पृष्ठे

रविवार, २५ डिसेंबर, २०११

साहेबाची भाषा

 भाषा आपल्या भावभावना इतरांपर्यंत पोचवायचे एक माध्यम आहे. मानवी गरजांची पूर्ती करण्यासाठी भाषा एक महत्त्वाचे साधन आहे. सामान्यत: भाषेचे मातृभाषा व परभाषा असे दोन प्रकार करता येतात. मातृभाषा आपण जगत असतो.त्यामुळे तिचा वेगळा अभ्यास करायची गरज लक्षात येत नाही.परंतु पराभाषेचे आपले असे महत्त्व असते.

एखादी परभाषा एखाद्या प्रदेशात बोलली जाण्यात बऱ्याचदा आक्रमण, गुलामगिरी,व्यापार, मनोरंजन अशी बरीच कारके महत्त्वाची ठरतात. मराठी आणि अन्य भाषा एक स्वतंत्र अभ्यासाचा विषय आहे पण सहज उल्लेख केला तर  -
१] जननी भाषा म्हणून संस्कृत,
२] धार्मिक चळवळींची भाषा म्हणून अर्धमागधी [जैन] व पाली [बौद्ध],
३] आक्रमक म्हणून
       अ] अरबांची अरबी,
       आ] इराण्याची फारसी,
         इ] पोर्तुगीजांची पोर्तुगीज     
४] अरबी,फारसी व भारतीय भाषांची मिश्रित उर्दू
५] मराठ्यांच्या वाढत्या विस्ताराने कन्नड, मलयालम, तमिळ,तेलुगु, उडिया,बंगाली, हिंदी, राजस्थानी, गुजराती इ.

 या भाषांचा मराठीशी आलेला, येत असलेला संबंध आपल्या रोजच्या जगण्याचा व भाषेचा व्यवहार बदलत असतात. यात सर्वात प्रमुख भाषा म्हणजे साहेबाची भाषा - इंग्रजी होय.

 आपली इच्छा असो वा नसो आज [किमान भारतात] तरी इंग्रजी भाषा जीवन जगण्यातला एक अनिवार्य टप्पा ठरत आहे. बहुभाषिक असणं एका विकसित व्यक्तिमत्त्वाचं लक्षण आहे. कोणतीही भाषा चार टप्प्यांनी आत्मसात करता येते.
१] श्रवण  - लक्षपूर्वक व समजून घेवून ऐकणे.
२] भाषण  - इतरांना समजेल असे अर्थपूर्ण बोलणे.
३] वाचन - समजून घेवून वाचणे.
४] लेखन - इतरांना समजेल असे लिहिणे.

इंग्रजीच्या संदर्भात आपण बर्याचदा व्याकरणाच्या पुस्तकापलीकडे जात नाही. आपली इंग्रजी एक व्याकरणाचे पुस्तक [ सर्वप्रसिध्द तर्खडकर आणि  रेन व मार्टीन (Wren & Martin) ] अन् एक बऱ्यापैकी शब्दकोश या दोन चाकावर चालत असते. यात गैर काही नाही. या [दोन] मजबूत पायामुळेच भारतीय लोक जगात सर्वात जास्त चांगले व शुद्ध इंग्रजी बोलणाऱ्यांपैकी एक मानले जातात. एक वेळ खुद्द इंग्रज चुकीचं बोलेल पण खरा भारतीय आंग्लभाषी कधीच चूक इंग्रजी बोलायचा नाही. यामुळे मातृभाषेप्रमाणे लालित्यपूर्ण इंग्रजी जरा मागे राहून जाते असे वाटते.

या स्तंभात इंग्रजी भाषेतील शब्दांचा खजिना शब्द-परिवार [Word Family]  या प्रकाराणे सजविण्याचा प्रयत्न केला जात आहे.

मंगळवार, २० डिसेंबर, २०११

पायतानापासनं सुरुवात

'उफाड्याचा माल ते मातृदेवो भव मार्गे लीलासहधर्मचारिणी' इतक्या विस्तृत प्रतलात स्त्री पुरुषाच्या आयुष्याला व्यापून राहते. या स्तंभात एक मैत्रीण - हो, कोणत्याही विशेषणाशिवाय फक्त मैत्रीण - व फार झालं तर एक प्रेमळ जीवनसाथी एवढाच विस्तार अपेक्षून 'लेखनप्रपंच' केला जाईल. 

सामान्यत: मलमूत्र विसर्जनावर नियंत्रण येवू लागलं की व्यक्तीच्या लैंगिक भावनांचा विकास सुरू होतो. [याला अपवाद असू शकतो.] शरीरशास्त्र याला पौगंडावस्था म्हणतं. येथे आपण या कालाचा विचार करणार नाहीत तर या पुढच्या अवस्थेचा म्हणजेच तारुण्याचा विचार करणार आहोत.

तर महाराजा, आता आपण तरूण सुंदरी कशी आपलीशी करावी ते पाहू. [ पोरगी पटवायचे हे तोडगे प्रामाणिकपणे केल्यास एकापेक्षा जास्त पोरी मागे लागतील हा सावधगिरीचा इशारा देवून आम्ही सुरुवात करीत आहोत. ]

सामान्यपणे  कोणतीही पोरगी कोणाही पुरुषाच्या नजरेला नजर देत नाही तर एका नजरेत त्याला वरपासून खालपर्यंत पाहून आपली दृष्टी जमिनीकडे वळवते. याचा अर्थ असा नव्हे की ती तुमच्याकडे पहात नाही. डोळ्यांच्या कडातून नजरेची बंदूक नेम धरून उभी असते बरं का !

व्यक्ती म्हणजे काही पुतळा नाही. अंतर्बाह्य अभिव्यक्ती म्हणजेच जीवंतता होय. आता अडचण अशी की ही आंतरिक सुंदरता एका नजरेत दिसत नाही म्हणून आधी दृश्य शरीराच्या सौन्दर्यापासून सुरुवात करू. सार्वजनिक ठिकाणी चेहरा व हात वगळता सारं शरीर कपड्यातच बंदिस्त असतं म्हणून आपल्या सुंदरतेचे बरेचसे गुण कपड्यांनाच जातात.संपूर्ण वेशभूषेमध्ये पादत्राणांचा ही समावेश होतो.

आता जर पोरगी नजरेला नजर न देता पायाकडे पाहत असेल तर ? ......... तर महाराजा, चांगली वहाणे वापरावीत दुसरं काय ! [ विक्टोरियन काळात पियानोचेही नागवे पाय झाकले जायचे. तुम्ही तर चक्क एकविसाव्या शतकातील पुरुष आहात की राव ! ] पायतानं चांगली  म्हणजे महागडी नव्हेत. नायके किंवा रिबॉकचेच बूट हवेत असे नव्हे. बूटच हवेत असेही नव्हे. किंवा नेहमीच कोल्हापुरी चप्पल असावी असे ही नव्हे.  

आज पाय कशातही न घालता किंवा पायात काहीही न घालता कोणी फिरत नाही. विशेषत: जिथे पोरी पाहतील अशा ठिकाणी तर नाहीच नाही. [ म्हणजेच कॉलेजात, रस्त्यावर, ट्युशनला इ.इ.] मग मूळ मुद्दा पायतानं हा नाही. ती असावीत व ठीकठाक असावीत एवढेच ! 

मंग महाराजा, पोरगी  पटावी कशी ? तर राजे हो, पोरगी तुम्ही पायतान कसलं घालता याच्यानं नाही पटत तर घातलेलं पायातन कसं वापरता अन् वापरून झाल्यावर कसं सोडता, ठेवता याच्यानं तुमच्यावर मरते. जरा आपलं पायतान [ यात चप्पल, बूट इ.इ. सारं आलं.] काढून त्याचा तळ पहा. घासलेल्या टाचेवरून स्वभाव ओळखायचं एक शास्त्र आहे म्हणे ! आपल्या घासलेल्या टाचेवरून आपला स्वभाव ओळखा. डावीकडचा भाग जास्त घासला आहे की उजवीकडचा ? दिडक्या, पाऊण चालीनं संपूर्ण तळ न घासता विशिष्ट भागच घासला जातो. असं चालणं चुकीचं आहे व ते मुलींना बिलकूल आवडत नाही. तुमच्या पायतानाचा  संपूर्ण तळ जर सगळीकडे समान घासला जात नसेल तर तुमच्या चालण्यात व कदाचित पायातही दोष आहे. असा लंगडा घोडा शर्यत कशी जिंकणार ?

आता या बाबीकडं दुर्लक्ष केलं तरी पोरगी अजूनही उंबरठ्यातच आहे असं समजा. तिला जर मनमंदिरात आणायचं असेल तर आपण पायतान कसं सोडतो ते जरा पहा. पायतान सोडण्यापूर्वी ते घातलेलं असलं पाहिजे. म्हणून आधी पायतान नीट घाला व नीट चाला.  

बऱ्याच जणांना पाय फरफटत, पाय घासत चालायची सवय असते त्यामुळे चालताना पायतानांचा आवाज होतो. ते बरोबर नाही. अर्ध्या चपलेतच पाय ठेवून काही जण चालतात. हेही बरोबर नाही. पायाला घट्टे पडतील अशी घट्ट पायतानं नसावीत. बुटाचे बंद नीट बांधलेले असावेत. ते लोंबणारे नसावेत. सैन्डलचे पट्टे व्यवस्थित बांधलेले,लावलेले असावेत.

पायतानं  जशी नीट घालावीत तशी ती नीट सोडावीत.बंद बांधलेले असतानाच बुटातून पाय काढणारे विद्वान ही आहेत. ते काही विद्वत्तेच लक्षण नाही. बंद सोडून बूट काढावेत. पादत्राण कोणतंही असो  ते एका शेजारी एक असं एका बाजूला आडव्या ओळीत किंवा उभ्या रांगेत किंवा पायठेवतान [ पादत्राणे ठेवायचे लाकडी वा लोखंडी कपाट] जे जसे उपलब्ध असेल तसे ठेवावे. पुढे मागे, आडवे तिडवे, तिरपे असे कसे ही सोडू नये. सगळ्यात महत्वाचे म्हणजे अगदी दारातच, उंबरठ्यातच  अशी कुठेही आपली पादत्राणे सोडू नयेत. 

दाराबाहेर  एका बाजूला, एका ओळीत सोडलेली पादत्राणे घरादाराची तशीच मनाची ही सुंदरता वाढवतात. घाई गर्दीच्या वेळी नेमक्या ठिकाणी कमी वेळात सापडतात. योग्य प्रकारे वापरल्यास पायतानं दीर्घकाळ टिकतात. त्यांच्याशी घसट वाढली की त्यांचा घसारा कमी होतो. अर्थव्यवस्था बचतीची बढती दाखवते. अशा वाचलेल्या पैशातून सिनेमाची दोन  तिकीटं, मोगऱ्याचा गजरा किंवा गुलाबाचं फूल, दोघात शेअर करता येईल असा कटिंग चहा किंवा मलईदार नारळ किंवा.......किंवा........ असं बरंच काही येवू शकतं. 

दारासमोर 'सुंदर रांगोळी काढणारी कोणी एक' दारा आत हवी असेल तर सुंदर घरादारासोबतच ..... सुंदर मनाची ही  गरज असते असं सुंदर मन सजग प्रामाणिकतेनेच निर्माण होतं. अशी सजगता पायतानं नीट काढल्या-घातल्यानं वाढते. 

पोरीवाहो, गळयाच्यान सांगा बरं असला मैतर तुम्हाला नको का ?

[.......... आता अशा जातीच्या सुंदराला कोणती सुंदरी नाकारील बरं ? ]

गुरुवार, १५ डिसेंबर, २०११

मराठीतले एक अक्षरी शब्द

येथे मराठीतल्या एक अक्षरी शब्दांची यादी दिली जात आहे. ही यादी परिपूर्ण असेलच असे नाही. कृपया वाचकांनी यादी पूर्ण करावयास सहकार्य करावे.

१] अ = मराठीतील सर्व प्रथम स्वर. पूर्ण अर्थाचा शब्द म्हणून वापर होतो असे वाटत नाही. उद्गारवाचक शब्द  म्हणून वापर होत असावा. दीर्घ उच्चारीत अ हा ही उद्गारवाचक शब्द म्हणून वापरला जातो.

२] आ = मराठीतील दुसरा स्वर. पूर्ण अर्थाचा शब्द म्हणून वापर होतो असे वाटत नाही. उद्गारवाचक शब्द म्हणून वापर होत असावा. दीर्घ उच्चारीत आ हा ही उद्गारवाचक शब्द म्हणून वापरला जातो.

३] इ = मराठीतील तिसरा स्वर. पूर्ण अर्थाचा शब्द म्हणून वापर होतो असे वाटत नाही. उद्गारवाचक शब्द म्हणून वापर होत असावा. दीर्घ उच्चारीत इ हा ही उद्गारवाचक शब्द म्हणून वापरला जातो

४] ई = मराठीतील चौथा स्वर. पूर्ण अर्थाचा शब्द म्हणून वापर होतो असे वाटत नाही. उद्गारवाचक शब्द म्हणून वापर होत असावा. दीर्घ उच्चारीत ई हा ही उद्गारवाचक शब्द म्हणून वापरला जातो.

५] उ = मराठीतील पाचवा स्वर. पूर्ण अर्थाचा शब्द म्हणून वापर होतो असे वाटत नाही. उद्गारवाचक शब्द म्हणून वापर होत असावा. दीर्घ उच्चारीत उ हा ही उद्गारवाचक शब्द म्हणून वापरला जातो.

६] ऊ = मराठीतील सहावा स्वर. पूर्ण अर्थाचा शब्द म्हणून वापर होतो. ऊ केसांत राहणारा जीव आहे.माणसात उवा [या अनेकवचनाचा उच्चार 'वा' असा ही केला जातो.]  होतात. तशाच त्या माकडासह इतर काही केसाळ प्राण्यातही होतात. वचन = एक ऊ, अनेक उवा. उद्गारवाचक शब्द म्हणून वापर होत असावा. दीर्घ उच्चारीत ऊ हा ही उद्गारवाचक शब्द म्हणून वापरला जातो.

७] ए = मराठीतील सातवा स्वर. पूर्ण अर्थाचा शब्द म्हणून वापर होतो. एखाद्याचे लक्ष वेधणे, हाक मारणे, बोलावणे, संबोधन, पतीने आपल्या पत्नीला हाक मारण्यासाठी इ. साठी याचा वापर करतात. उद्गारवाचक शब्द म्हणून वापर होत असावा. दीर्घ उच्चारीत ए हा ही उद्गारवाचक शब्द म्हणून वापरला जातो.

८] ऐ = मराठीतील आठवा स्वर. पूर्ण अर्थाचा शब्द म्हणून वापर होतो असे वाटत नाही. उद्गारवाचक शब्द म्हणून वापर होत असावा. दीर्घ उच्चारीत ऐ हा ही उद्गारवाचक शब्द म्हणून वापरला जातो.

९] ओ = पूर्ण अर्थाचा शब्द म्हणून वापर होतो. हाकेला ओ देणे, प्रतिसाद, संबोधन, उद्गारवाचक शब्द म्हणून वापर होतो. दीर्घ उच्चारीत ओ हा ही उद्गारवाचक शब्द म्हणून वापरला जातो.

१०] औ = पूर्ण अर्थाचा शब्द म्हणून वापर होतो असे वाटत नाही. होय या अर्थाने हाव असा उच्चार करता करता औ असा ही उच्चार करून प्रतिसाद दिला जातो. उद्गारवाचक शब्द म्हणून वापर होत असावा. दीर्घ उच्चारीत औ हा ही उद्गारवाचक शब्द म्हणून वापरला जातो.

११] अं = पूर्ण अर्थाचा शब्द म्हणून वापर होतो असे वाटत नाही. उद्गारवाचक शब्द म्हणून वापर होत असावा. दीर्घ उच्चारीत अं हा ही उद्गारवाचक शब्द म्हणून वापरला जातो.

१२] अः = पूर्ण अर्थाचा शब्द म्हणून वापर होतो असे वाटत नाही. वेदना दर्शक व इतर उद्गारवाचक शब्द म्हणून वापर होत असावा. दीर्घ उच्चारीत अः हा ही उद्गारवाचक शब्द म्हणून वापरला जातो.

सामान्यत: उद्गारवाचक शब्द अर्थाच्या दृष्टीने सापेक्ष असतात कारण कोणती व्यक्ती कोणत्या कारणासाठी कोणत्या वेळी कोणता ध्वनी अर्थात उद्गार काढेल हे काही सांगता येत नाही. एकाच उद्गाराचे वेगवेगळया कारणांमुळे वेगवेगळे अर्थ होतात. उद्गार व्याकरणाच्या नियमांना बघून निघत नाहीत. त्यामुळे कोणताही ध्वनी जो उत्स्फूर्तपणे काही तरी व्यक्त करतो, कोणती न कोणती भावना प्रकट करतो तो उद्गारवाचक शब्द असू शकतो. या अर्थाने प्रत्येक वर्ण - स्वर व व्यंजन - उद्गारवाचक शब्द असू शकतो.



सोमवार, १२ डिसेंबर, २०११

प्रबुद्ध कृष्ण - काही छटा

'संत' या शब्दाची माझी व्याख्या अशी आहे - संत म्हणजे 'संबुद्ध तरुणता' ! संबुद्धता तारुण्याच्या कालजयी उत्साहाने वावरू लागली, की अमर 'अभंग' संतवचने अवतरतात. त्यातीलच एक म्हणजे -
" अंतरी निर्मळ वाणीचा रसाळ | त्याचे गळा माळ असो नसो |"
 यालाच मी 'प्रबुद्ध कृष्ण' म्हणतो.

अंतरीचे निर्मळत्व म्हणजे प्रबुद्धत्व ! खरे तर निर्मळ हा शब्द नकारार्थी आहे पण येथे तेच गरजेचे आहे. मळ, मलीनत्व काढून टाकणे ही प्राथमिक व अनिवार्य पायरी आहे  कारण एकदा का मालिन्य निघून गेले, की मग जे काही उरते ते शुद्ध, बुद्ध, सत्त्व अस्तित्त्व ‘असते जरी त्याला तत्वज्ञान्यांनी 'शून्य' म्हटले असले तरी !

असे पहा, की आपण एक खूप जुना किंवा खूप मलीन असा दिवा घेतला व त्याला घासून पुसून निर्मळ केले तर काय होईल ? मूळ धातू चकाकू लागेल ना ! आपण फक्त धातू वरील धूळ काढून टाकायची आतली स्वच्छता सुंदरता आपोआप दिसू लागेल. येथे नवीन काही निर्माण करायचे नाही. नवी कल्हई नाही, नवा धातू नाही, नवे मूलद्रव्य नाही ! काही काही नाही. फक्त वरचा अज्ञानाचा थर बाजूला करायचा की आत ‘अस्तित्त्व’ आहेच ! किती सोप्पं काम आहे ना ! पण हे निर्मळ करणं म्हणजे प्रबुद्धत्व नाही महाराजा ! ही क्रिया हे तंत्र आहे तत्व नव्हे. क्रियेचा परिणाम हे तत्त्व आहे. निर्मलीनत्त्व म्हणजे बुद्धत्त्व !

'दिव्याचा' मूळ धातू, रंग - रूप, स्वभाव जो नित्य, कोणत्या ही बंधनाने रहित असा आहे, स्वांतमग्न स्वानंद आहे तो  म्हणजे मूळ भाव, ते मूलतत्व हे आपले साध्य आहे. ते 'तत्' आहे. अंतस्थ दिव्याला साफ,निर्मळ करण्याची क्रिया म्हणजे तंत्र ही पहिली पायरी तर त्या साफसफाई नंतर जे मूळ सत्व उरते, दिसते, असते ते म्हणजे मूलतत्व हे अंतिम साध्य होय. हे तत्व बाहेरून थोडेच आणावे लागते ? ते तर आतच असते. फक्त दार उघडायची खोटी की प्रकाशाने  सारे घर उजळून निघालेच. हे आपले  मूळ सत्व म्हणजेच दिव्यत्व ! हे आपले  मूळ सत्व म्हणजेच बुद्धत्व ! प्रकृतीच्या  या मूळ चेतनेलाच मी 'प्रबुद्ध' म्हणतो.

प्रबुद्धत्वाची ही अवस्था खूप व चिरस्थायी आनंदाची आहे असा अनुभव ज्यांनी ती अवस्था प्राप्त करून घेतली त्यांचा आहे. हा आनंद प्रत्येकाला घेता येतो. नव्हे नव्हे तो त्याचा अधिकार आहे.ते प्रत्येकाचे जीवन ध्येयच आहे. का म्हणून आम्ही आनंदात राहायचे नाही ? का म्हणून आम्ही निराशेत, दु:खात राहायचे ? बिलकुल नाही. आनंद हा जगण्याचा मूलाधार आहे. तो आम्ही प्राप्त करून घेणारच घेणार ! आम्ही प्रबुद्ध होणारच होणार !

आता  हा आनंद, प्रबुद्धपण कसे मिळवायचे ? त्याचे अनेक मार्ग आहेत. आपापल्या आवडी निवडीवर, परिस्थितीवर ते अवलंबून आहे की कोणी कोणता मार्ग निवडायचा. सर्वात सोपा, सर्वाधिक लोकांनी वापरून सिद्ध केलेला, खूप खूप प्राचीन तरीही  आधुनिक असा मार्ग म्हणजे डोळे ‘उघडे’ ठेवून पहायचा मार्ग. नुसतं पाहणं नाही तर विशेषत्वाने पाहणं म्हणून वि + पश्यना. विपश्यना ही पद्धत सार्वकालिक, सार्वभौमिक, सार्वदेशीय तर आहेच शियाय सजीवाच्या - श्वास घेणाऱ्या सर्व सजीवांच्या - अस्तित्वाइतकीच आदिम व प्रत्येक श्वासाइतकीच प्रासंगिक ही आहे. ही पद्धत किंवा अशा पद्धती वारंवार जगाला आठवण करून देणाऱ्यांनाच ऋषी, बुद्ध, प्रेषित म्हटलं गेलं ते त्यांनी त्या पद्धती स्वत: वापरून बुद्धत्व प्राप्त केल्यामुळंच !

या परंपरेतला सर्वात प्रसिद्ध बुद्ध म्हणजे ‘सिद्धार्थ गौतम’ ! आपल्या अस्तित्वानं बुद्धत्वाचा अर्थ सिद्ध करणारा ! प्रबुद्ध या शब्दानं त्या सिद्धार्थ गौतमाची आठवण होत असेल तर ठीक पण मला व्यक्ती नव्हे तर त्याचे कार्य व त्या मूळ सत्त्वाची आठवण होते म्हणून पहिला शब्द ‘प्रबुद्ध’ !

पहिला शब्द अंतस निर्मळ करण्याकडे लक्ष वेधतो व त्याची एक पद्धत संकेतानं सांगतो, की बाबा रे ! या नावाच्या या माणसाच्या मागे मागे – अनुयायी म्हणून नव्हे तर सहप्रवासी म्हणून – गेलास तर तुही तेथेच पोहोचशील जेथे जायचं आहे.

दुसरा शब्द कृष्ण ! येथे मला तो महाभारती कृष्ण अपेक्षित नाही. जो आकर्षून घेतो तो कृष्ण ! शरीर व मनाला जे जे आकर्षित करतं ते ते सारं कृष्ण ! ‘ते’ बुद्धत्व साऱ्यांनाच आकर्षित करत असतं म्हणून ते कृष्ण आणि त्याचा आकर्षिण्याचा गुणधर्म म्हणजे कृष्णत्व ! ज्यांनी ज्यांनी बुद्धत्व प्राप्त केलं आहे त्यांनी त्यांनी साऱ्या जगाला आकर्षित केलं आहे पण आकर्षिणारं ते ते सारं बुद्धत्व नव्हे !

आकर्षित्व अनेक प्रकारांनी दिसून येतं. माझं आकर्षित्व हसतं, खेळतं, नाचतं, गातं, नांदतं आहे. त्याची धीरगंभीरता मंदस्मिता इतकचं खळाळून हसण्यानं भारीत आहे. त्याचं ‘असणं’ आनंदाची धाराप्रवाहिता वृद्धिंगत करणारं आहे. ते नुसतंच गोड नाही तर त्याला नवरसमंजिरीची रसाळ साथ आहे.  

अंतस निर्मळ झाले की वाणी आपोआपच रसाळ होतेच होते. महान वक्ते आपलं बोलणं विविध रसांनी कर्णमधुर बनवतात पण ते तेव्हापर्यंतच गोड वाटते जोवर ते वक्ते व्यासपीठावर उभे असतात. त्यांच्यातला वक्ता लाखोंना भारून टाकतो पण त्यांच्यातला माणूस किती लोकांना आकर्षित करेल हे सांगता येणं कठीण आहे. वाणी ही फक्त जीभेद्वारेच व्यक्त होते असं नाही. संपूर्ण तना - मनाने जे जे व्यक्त होतं, होऊ शकतं ते ते सारं वाणीचं वक्तव्यच असतं.
श्रोत्यांच्या कानांना संमोहित करणं त्यामानानं सोपं आहे पण आत्म्यांना भारीत तेच करू शकतात ज्यांचं अंतस निर्मळ आहे.


व्यक्त होणाऱ्या अस्तित्वाला तेव्हाच ‘व्यक्ती’ म्हणावं जेव्हा अस्तित्व निर्मळ व त्याचं व्यक्त होणं रसाळ असेल ! अशाच ‘व्यक्ती’ला मी ‘प्रबुद्ध कृष्ण’ म्हणतो मग त्याच्या गळ्यात कोणाची ही व कोणतीही ‘माळ’ असो !

एकदा का तुम्ही ‘प्रबुद्ध कृष्णा’त स्थित झालात की मग तुमच्या डोक्यावर पगडी आहे की पागोटे, कपाळावर बिंदी आहे की मांगेत कुंकू, गळ्यात माळ आहे की क्रास, हातात पाटी आहे की फाळ, कमरेला धोतर आहे की जीन्स, पायात पादुका आहेत की पंपशूज यानं काहीही फरक पडत नाही.

जे जे आनंदमय ते ते जीवन. हा आनंद हेच ऐश्वर्य जगण्यातले. हे ऐश्वर्य हाच ईश्वर आयुष्याचा. या ईश्वराचा शोध हे जगातले सार्थक. ही सार्थकता बाहेरच्या धावपळीने नाही तर आतल्या प्रवासाने प्राप्त होते. आतला प्रवास श्वासाच्या मार्गाने होतो. या मार्गावरील प्रवासाने एकदा का ‘अंतस’ निर्मळ झाले की ‘बाह्य’ सारे वाणीद्वारे स्रवणाऱ्या रसांनी न्हाऊन निघते. असं अंतर्बाह्य न्हाणं त्या आनंदाला प्रसवतं ज्याला समृद्ध ‘जगणं’ म्हणता येईल.                 

सोमवार, ५ डिसेंबर, २०११

समृद्धतेसाठी शुद्धता

 माणसाच्या अस्तित्वाला आणि त्याच्या समृद्धीला भाषेचा मोठा हातभार लागला आहे म्हणून भाषा जितकी समृद्ध तितका माणसाचा विकास जास्त ! भाषा समृद्ध होण्यासाठी ज्या बाबी महत्वाच्या ठरतात त्यात भाषेच्या शुद्धतेचा क्रमांक खूप वरचा आहे. पण भाषा फक्त शुद्ध असून चालत नाही ती प्रवाही व कर्णमधुर ही  असावी लागते. समृद्ध,प्रवाही, माधुर्यपूर्ण व शुद्ध भाषेसाठी कोणत्या किमान बाबींची गरज असते ?

१] किमान नियम अर्थात कमीत कमी व्याकरण.
२] वैविध्यपूर्ण, समृद्ध शब्द भांडार. 

या दोन चाकांवर भाषेचा रथ चालला तर तर ती भाषा सार्वलौकिक, सार्वकालिक व सार्वभौमिक होऊ शकते. चला तर मग आपल्या माय मराठीला समृद्ध बनवू या.





सोमवार, २८ नोव्हेंबर, २०११

माऊलीची अगम्यता



भाषेच्या विकासक्रमात दुर्बोधता हा अनिवार्य टप्पा असतो. अधिक माहितीस्तव मराठीतील सर्व प्रसिद्ध उदाहरण म्हणून कवी ग्रेस वाचावेत. सुरुवात अर्थातच मराठीची माऊली ज्ञानोबांपासून !

चिकित्सूंच्या माहितीस्तव ज्ञानेश्वरीच्या दहाव्या अध्यायातील या प्रथम पाच ओवी येथे मुद्दाम देत आहे. चिकित्सकांनी ही मराठी आहे की संस्कृत आहे हे सांगावे. मराठी असेल तर उदाहरणांसह [ अर्थासह ] सिद्ध करून सर्वांस उपकृत करावे. [ हे वेगळे सांगायची गरज नाही की, संस्कृतातील गीतेचा अर्थ सामान्यांना कळावा म्हणून ज्ञानेश्वरी लिहिली गेली.]

"नमो विशदबोधविदग्धा । विद्यारविंदप्रबोधा । पराप्रमेयप्रमदा । विलासिया ॥ १ ॥
नमो संसारतमसूर्या । अप्रतिमपरमवीर्या । तरुणतरतूर्या । लालनलीला ॥ २ ॥
नमो जगदखिलपालना । मंगळमणिनिधाना । सज्जनवनचंदना । आराध्यलिंगा ॥ ३ ॥
नमो चतुरचित्तचकोरचंद्रा । आत्मानुभवनरेंद्रा । श्रुतिसारसमुद्रा । मन्मथमन्मथा ॥ ४ ॥
नमो सुभावभजनभाजना । भवेभकुंभभंजना । विश्वोद्‍भवभुवना । श्रीगुरुराया ॥ ५ ॥"

कायद्याचे हात

' कानून के हात बडे लंबे होते है | ' अशी संवादफेक चित्रपटाला टाळ्या मिळवून देते. पण ह्या लांबलचक हातांचे गौडबंगाल काही लवकर उलगडत नाही. हे हात, हाताचे धड त्यांची लांबी - रुंदी, कामे इ.च्या फंदात पडत नाही, पडू इच्छित नाही. पण नियती कोणाला टळली आहे. ह्या कानून आणि कानूनच्या तावडीत आपण रोजच सापडत असतो. 'शहाण्यानं कोर्टाची पायरी चढू नये ' अशी म्हण आहे पण कायद्याची, कोर्टाची माहिती घेऊ नये अशी काही म्हण नाही. म्हणूनच आपण या सदरात कानुनाचे जे हात असे ते प्रशासन याबद्दल थोडी थोडी माहिती घेऊ.

भारतासारख्या  लोकशाही राज्यात जनता सर्वोच्च, सार्वभौम असते. भारतातले कायदे आपणच म्हणजे भारतीय जनता म्हणजेच [व्यावहारिक सोयीसाठी] या जनतेचे प्रतिनिधी कायदे निर्माण करत असतात.त्यात बदल करत असतात. जुने कायदे रद्द करत असतात. या प्रक्रियेच्या सुगमतेसाठी, सोपेपणासाठी या प्रतिनिधी मंडळाला  काही अधिकार , विशेषाधिकार मिळालेले असतात. या अर्थाने कायदे करणारे हे मंडळ संबंधित राज्यातील सर्वोच्च संस्था बनलेली असते.

आजचा काळ आधुनिक,अत्याधुनिक आहे म्हणूनच कमालीचा गुंतागुंतीचा झाला आहे. ही गुंतावळ जगद्व्याळ आहे. यातूनच शासन - प्रशासन निर्माण झाले,वाढले, विस्तारले आहे.

आदिम मानवी समाजात सुरक्षा, व्यवस्था, नियंत्रण, वाढ व विकासाचे एक साधन म्हणून शासन व्यवस्थेची निर्मिती झाली. इतिहास साक्षीला उभा आहे कमीत कमी शासनाचा नियम मोडून अनियंत्रित अधिकारहीचा वापर करणाऱ्या साऱ्या शाह्या आपल्या सुलातानंंसह लयास गेल्या आहेत. हा अतिरेक सोडला तर शासन- प्रशासन ही एक निकोप सामाजिक संस्था आहे.


सामाजिक संस्थांचं अस्तित्व समाजावर अवलंबून असतं न कि समाजाचं अस्तित्व संस्थांवर. आज आपण अशाच शीर्षासनात उभे आहोत. गरज आहे ती सरळ होण्याची. तरच जग सरळ दिसेल जसे आहे तसे.

आपण म्हणजेच आपले शासन-प्रशासन आहे. आज ते - म्हणजेच आपण -सुखाच्या रोजीरोटीला  पारखले आहे.त्यात योग्य ते बदल करायची गरज आहे. चला तर बदलून टाकू सारी जुने शिडे, पुन्हा उभारू नावे तारु.

आपण काही विसरत तर नाही ना ? प्रथम ज्याला बदलायचं आहे त्याला समजून तर घेऊ. लोक व त्यांचे लोक सेवक माहित करून घेऊ अन् मग खुशाल बदलाच्या वावटळी उठवू.

म्हटलेलंच आहे ना 'Well begin is half done.'



शनिवार, २६ नोव्हेंबर, २०११

अंताचा आरंभ !

बस अजून काही क्षण आणि हे घटिका पात्र भरेल अन् मग 'राम'राज्याबाहेर. अगदी अखेरचे. प्राणप्रिय राम चालला म्हणून प्रजा रडत आहे, अयोध्या सोबत यायचं आग्रह धरते आहे. नेहमीप्रमाणे. पण आज कशातच लक्ष लागत नाही. मन सारं सैरभैर झालंय. काय करावं काही कळत नाही. पुरोहितांचा मंत्रघोष कानांना बधीर करतोय. पर्जन्यराजाची कृपा की रामाच्या मागोमाग रामाचा सारा प्रभाव धुवून काढायची जणू लगबग सुरु झाली आहे. शरयूनंही आज नेहमीपेक्षा जास्तच अंग फुगवलं आहे. लक्ष्मण शरयुतच झेपावला असं कळलं होतं. हे पक्कं होतं की तो शरयू पार करून गेला नाही, जाणारही नाही. अन् सीता ? तीही आता परत येणार नाही.

कुठे जावं ? सीते पाठोपाठ की लक्ष्मणाच्या मागे ?

सीता. ती खरी भूमिकन्या होती. अरण्याचं तिला खूप आकर्षण. जन्मलीचं होती शेतात. झाडे, वेली, झरे, गुहा, खिंडी, वाटा, धबधबे, मूलकंद सारं सारं तिला आवडायचं. राजमहालापेक्षा तिला झोपडीत शांत झोप यायची. सारं आयुष्य नियतीनं तिला अरण्यावासाचंच वरदान दिलं.

अन् लक्ष्मण ? एक वेडा जोगी. रामावर जीवापाड प्रेम केलं त्यानं. का ? कुणास ठाऊक ! रामासाठी बापावर तलवार घेऊन धावणारा.लक्ष्मण. त्यालाच ह्या रामानं जायला सांगितलं. का ? तर वचन. रामवचन! सीतेला पाठवलं, लक्ष्मणाला पाठवलं, का ? तर रामवचन ! लोकापवाद ! अन् म्हणे रामराज्य. रामानं आयुष्यभर कुरतडत जगायचं, प्राणप्रियांना छळायचं, आयुष्यभराची भळभळती जखम द्यायची अन् घ्यायची का , कशासाठी ? तर रामराज्यासाठी ! मर्यादांच्या उत्तम पालनासाठी !!

का मिळाली ही चेतना 'राम' म्हणून जगण्याची ? का मिळालं हे 'रामपण' वानरांना ही आकर्षिणारं ?  का मिळाली ही 'जाण' राजेपणाची ? का मिळाले हे 'भान' समूह संघटनाचे  ? का मिळालं 'मोठेपण' ज्यानं राजसिंहासनाची जबाबदारी दिली ? का मिळालं ते 'सामर्थ्य' साक्षात विश्वमित्रांना साह्य करणारं ? का मोडलं गेलं परशुरामाचं ते शिवधनुष्य ज्यानं सीता मला मिळाली ? का मिळाली सीता मला आयुष्यभर सलवणारी ? का ? का ? का ?

मला तर हवा होता तो चंद्रमागता राम,  मला तर हवा होता तो दशरथश्वास  राम,  मला तर हवा होता तो गुरुसेवक राम,  मला तर हवा होता तो सीताभारीत राम,  मला तर हवा होता तो अरण्यसेवी राम ! असा 'राम' रामाला कधीच मिळाला नाही.

रामानं तेव्हाच 'राम' म्हणायला हवं होतं जेव्हा सीता तिच्या बागेला सजवत होती अन् राम गुरुपूजनासाठी त्याच बागेतील फुले तोडत होता. तिथेच आम्हां दोघांची पहिली भेट झाली. " ऋषीकुमार," तिच्या मंजुळ पण ठाम स्वरांनी माझी एकाग्रता भंग झाली. मी दचकलो. गुलाबाच्या काट्यांनी क्षमा केली नाही. रक्ताळ अंगठ्याला दाबून धरत मी वळलो. " ही माझी बाग आहे व आपण पूर्व परवानगी न घेता खुशाल फुले तोडत आहात." तिच्या धनुष्याकृती भुवया अधिकच वक्रावल्या होत्या. मी घायाळ. स्तब्ध. दोन क्षण आणि ती खुदकन हसली. " एवढं घाबरू नका ऋषीकुमार." तिनं वाकून जखम जोडीचा पाला तोडला, चिमटीत दाबून रस काढला व तो माझ्या  रक्ताळ अंगठ्यावर लावून माझा अंगठा दाबला. मी शहारलो तेव्हाच सीता नाम धन्य झालो !

........किंवा मग धनुष्याला प्रत्यंचा लावताना माझ्या कपाळावर फुगलेली शीर पाहून विवाह साजसज्जित, शृंगार सुंदरा सीता नजरेला नजर देत मंद स्मित करत होती. ते स्मित माझ्या दंड बाहुंना आव्हान देवून गेलं अन् क्षणांत ते मजबूत शिवधनुष्य कडाड कड आवाज करून दोन भागात भंगलं. खरा विश्वामित्र शिष्य शोभलो जेव्हा सीतेने स्वीकारोक्ती नजरेनं पापण्या झुकवल्या. इथे ही 'राम' म्हणाला हरकत नव्हती. दुसऱ्यांनी राम नावाचा जयघोष केला अन् मी नियतीच्या फेऱ्यात अडकलो.

........किंवा मग वल्कलधारित सीतेच्या हातची कंदमुळे ओठांची गोडी वाढवत असताना  लक्ष्मण रक्षित शरदाच्या रात्री श्वासांची उष्णता चंद्राला धुसर बनवत असताना .........

.........किंवा आश्रमहरिणी सुस्नात सीता धबधब्याच्या धारेपल्याड पद्मासनात ध्यानास बसायची तेव्हा त्या जलप्रपाताचं ते प्रचंड संगीत त्या स्वच्छ नितळ पाण्याच्या पडद्या आडच्या त्या प्राणप्रियेचं जे रूप मनावर कोरायचं तेव्हा तरी 'राम' म्हणायची वेळ नक्कीच होती किमान माझ्यासाठी तरी.

पण........

आयुष्यात एक सीता 'पण' जिंकला आणि आणि आयुष्यभर सारा 'राम' पणात हारत गेलो. 'राम' कळायला अजून किती वेळा राम व्हायला हवं ते काही उमगत नाही.

लव-कुशासह आम्हां भावंडाची सारे मुले - सुना व त्यांची दळे घटिका पात्रावर नजरा ठेवून आहेत. माझ्या पाठोपाठ सारे आपापल्या क्षेत्रास जातील. आमची मुलं म्हणजे आम्ही तर नव्हेत ना ! त्यांना पराक्रमासाठी दिशा वाटून दिल्या. लव-कुश राम-लक्ष्मण आहेत पण राहतीलच कशावरून ? नकोच ते. अश्वमेधाचे वारू नेहमीच केंद्रोत्सारी हवेत.

राजवस्त्रे उतरत होती. जगासाठी मी वानप्रस्थाला जात होतो पण मला माहित होतं मी आता वनात जाणार नाही. सीतेच्या भेटण्याची भीती नव्हती तरीही. मला माहितेय, 'राजा' रामावर कोणीही प्रेम करत नाही, केलं नाही. ना सीतेनं, ना लक्ष्मणानं, ना अगदी रामानंही. 'राजा' राम अगदी ....... अगदी एकटा होता, असतो, राहील. आज राजेपणाची सारी चिलखतं उतरवून निघालो होतो 'रामापार' !

   

शुक्रवार, २५ नोव्हेंबर, २०११

ययातीची अमरता

प्राचीन भारतीयांनी इतिहासाला भूतकाळाऐवजी संस्कृती-मूल्यांचा आधार दिला. ज्याचे स्वत:चे असे फायदे तोटे मिळाले. ज्यांची ऐतिहासिकता अजून पूर्णपणे सिद्ध, मान्य झाली नाही पण संस्कृती - मूल्यता सार्वकालिक, सार्वलौकिक अन् सार्वभौमिक मान्यता पावली त्या भारतीय महाकाव्यांनी - रामायण, महाभारताने - भारतीय जनमानसावर केलेले गारुड हा एक अभ्यासाचा विषय आहे.

अगदी विसाव्या शतकातसुद्धा आधुनिक भारतीय भाषांना महाभारताने विषय पुरवले आहेत. मराठीला पहिलं ज्ञानपीठ देणारी  सर्वप्रसिध्द कादंबरी ' ययाती ' महाभारताचीच देन आहे. आज पुन्हा एकदा महाभारत घडतंय पाल्य - पालकांत, सोप्या शब्दांत  आई-बाप व मुलांत, सरत्या उगवत्या दोन पिढ्यात आणि म्हणूनच ययातीची पुन्हा आठवण झाली कारण त्याची प्रासंगिकता आम्ही आमच्या कृतीनं अमर बनवली आहे.

मूळ ययाती व खांडेकरांची `ययाती` बऱ्याच विषयांना स्पर्श करतात.फक्त एवढी एकच कादंबरी नीट समजून घेतली तरी एका सामान्य माणसांचं जगणं सुसह्य होईल इतका आवाका यात आहे. आज आपण त्यातल्या एका बाबीवर विचार करू.

ययातीची  गोष्ट एक रेखीय नाही तर ती एक वर्तुळाकार कथा आहे. म्हणजे ययातीचं  ययातीपण एका बिंदूची, घटनेची देन नसून घटनांच्या शृंखलाचं अस्तित्व आहे. सामन्यत: ययाती काममोहित, कामपिपासू व्यक्ती म्हणून ओळखला जातो पण ययाती फक्त इतकाच नाही. तो अजूनही बराच काही आहे.

काम  ऊर्जा निसर्गाची देन आहे, काममोहित होणं असंयमाचं लक्षण आहे, कामपीडित असणं दमनाचा अतिरेक आहे व कामवासना संस्कृतीची विकृती आहे.

काम  ऊर्जा निसर्गाची स्थिती आहे. ती निसर्गाची गरज आहे, निसर्गाच्या अस्तित्वाचा आधार आहे म्हणून ती प्रकृती आहे. कामवासना मनाची विकृती आहे कारण तो हव्यास आहे. गरजेपेक्षा जास्तीची मागणी आहे. निसर्गाच्या विरोधात बंड आहे. ययातीला हा हव्यास परंपरेने मिळालेला होता. त्याची सुरुवात स्पर्शभावित प्रेमाच्या नकाराने होते.

ययातीचा पराक्रमी बाप इंद्राचं राजसिंहासनप्राप्त करतो व इंद्राणीच्या उपभोगाची इच्छा करतो. इंद्राणी मागणी करते की जर तू विद्वान, ऋषी मुनींनी वाहून आणलेल्या पालखीत बसून येशील तरच मी तुझा स्वीकार करीन. पालखीत बसलेल्या कामांध राजाला दुबळ्या विद्वानांची मंद गती सहन न होऊन तो एका ऋषीला लाथ मारून वेगात चालायला सांगतो व ऋषी त्याच्या वंशाला सुखी न होण्याचा शाप देतो.

अशी सुरुवात मिळालेला ययाती. ययातीची आई आपल्या स्त्रीलंपट नवऱ्याला बांधून ठेवण्यासाठी आपल्या यौवनाचं रक्षण,संवर्धन करण्यावर जास्त लक्ष देते. ती तिची अनिवार्यता आहे. सवतीमत्सराच्या जीवघेण्या जगण्यापेक्षा मुलांना त्यांच्या हक्कांपासून,गरजांपासून दूर ठेवलं जातं.

ययाती आईच्या दुधाला पारखा होतो कारण त्याच्या आईला त्याच्या बापासाठी आपल्या छातीचे उभार ओघळू द्यायचे नव्हते. ही पुरुषसत्ताक मानसिकतेची परिणती होती व आजही आहे.

जोपर्यंत  फ्राइड पूर्णपणे चुकीचा ठरून नाकारला जात नाही तोपर्यंत तरी तो एक मानसशास्त्रज्ञ आहे. तो म्हणतो माणसाचं व्यक्तीमत्व त्याच्या बालपणीच्या अनुभवांनी आकारास येतं [ वाचा फ्राइड- मनोलैंगिक विकास ]. ययातीची कामपिपासा त्याच्या मातृप्रेमाच्या गरजेची प्रतिक्रिया तर नव्हे ? कोण जाणे ?

आजही अशा खूप स्त्रिया आहेत ज्या आपल्या मुलांना स्वत:चं दूध पाजत नाहीत. गृहीत धरा त्यातल्या ९० % स्त्रिया योग्य, वैद्यकीय कारणांमुळे दूध पाजत नसाव्यात. [ हे गृहीतक लेखक पुरुष आहे व त्याला स्त्री राज्याची पूर्ण माहिती नाही यावर आधारित आहे.] पण उरलेल्या १० % स्त्रिया ज्या जाणता-अजाणता आपल्या तान्हुल्यांना आईच्या दुधापासून वंचित ठेवत आहेत त्यांचं काय ? सावधान माता `कुमाता' बनू नयेत.

आजकाल सरकार तर्फे यासंदर्भात बऱ्याच जाहिराती, प्रदर्शने जनहितार्थ प्रकाशित होत आहेत. डॉक्टर सामान्यत: सर्वच स्त्रियांना किमान सहा महिने तरी नवजात शिशुंना आईचे दूध पाजण्याचा सल्ला देतात. विचार करण्यासारखी गोष्ट अशी की, गरीब, अशिक्षित स्त्रियांमध्ये दूध न पाजण्याची मानसिकता दिसून येत नाही जर तसेच काही सबळ कारण नसेल तर. शरीराचे सौंदर्य हा आधार जाणून बुजून असो की न जाणता असो उच्चभ्रू, उच्च शिक्षित, श्रीमंत स्त्रियांत हे प्रमाण तुलनेने जास्त आहे.

कल्पनारम्य, ललित, अनैतिहासिक असे महाभारत असो की ययाती कादंबरी असो ,फ्राइड असो की सरकारी जाहिराती, डॉक्टर सांगोत कि न सांगोत नवजात शिशूंचा हा हक्क आहे, ती त्यांची गरज आहे आणि ही बाब पूर्णपणे वैज्ञानिक व प्रासंगिक आहे की आईचे दूध प्रत्येक बालकाला किमान सहा महिने मिळालेच पाहिजे.

एका  स्वस्थ, निकोप व्यक्तिमत्वासाठी व सुरक्षित समाजासाठी हे मातांनो, तुम्ही आपल्या पाडसांवर प्रेम कराल ना ?


सोमवार, २१ नोव्हेंबर, २०११

पुसती लक्ष्मणरेषा

सरत्या पावसाची भुरभूर तनामनाला भिजवत होती तरीही थंडावा काही मिळत नव्हता. नेहमीच्या गतीने जात होतो तरी पायातलं जडत्व मरणयातना देत होतं. पहाटतारा उगवण्यापुर्वी जायचं होतं दूर. खूप दूर. अनंतापार. माझी दत्तचित्त चेतना गेल्या काही रातींपासून प्रचंड अस्वस्थ झाली होती. आता असह्य झालं होतं. उर्मिलेला ते जाणवलं होतं पण तिनं काही विचारलं नाही. नेहमीप्रमाणे. आजची सांज एक गहन स्वस्थता देवून गेली. आता निर्णय पक्का झाला होता.

रामद्वारावरचा हा शेवटचा पहारा असणार होता. पहाऱ्यासाठी नेहमीच भांडणारा भरत आज कसा कोण जाणे एकदम तयार झाला. दुसरा प्रहर होईस्तोवर प्रकृती, नगर आणि राजकाज शांत झालं. नेहमीची शांतता असह्य होत होती. रामदादाचे डोळे माझ्या अस्तित्वानं अर्धोन्मिलीत झाले. अर्धा लक्ष्मण तेव्हांच मेला होता ज्यावेळी रामानं सीतेची लंकेत अग्निपरीक्षा घेतली होती. त्यावेळेपासून लक्ष्मणाचे ओठ अन् रामाचे डोळे परस्परांसाठी अर्धोन्मिलीत झाले.

नेहमीप्रमाणे  साष्टांग नमस्कार न करता मी गुडघे टेकून दोन्ही हात व कपाळ रामाच्या पायावर ठेवलं कारण आता निर्णय पक्का झाला होता. साष्टांग नमस्कार केला अन् पुन्हा त्या जुन्या रामप्रेमानं उसळी मारली तर ....  हा तर टाळायचाच होता. तरीही शेवटी डोळ्यांनी दगा दिलाच. अश्रूंच्या शरयूधारा रामचरणांना भिजवू लागल्या. पण नेहमीची लक्ष्मणवाणी खोल ह्रदयगर्भातून कपाळ टेकल्या वेदनेतून वर आली.

" दादा, आता आज्ञा द्यावी."  शेवटच्या हस्तस्पर्शानं शेवटची मागणी केली.

" तूही जाणार लक्ष्मणा  ? "  रामाच्या त्या दोन अश्रूंनी धनुष्य ठेवून राकट झालेल्या माझ्या खांद्यांना विचारलं.

सारं  बोलणं न बोलताच संपलं. मी उठलो. रामाच्या अश्रूंनी भिजलेला कंठा मंद उजेडात चमकला. प्राणप्रिया सीतेच्या वियोगानं झाडांना कवटाळून रडणारा राम मी पाहिला होता, शक्ती लागल्या लक्ष्मणाला मांडीवर घेवून रणांगणावर रडणारा राम मी पाहिला होता त्या `रडक्या` रामांनी मला आपल्या प्रेमात बांधून ठेवलं होतं पण आजचा हा अश्रूनयन राम मी स्वत:हून सोडून जात होतो.

रामाशिवाय मी जगूच शकत नव्हतो पण आता रामासोबत जगणं ही शक्य नव्हतं. जिच्या रामप्रेमाच्या प्रेरणेनं आजवर मी रामासोबत होतो ती रामप्रिया सीता ही आता नव्हती. आजवर ज्या लोकसेवेच्या निष्ठेनं राजकर्तव्यांचा  काटेरी सहवास सहन केला, ज्यांनी रामाला राम म्हणून जगू दिलं नाही,सीतेला सीता म्हणून जगू दिलं नाही त्यांच्यासाठी आता लक्ष्मणानं का जगावं ?

सीता  वहिनी गेली आणि मी  त्या वचनातून मुक्त झालो जे तिला वाल्मिकीच्या आश्रमात सोडताना दिलं होतं. अजून ही लख्ख आठवतंय, सीतेला वाल्मिकींच्या आश्रम सीमेवर सोडलं तेव्हा आभाळही रडत होतं.

"लक्ष्मणा रथ का थांबवला ?" या प्रश्नानं दाबून धरलेला माझा बांध फुटला. एक क्षण आणि तिच्या चेहऱ्यावरचं आश्चर्य मावळलं.

" पुन्हा एकदा 'राजा' राम !" आपलं गर्भार जडत्व सावरत ती एवढंच म्हणाली.

मी रथाचा ध्वजदंड धरून स्वत:ला सावरत होतो. सीतेनं माझ्या खांद्यावर हात ठेवला.

" मला आधार दे, लक्ष्मणा ! " वाणीची धार व हाताची पकड त्या सुकुमार शरीराला जुळत नव्हती. ही सीता माझ्यासाठी नवीन होती. मी शहारलो.

सावकाश रथातून उतरत ती म्हणाली," ही बेहद्द रामप्रेमाची फळं आहेत बाबा."

माझा हात हातात घेवून ती म्हणाली," आठवतंय का लक्ष्मणा, ती मारीच हाक ? परशुरामाला हरवणाऱ्या रामाची आसमंतात गर्जलेली ती आभासी हाक त्या मारीच्याची शेवटची मृगमरीचीका ठरली. अन् माझ्या हृदयानं तुझ्या चारित्र्यावर असूड फोडले त्या वेड्या रामाप्रेमानंच ना ! कधी कधी संस्कृतीचे संस्कार संहारास कारणीभूत होतात. तू नको म्हणाला होतास तरी मी भिक्षादानाच्या महान पुण्य प्रेमाला बळी पडून लक्ष्मणरेषा ओलांडली अन्  रामायण घडवून आणलं तेही प्रेमानंच ना ! आज पुन्हा त्या प्रेमानंच तुला मला एक वचन द्यावं लागेल बघ."

"माझ्या  मागे रामाची साथ सोडणार नाहीस ना ! तो खूप एकटा आहे रे ! आणि एक गुपित सांगू का ? रामाला सोडून सगळ्यांना सांग. सीतेपेक्षा ही लक्ष्मण रामाच्या खूप जवळ आहे रे !"

ही वेदना होती की काय मला कधीच कळलं नाही. मी भरल्या गळ्यानं म्हणालो," सीताराम हेच माझे प्राण,वहिनी !" तिचं तेव्हाचं भविष्य सूचक मंद स्मित मला आज उमगलं.

अंधाऱ्या चिखलात तिची पद्म पावलं उमटवत  जाता जाता  मात्र ती कडाडली ," आणि म्हणावं त्या महाबाहोला - ज्यानं ते महान शिवधनुष्य मोडून मला जिंकलं होतं - सीता ही एक क्षत्राणि आहे, जिनं त्याच शिवधनुष्याचा गाडा-घोडा करून आपले खेळ खेळले होते, तिच्यावर असं सामान्यांसारखं प्रेम करू नकोस. सोहेच्या क्षमतेने ही भूमी कन्या सीता सारं काही सहन करील पण असा लेचापेचा, कुंपणाआडून प्रेम करणारा  राम तिला बिलकुल आवडणार नाही."

सीता  गेली अन् रामातला `राम' गेला म्हणजे आता सीताही नाही आणि राम ही नाही मग लक्ष्मणाचं  अस्तित्व ते काय ?  मी निघालो. अनंताच्या प्रवासाला.

रामाच्या महालाबाहेर येवून मी उर्मिलेला एवढंच म्हणालो," मी जातो उर्मिला " तिनं माळता गजरा तसाच ठेवला. थंड दगडी पाउल वाटेवरच्या माझ्या पावलांनी राम, उर्मिला व अयोध्येचा निरोप घेतला. अथांग शरयूच्या प्रवाहानं मला अलगद कवेत घेतलं तेव्हा कोणतंही प्रेमळ अस्तित्व साक्षीला नव्हतं मला अडवून धरायला.


रविवार, २० नोव्हेंबर, २०११

गबरू दोस्त

दुसऱ्या दिवशीही वाघोबाने नाकासमोरच्या माश्या चुकवताना मान हलवली व त्याच वेळी मातोश्री वाघीण बाईंची शेपटी चाबुकाप्रमाणे चालली अन् गुबगुबीत वाघोबा थेट अस्वल काकांच्या मधाच्या बरणीला धडकला. "अरे हो, हो सावकाश." अस्वल काकांनी त्याला सावरलं तोवर वाघ-वाघीण झेपा टाकत निघुन गेले.

वाघोबा उभा रहात होता तोच हांकचू हांकचू करत एक प्राणी उड्या मारतच आला अन् अचानक कोलांटी उडी मारून अस्वल काकांना धडकला. "शाबास गबरू आज फक्त एकदाच पडलास." अस्वल काकांनी डोळे मिचकावत म्हटलं व वाघोबाची ओळख करून दिली." गबरू हा तुझा नवा दोस्त वाघोबा आणि बरं का वाघोबा हा आमचा पहिला विद्यार्थी गबरू गाढवे."

"ये मित्रा गळाभेट करू " गबरू दोन पायावर उभा रहात म्हणाला.वाघोबानं त्याची गळाभेट टाळण्यासाठी झेप टाकली पण दोघे ही अंग न आवरून थेट अस्वल काकांच्या पोटावर धडकले."शाबास ! चांगली गुरुदक्षिणा देताय लाथा घालून " असं म्हणून अस्वल काकांनी दोघांना उठून बसवलं व नेहमीच्या सवयीनं दोघांना गुदगुल्या केल्या.मग काय त्या द्वाड पोरांनी त्यांनाही गुदगुल्या केल्या. अशी दंगामस्ती बराच वेळ चालली. इतकी की ते तिघेही हसून हसून तिथेच पसरले व तो दिवस संपला.

रात्री  वाघोबाला कुशीत घेवून त्याचं अंग चाटत वाघिणीनं विचारलं, "आज काय शिकवलं माझ्या बाळाला ?" एका दिवसातच बाळ हुशार झाला होता. तो म्हणाला," गुदगुल्या कशा कराव्यात व कशा करू नयेत."
" म्हणजे काय ?" " अगं आई , हा माझा पहिला धडा आहे." "असा का ?" म्हणून वाघोजीनी वाघोबाला गुदगुल्या करायला हात पुढं नेला. वाघोबा पटकन वाघिणीच्या मागे लपला व वाघोजीचा हात वाघिणीला गुदगुल्या करून गेला. सटाक करून वाघिणीची शेपटी वाघोजीच्या हातावर बसली "हा काय चावटपणा "वाघोजीनी  हसत म्हटलं, "बेटा धडा तर भलताच कठीण आहे." "झोपा आता." वाघिणीची डरकाळी गुफाघर हादरवून गेली पण तोवर वाघोबा गाढ झोपी गेला होता. 







पौष्टिक `पालक' !

सुट्टीचा वार रविवार. दुपारची घोरती शांतता. कुमारी मनीमाऊ, वय वर्षे ५,आजोबांचा चष्मा इवल्याशा नाकावर टेकवून दोन्ही हातांनी हनुवटीला आधार देवून पालथी झोपून काही तरी वाचत होती. चेहऱ्यावरचे धीर-गंभीर भाव दुपारच्या शांततेत भर टाकत होते.अचानक जाग आल्यावर आजी बाहेर आली. मानसी अर्थात मनीमाऊ झोपली असावी असं समजून आजी तिच्या जवळ गेली तर बाईसाहेब एकाग्रतेने वाचत होत्या."काय वाचतेस माऊ ?" आजीने विचारलं. पहिलं पान दाखवत माऊ म्हणाली," आदर्श बालसंगोपन." आजीच्या विस्फारल्या नजरेचं उत्तर देत ती म्हणाली,"अगं आजी, मला नको का कळायला की माझं संगोपन कसं व्हायला हवं व ते तसं होतंय की नाही ?"

हा एक विनोद असला,वाटला तरी ती काळाची अनिवार्यता आहे. बालकांच्या बालक म्हणून असणाऱ्या व ते बालक आहेत म्हणून त्यांच्यावर लादल्या जाणाऱ्या समस्या एक मोठी सामाजिक अव्यवस्था निर्माण करत आहेत. बालकांच्या एक व्यक्ती म्हणून होणाऱ्या विकासाला आई-बाप, पालक, कुटुंब, नातेवाईक, शेजारी, मित्र, पर्यावरण, सामाजिक संस्था, शारीरिक मानसिक बौद्धिक आत्मीय  आर्थिक राजकीय सामाजिक असा एकूणच परिवेश कारणीभूत ठरतो.

आपण येथे वरील सर्वांचा विचार करू या. एक सुजाण,स्वस्थ व्यक्ती व समाज निर्माण करण्यात आपापला खारीचा वाटा उचलू या.

शुक्रवार, १८ नोव्हेंबर, २०११

हेचि फळ तव तपाला !

"मुनिवर, हे काम तुम्हीच करू शकता. माझी शपथ आहे तुम्हांला. लिहून ठेवा हे सगळं. त्याशिवाय जगाला कळणार कसं की ही रमवणारी रामकथा नसून सतावणारी सीताकथा आहे." असं म्हणून कोसळत्या पावसात मला सावरायची संधी न देता सीता गर्द अरण्यात निघून गेली.

मला माहीत होतं ती तिच्या नेहमीच्या आवडत्या त्या काळगुहेतच जाणार. पण यावेळी पुन्हा परत न येण्यासाठी. बऱ्याचदा मी तिचा पाठलाग करत तिथंवर गेलो होतो.पण आत जायची हिम्मत झाली नव्हती. मृत्युदर्शी लांबीचा गडद अंधार होता आत अन् त्यावेळी त्या गर्भवती सुकुमार राजमहिषीचं ते एक अत्यंत आवडतं ठिकाण होतं. आजसुद्धा आहे. बऱ्याच वर्षांपासून त्या भागात रहात असूनही मला ही गुफा सापडली नव्हती.पण सीतेनं कसं कुणास ठावूक ते ठिकाण आश्रमात येताच शोधलं होतं. त्या गुहेचा आकार - उकार अनाकलनीय होता जणू भूगर्भीय पाताळाचं प्रवेश द्वारच !

गेली. सीता गेली. परत न येण्यासाठी गेली. ती भूमिपुत्री आपल्या भूमातृ गर्भात सामावली. त्या काळगुहेत गेली अखेरची. अन् रामातला सारा रामच गेला.सारी रम्यता गेली. सारी सीतलता गेली. तो आजानुबाहू राम आपादहस्त राम झाला.

मी नयनाभिराम पाहिला होता. मी बाणपाणि राम पाहिला होता. मी राजदंडपाणि राम पाहिला होता. मी राजा राम पाहिला होता. मी रणसिंह राम पाहिला होता. मी अगतिक राम ही पाहिला होता पण हा निसत्त्व राम मला पाहवेना. पडत्या पावसाची कृपा की राजमुकुटावरून ओघळत्या जलधारांसह ते रामाश्रू ही मुक्तपणे झरत होते.

दिसूनही कळत नव्हतं जगाला की हा रमवणारा ही  रडतोय. अदृश्य राजमुकुटाचे मोती ओघळत होते. आयुष्यात पहिल्यांदा. सर्वांसमोर. मुक्तपणे. राजासह प्रजा खालमानेनं राजधानीकडे वळली.त्या शापित राजधानीकडे जिला व जिच्या राणीला परस्परांचं सहवास सौख्य नव्हतं.

सीमेचं आपलं असं अस्तित्व जवळ जवळ नसतंच पण काम मात्र खूप मोठं असतं दोन खंडांना जोडण्याचं. नियतीला आपल्या खेळात स्वत:कडून स्वत:च स्वत:ला  रडवून घ्यायची खूप वाईट खोड आहे. नारदाच्या नादानं 'बी घडलेला' मी - वाल्मिकी - चिखल तुडवत माघारा वळलो.

ना त्या दिवशी तो नारद भेटला असता ना मी वाल्या कोळी वाल्मिकी बनलो असतो. अजूनही आठवतंय. त्यादिवशी माझ्यारुपानं साक्षात मृत्यु समोर असताना ही नारदानं मला स्वत: साठी जगायची नजर दिली कारण मी ज्यांच्यासाठी जगत होतो ते माझ्या अनिष्टाचे भागीदार होऊ इच्छित नव्हते. हा स्वचा शोध मला माहीत नव्हता. नारादानं काही तरी साधना करायला सांगितली. मला काय माहीत साधना कोणत्या घरी राहायची ते.

हसून नारदानं म्हटलं होतं," तुझं मन ज्यात रमेल ते कर." तो खरा गुरु बनत होता.मी इरसाल शिष्य झालो होतो. मला त्याच्याकडूनच मंत्र,साधन हवं होतं. माझी इच्छा गुरूनं नुसतं मार्ग दाखवण्याइतपतच मर्यादित राहावं अशी नव्हती तर मला काही काळ तरी उचलून घ्यावं अशी होती.नारादानं एक पांगुळ गाडा हाती दिला. "राम,राम,राम." कधीतरी मी स्वत:हून चालावं यासाठी. भले शाबास ! आम्ही पांगुळ गाड्यालाच विमान समजून चालत राहिलो. त्यातच रमलो. त्या ऋणानुबंधानंच ऋषी झालो.

अजूनही आठवतोय तो दिवस. पावसानं  सृष्टीला न्हाऊ घातलं होतं. सवयीनं मी प्रात:स्नानाला निघालो होतो. उगवत्या सूर्याच्या साक्षीनं त्या रम्य वेळी एक क्रौंच जोडपं मैथुन प्रेमात मग्न होतं. माणसापेक्षा हे पक्षीच खरे हुशार ज्यांनी मैथूनाला अंधाऱ्या रात्रीची काळीमा दिली नाही. सहज लक्ष गेलं अन् कळायच्या आत एक जोडीदार शिकाऱ्याच्या बाणाला बळी पडला. इतक्या दिवसांची तपश्चर्या बनली की बिघडली हे कळलंच नाही. ह्रदयानं पहिल्यांदा तोंड उघडलं.

" रे दुष्टा,अधमा मारीलेस ह्या निष्पाप क्रौंच मिथूनाला |
 ध्वंसीलेस त्या सौंदर्या ह्या पोटाची खळगी भरण्याला  || "

नियतीचं  हे वरदान शापित ठरलं हे आज जाणवलं सीतेच्या या शब्दांनी. लव-कुशांना मांडीवर बसवून "रामो
राजमणी " ची विभक्ती शिकवतानाही सीतेच्या नजरेला ना जुमानलं ना अस्वस्थ झालो. पण आज भरल्या डोळ्यांनी सीतेच्या आत्म्याची ही काळकथा रामाच्या नावावर खपवायची होती. न स्वीकाराताही हे शिवधनुष्य सीता-राम प्रेमानं अंगावर आलं होतं. हे आदिकवित्व अनंताची ठसठस देवून जात होतं.