पृष्ठे

बुधवार, ३१ डिसेंबर, २०१४

अंतहीन शोध - अस्तित्वाचा, अनस्तित्वाचा !

" दाही दिशा माझ्या | कर्तृत्वाला देवा | 
   अस्तित्वाला तुझ्या | शोधू कुठे ? || "

असं म्हणत 'मी ' 'त्याला' नेहमी शोधत असतो. पण कर्तृपदाचा 'मी' आहे तोवर दिव्यत्वाचा 'तो' काही सापडत नाही हे काही कळत नाही आणि म्हणून 'तो' काही दिसत नाही, सापडत नाही,  उमजत नाही, आकळत नाही, अनुभवास येत नाही. तरीही 'मी' शोधतोच असतो अनादि काळापासून कदाचित अनंत काळापर्यंत !

आपण काही तरी का शोधतो ? आपण शोधतो गरजेसाठी, मुलभूत गरजांच्या पूर्ततेपोटी, आपण शोधतो कुतूहलापोटी, मग मनोरंजन, नवनिर्मितीची प्रेरणा, नाव होण्याची इच्छा, उगम ते अंतापर्यंतच्या पायऱ्याची जाण,ज्ञान व भान वाढवणे इ.इ.साठी. यातून काही अल्पकालिक व काही दीर्घकालिक शोध शृंखला निर्माण झाल्या, होत असतात. यांची दोन - तीन महत्वाची क्षेत्र असतात - १] अभौतिक किंवा भौतिक पूर्व अवस्था, २] भौतिक व ३] भौतिकापार / आधिभौतिक किंवा आध्यात्मिक. 

बऱ्याचदा  मानवी विकासक्रमात पहिल्या व तिसऱ्या क्षेत्र किंवा अवस्थांना एकच मानले जाते. उदाहरणार्थ गुरुत्वाकर्षण ही अभौतिक अवस्था आहे. कोणाची ? तर अस्तित्वाची. [येथे अस्तित्व म्हणजे असं काही जे कोणत्याही व किमान एका प्रकार ,साधन, इंद्रिय इ.द्वारे जाणले जाऊ शकते.] पण हे भौतिक किंवा आधिभौतिक अस्तित्व नव्हे. पहिली व तिसरी अवस्था मानवी कक्षेच्या चिमटीत पकडणे जरा कठीणच !

प्रारंभिक व सर्वाधिक निश्चित शोध याच क्षेत्रात झाले, होतात, होऊ शकतात. जेथे पंचज्ञानेंद्रियांना जे काही  जाणवतं ते भौतिक क्षेत्र किंवा अस्तित्वाची भौतिक अवस्था होय. याची सर्वात सूक्ष्म अभिव्यक्ती म्हणजे अणु व त्याचे भाग तर सर्वात मोठी अभिव्यक्ती म्हणजे पृथ्वी, सूर्य इ. अनंत ब्रह्मांड पोकळीतील अस्तित्व चक्रे !

शोधाचे तिसरे क्षेत्र म्हणजे आधिभौतिक व आध्यात्मिक = आधि + आत्मिक = आत्मा नामक चेतनेपल्याडचे क्षेत्र ! धर्म, संप्रदाय, रहस्यवाद इ.इ. ची सारी करामत याच क्षेत्रात चालते. हेच क्षेत्र मानवी मनाच्या अंतहीन शोधाचे क्रीडांगण आहे.

माणूस येथे शोधतो कोणाला ? खरं तर तो सोडतो 'कशाला' तरी ! पण हे 'कसं तरी' रंग रूप गंध हीन असल्याने तो त्यात कोणाला तरी शोधू जातो व खरा भूलभुलैया सुरु होतो. म्हणजे आपल्याला खरं तर ईश्वरत्वाचा, दिव्यत्वाचा शोध घ्याचा असतो पण आपण शोधतो ईश्वराला किंवा ईश्वर, देव, प्रभू इ. अस्तित्व विशेषाला !

म्हणूनच  हा शोध अंतहीन होऊन जातो. कारण जे नाहीच ते आपण शोधू इच्छितो जे आहे त्याला समजून न घेता. आपण शोधतो सर्वंकषतेला, परिपूर्णतेला जी अस्तित्व म्हणून आहे पण सामान्य स्तरावर कळत नाही पण अनुभवास येते.  ऊर्जा अस्तित्वात आहे आपण तिच्या आपणाला हव्या त्याच रुपाला शोधू जातो जी क्वचितच कळते.

म्हणून 'तो' म्हणतो,
 "दाही दिशा माझ्या |  अस्तित्वाला छोट्या | 
  कर्तृत्वाला बेट्या तुझ्या | ठेवू कुठे ? ||