पृष्ठे

गुरुवार, १६ फेब्रुवारी, २०१२

बस एक बादली पुरे

फुकुशिमाचं उदाहरण समोर असताना जैतापुरवासी आपलं चेर्नोबील होवू द्यायला तयार नाहीत कारण कोणत्याही कारणाने असो घडलेल्या अपघातानंतर मायबाप सरकार व लाल पट्टेवाली सरकारी यंत्रणा कशी वागते याचं ज्वलंत उदाहरण भोपाळच्या रूपानं देश अजूनही भोगत आहे पण सरकारही मागे हटायला तयार नाही कारण उद्याच्या अर्थव्यवस्थेच्या गाड्याची उर्जेची तहान भागवायची म्हटलं तर आपल्या पोटात ना मध्यपूर्वे सारखं 'पेटतेल' [ पेट्रोलियम ] ना मनगटात पश्चिमेची बेमुर्वत अरेरावी मग्रुरी !

आजची ऊर्जा समस्या आपण वेळीच मार्गाला नाही लावली तर आपली 'इस्मानी' कृती 'अस्मानी' संकटांना पायघड्या घालून बोलावेल. उर्जेची समस्या जाणवायला विद्वान, पंडित असायची काही गरज नाही. रोजच्या जीवनात आपण हरघडी या समस्येने पिडले जात आहोत. आपल्या साऱ्या समस्या या परस्परावलंबी, परस्परांशी संबंधित आहेत. कोणतीही एकच एक समस्या नाही तर एकातून निघणारी दुसरी, दुसरीतून तिसरी अशी समस्यांची मालिकाच आहे.

आता असं पहा -विजेची टंचाई ही आपली समस्या तिची कारणे सोडून देवू [नाहीतर विषयांतर होईल.] व त्यातून निघणाऱ्या समस्या पाहू. अगदी जाता जाता हं !

१] भारत कृषिप्रधान देश आहे. अपुऱ्या साधन सामुग्रीत वीज टंचाईची भर. परिणामी तंत्रज्ञानाचा वापर कमी. म्हणून उत्पादन, उत्पन्न कमी. उत्पादक शेतकरी वरचेवर गरीब. त्यातून आत्महत्या.......इ.इ. [पुढच्या कड्या]

२] भारताला विकसित राष्ट्र, महासत्ता व्हायचं आहे तर उद्योगधंद्यांची वाढ व्हायला हवी. त्यासाठी ऊर्जा/ वीज हवी. जी सध्या पुरेशी नाही. उद्योग कमी म्हणून उत्पादन कमी, उत्पादन कमी म्हणून व्यापार कमी, पर्यायाने अर्थव्यवस्था कमजोर इ.इ. [पुढच्या कड्या !] 

३] विकासाची उंची सेवांच्या विस्तारावर अवलंबून असते. वीज एक पायाभूत सुविधा. जिथे पायाभूत सुविधाच नाहीत तिथे विकास कसा होणार ?

[ या झाल्या सरकारी विद्वानांच्या समस्या. आता काही खऱ्या जगाच्या समस्या -

 शेती, उद्योग व कसलीही नोकरी नसणाऱ्या लोकांच्या समस्याही आहेत. जसे - लहान मुले, गृहिणी स्त्रिया, वृद्ध, बेरोजगार तरुण इ.इ..... यांच्यासाठी कार्टून, सकाळ - संध्याकाळच्या सिरीयला / मालिका, बातम्या, चित्रपट, क्रिकेटचे सामने इ.इ..... मनोरंजनाची साधने - जी समाजस्वास्थ्यासाठी खूप गरजेची आहेत- विजेविना गतप्राण होतात व आपले प्राण कंठाशी आणतात.]

आता पाषाणयुगाचा अभ्यास करण्यासाठी इतिहासाची पुस्तके उघडायची गरज नाही. वीज नसलेल्या कोणत्याही खेड्यात एखादी संध्याकाळ घालवावी म्हणजे 'स्टोन एज'चा प्रत्यक्ष अनुभवच मिळेल.

यावर थोर थोर विद्वान लोक काम करत आहेत आपण बिचारे सामान्य माणूस काय करणार ? होय, करू शकतो. करायलाच हवं. कारण या जगात काही फक्त विद्वानच राहत नाहीत. आपण ही येथेच राहतो. राहायचा, जगण्याचा हक्क आहे तर जगवण्याची, जागवण्याची ही जबाबदारी आहेच.

आता बघू या एक सामान्य माणूस काय करू शकतो ते -

१५०० वाट  [watt] चा  एक घरगुती पाणी तापवायचा हिटर १ तास वापरला  तर १.५ किलोवाट ऊर्जा वापरली जाते. या एका तासात सामान्यत: तिघांचे अंघोळीचे पाणी गरम होऊ शकते.म्हणजेच प्रत्येकी २०मिनिटात एका व्यक्तीचे पाणी तापवून गरम करता येते.

भारताची लोकसंख्या १२० कोटी आहे. त्यातले फक्त १० टक्के लोक म्हणजे फक्त १२ कोटी लोक रोज विजेच्या उपकरणांनी पाणी गरम करून अंघोळ करतात असे समजू. तर आता यावर आधारित एक गणित सोडवू.
३ लोक १ तासात १.५ किलोवाट ऊर्जा वापरतात तर १२ कोटी लोक १ तासात किती ऊर्जा वापरातील ?

अगदी सोप्पं. १२ कोटी लोक एका तासात ६ कोटी किलो वाट ऊर्जेचा वापर करतील. हे फक्त रोजचं, फक्त एका वेळेचं व फक्त आंघोळीच गणित आहे !

आता हे खरंय की भारताचा बराचसा भाग कडाक्याच्या थंडीचा आहे. वर्षभर थंड पाणी वापरता येईल का ? आजारी, रोगी, बालके,गरजू इ. लोकांनी काय करावं ? असे प्रश्न मनात येणं स्वाभाविक आहे. त्यांची उत्तरे प्रत्येकाने स्वत:च शोधायची आहेत.

वरच्या ढोबळ हिशोबात तरुण व असेच लोक गृहीत धरले आहेत जे वर्षाचे किमान ८-९ महिने थंड पाणी वापरू शकतील. आपण जर कधी गंगा, यमुनेच्या पाण्यात डुबकी मारली असेल तर आपल्याला थंड पाणी म्हणजे काय याचा जीवंत अनुभव मिळाला असेल. अशा थंडगार पाण्यात लोक - गरीब व श्रीमंत दोन्ही ही - धर्माच्या, कर्मकांडाच्या श्रद्धेने स्नान करत असतात. बुद्धीप्रामाण्याने आलेली नास्तिकता कधी कधी इष्ट ठरत नाही. तर कधी कधी भोळी [अंध] श्रद्धा ही एकूण मानव जातीला उपकारक ठरते. त्यामुळे अंत:प्रेरणेने थंड पाण्याच्या भीतीवर मात करता येते.

थंड पाण्यानं आंघोळ करण्यासाठी काही टिप्स -
१] शक्यतो मर्द मावळ्यासारखं पाणी थेट डोक्यावर घ्यावं. पण तब्येत, वातावरण पाहून पायापासूनही सुरुवात करता येते. पाय, घोटे, पिंडऱ्या, गुडघे, मांड्या, कंबर याप्रमाणे खालून वर चढत्या क्रमाने अंग भिजवून ही स्नान करता येते.

२] आंघोळीपूर्वी थोडासा व्यायाम केल्यास शरीर गरम होवून थंडीची तीव्रता कमी होते.

३] किमान हाताने तरी थोडी मालीश केल्यासारखे अंग रगडून मग आंघोळ करावी.

४] जेवढा जास्त विचार करू तेवढी जास्त थंडी वाजते. कमी विचार, चटकन कृती व थंडी गायब.

५] पहिले दोन मिनिट व अंग पुसल्यानंतरचे २ मिनिट थंडी वाजल्याचा भास होतो तेवढा समजून घ्यायचा.

६] हू हू हा हा करून किंवा दातांची कटकट करून थंडीला प्रोत्साहन देवू नये.

७] थंडी शक्यतो कान, नाकाचा शेंडा, हात, पाय [व क्वचित गाल] इ. टोकाच्या भागास जास्त जाणवते.त्यांना तत्काळ गरम कपड्यांचे संरक्षण द्यावे.

थंड पाण्याने आंघोळ केल्यास शरीराचे किरकोळ रोग दूर होतात जसे सर्दी इ. तसेच मनाची मरगळ ही जाते.
[ इथे गरम पाण्याशी तुलना करू नये.]

 तर असं हे आपलं एक बादली थंड पाणी ही अशी वाया जाणारी ऊर्जा वाचवेल, साठवेल, गरजेच्या ठिकाणी पोचवेल. ही अशी बचतीची पोच आपल्या विकासाची पोच पावती देईल. तन मन व धन याची  समृद्धी वाढेल. अशी बचत जगात मान, सन्मान वाढवते. व्यक्तीचाच नव्हे तर समाज व राष्ट्राचा विकास अशा छोट्या-मोठ्या बचती व मान सन्मानाने होतो.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा