प्रेषित म्हटलं गेलं ते त्यांनी त्या पद्धती स्वत: वापरून बुद्धत्व प्राप्त केल्यामुळंच !

या परंपरेतला सर्वात प्रसिद्ध बुद्ध म्हणजे ‘सिद्धार्थ गौतम’ ! आपल्या अस्तित्वानं बुद्धत्वाचा अर्थ सिद्ध करणारा ! प्रबुद्ध या शब्दानं त्या सिद्धार्थ गौतमाची आठवण होत असेल तर ठीक पण मला व्यक्ती नव्हे तर त्याचे कार्य व त्या मूळ सत्त्वाची आठवण होते म्हणून पहिला शब्द ‘प्रबुद्ध’ !

पहिला शब्द अंतस निर्मळ करण्याकडे लक्ष वेधतो व त्याची एक पद्धत संकेतानं सांगतो, की बाबा रे ! या नावाच्या या माणसाच्या मागे मागे – अनुयायी म्हणून नव्हे तर सहप्रवासी म्हणून – गेलास तर तुही तेथेच पोहोचशील जेथे जायचं आहे.

दुसरा शब्द कृष्ण ! येथे मला तो महाभारती कृष्ण अपेक्षित नाही. जो आकर्षून घेतो तो कृष्ण ! शरीर व मनाला जे जे आकर्षित करतं ते ते सारं कृष्ण ! ‘ते’ बुद्धत्व साऱ्यांनाच आकर्षित करत असतं म्हणून ते कृष्ण आणि त्याचा आकर्षिण्याचा गुणधर्म म्हणजे कृष्णत्व ! ज्यांनी ज्यांनी बुद्धत्व प्राप्त केलं आहे त्यांनी त्यांनी साऱ्या जगाला आकर्षित केलं आहे पण आकर्षिणारं ते ते सारं बुद्धत्व नव्हे !

आकर्षित्व अनेक प्रकारांनी दिसून येतं. माझं आकर्षित्व हसतं, खेळतं, नाचतं, गातं, नांदतं आहे. त्याची धीरगंभीरता मंदस्मिता इतकचं खळाळून हसण्यानं भारीत आहे. त्याचं ‘असणं’ आनंदाची धाराप्रवाहिता वृद्धिंगत करणारं आहे. ते नुसतंच गोड नाही तर त्याला नवरसमंजिरीची रसाळ साथ आहे.  

अंतस निर्मळ झाले की वाणी आपोआपच रसाळ होतेच होते. महान वक्ते आपलं बोलणं विविध रसांनी कर्णमधुर बनवतात पण ते तेव्हापर्यंतच गोड वाटते जोवर ते वक्ते व्यासपीठावर उभे असतात. त्यांच्यातला वक्ता लाखोंना भारून टाकतो पण त्यांच्यातला माणूस किती लोकांना आकर्षित करेल हे सांगता येणं कठीण आहे. वाणी ही फक्त जीभेद्वारेच व्यक्त होते असं नाही. संपूर्ण तना - मनाने जे जे व्यक्त होतं, होऊ शकतं ते ते सारं वाणीचं वक्तव्यच असतं.
श्रोत्यांच्या कानांना संमोहित करणं त्यामानानं सोपं आहे पण आत्म्यांना भारीत तेच करू शकतात ज्यांचं अंतस निर्मळ आहे.


व्यक्त होणाऱ्या अस्तित्वाला तेव्हाच ‘व्यक्ती’ म्हणावं जेव्हा अस्तित्व निर्मळ व त्याचं व्यक्त होणं रसाळ असेल ! अशाच ‘व्यक्ती’ला मी ‘प्रबुद्ध कृष्ण’ म्हणतो मग त्याच्या गळ्यात कोणाची ही व कोणतीही ‘माळ’ असो !

एकदा का तुम्ही ‘प्रबुद्ध कृष्णा’त स्थित झालात की मग तुमच्या डोक्यावर पगडी आहे की पागोटे, कपाळावर बिंदी आहे की मांगेत कुंकू, गळ्यात माळ आहे की क्रास, हातात पाटी आहे की फाळ, कमरेला धोतर आहे की जीन्स, पायात पादुका आहेत की पंपशूज यानं काहीही फरक पडत नाही.

जे जे आनंदमय ते ते जीवन. हा आनंद हेच ऐश्वर्य जगण्यातले. हे ऐश्वर्य हाच ईश्वर आयुष्याचा. या ईश्वराचा शोध हे जगातले सार्थक. ही सार्थकता बाहेरच्या धावपळीने नाही तर आतल्या प्रवासाने प्राप्त होते. आतला प्रवास श्वासाच्या मार्गाने होतो. या मार्गावरील प्रवासाने एकदा का ‘अंतस’ निर्मळ झाले की ‘बाह्य’ सारे वाणीद्वारे स्रवणाऱ्या रसांनी न्हाऊन निघते. असं अंतर्बाह्य न्हाणं त्या आनंदाला प्रसवतं ज्याला समृद्ध ‘जगणं’ म्हणता येईल.                 

सोमवार, ५ डिसेंबर, २०११

समृद्धतेसाठी शुद्धता

 माणसाच्या अस्तित्वाला आणि त्याच्या समृद्धीला भाषेचा मोठा हातभार लागला आहे म्हणून भाषा जितकी समृद्ध तितका माणसाचा विकास जास्त ! भाषा समृद्ध होण्यासाठी ज्या बाबी महत्वाच्या ठरतात त्यात भाषेच्या शुद्धतेचा क्रमांक खूप वरचा आहे. पण भाषा फक्त शुद्ध असून चालत नाही ती प्रवाही व कर्णमधुर ही  असावी लागते. समृद्ध,प्रवाही, माधुर्यपूर्ण व शुद्ध भाषेसाठी कोणत्या किमान बाबींची गरज असते ?

१] किमान नियम अर्थात कमीत कमी व्याकरण.
२] वैविध्यपूर्ण, समृद्ध शब्द भांडार. 

या दोन चाकांवर भाषेचा रथ चालला तर तर ती भाषा सार्वलौकिक, सार्वकालिक व सार्वभौमिक होऊ शकते. चला तर मग आपल्या माय मराठीला समृद्ध बनवू या.