पृष्ठे

सोमवार, २० फेब्रुवारी, २०१२

अवघड 'ज्ञानेशलेणी' !

'ज्ञानेश्वर' मराठीला पडलेलं एक अभिजात सौंदर्यस्वप्न ! अमृतालाही पैजेत हरवण्याचा जाज्वल्य मातृभाषा प्रेमाभिमान आजच्या मराठमनात ज्यांनी जागवला तो भाषादीप शिरोमणी म्हणजे ज्ञानियांचा राजा ! शतकांची सात आवर्तनं झाली तरी मराठीचा बाज ज्ञानेशांच्या पाऊलखुणांचीच वाट पुसत जात आहे.

साध्या सोप्या शब्दांनी 'ओढाळ मनाला' ओढून घेणाऱ्या बहिणाबाईपासून 'चांद्रमाधवी' च्या दुर्बोध तरीही मनाला गुंगवणाऱ्या 'प्रदेशा' ची  'संध्याकालीन' सैरभैर सैर करवणाऱ्या कवी ग्रेस यांच्यापर्यंत मराठी सारस्वतांचे 'माहेरघर' अशा ज्ञानदेवांनी आपल्या भाषा सौष्ठवाचा एक दर्जेदार नमुना म्हणून अठराव्या अध्यायाची सुरुवात ही अशी पल्लेदार, अलंकारिक, दीर्घसामासिक, संस्कृतोद्भव, वैयाकरनांना आपले 'पंडिती' डोके खाजवायला  लावणारी 'दुर्बोध' भाषामंजिरीची आठवण करून देणारी अशी केली आहे - 
  
जयजय देव निर्मळ | निजजनाखिलमंगळ | जन्मजराजलदजाळ - | प्रभंजन || १ ||

जयजय देव प्रबळ | विदळीतामंगळकुळ | निगमागमद्रुमफळ | फलप्रद || २ ||

जयजय देव सकल | विगतविषयवत्सल | कलितकाळकौतूहल | कलातीत || ३ ||

जयजय देव निश्चळ | चलितचित्तपानतुंदिल | जगदुन्मीलनाविरल | केलिप्रिय || ४ ||

जयजय देव निष्कळ | स्फुरदमंदानंदबहळ | नित्यनिरस्ताखिलमळ | मूळभूत || ५ ||

जयजय देव स्वप्रभ | जगदंबुदगर्भनभ | भुवनोद्भवारंभस्तंभ | भवध्वंस || ६ ||

जयजय देव विशुद्ध | विदुदयोद्यानद्विरद | शमदममदनमदभेद | दयार्णव || ७ ||

जयजय देव देवैकरूप | अतिकृतकंदर्पसर्पदर्प | भक्तभावभुवनदीप | तापापह || ८ ||

जयजय देव अद्वितीय | परीणतोपरमैकप्रिय | निजजनितभजनीय | मायागम्य || ९ ||

जयजय देव श्रीगुरो | अकल्पनाख्यकल्पतरो | स्वसंविद्रुम बीजप्ररो - | हणावनी || १० ||
                                       श्री ज्ञानेश्वरी अध्याय अठरावा 

ही आहे मराठीच्या आरंभीच्या काळातील एक परिष्कृत अवघड 'लेणी' ! इच्छुकांनी रसास्वाद घ्यावा व ' द्यावाही ' !

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा