पृष्ठे

शनिवार, २६ नोव्हेंबर, २०११

अंताचा आरंभ !

बस अजून काही क्षण आणि हे घटिका पात्र भरेल अन् मग 'राम'राज्याबाहेर. अगदी अखेरचे. प्राणप्रिय राम चालला म्हणून प्रजा रडत आहे, अयोध्या सोबत यायचं आग्रह धरते आहे. नेहमीप्रमाणे. पण आज कशातच लक्ष लागत नाही. मन सारं सैरभैर झालंय. काय करावं काही कळत नाही. पुरोहितांचा मंत्रघोष कानांना बधीर करतोय. पर्जन्यराजाची कृपा की रामाच्या मागोमाग रामाचा सारा प्रभाव धुवून काढायची जणू लगबग सुरु झाली आहे. शरयूनंही आज नेहमीपेक्षा जास्तच अंग फुगवलं आहे. लक्ष्मण शरयुतच झेपावला असं कळलं होतं. हे पक्कं होतं की तो शरयू पार करून गेला नाही, जाणारही नाही. अन् सीता ? तीही आता परत येणार नाही.

कुठे जावं ? सीते पाठोपाठ की लक्ष्मणाच्या मागे ?

सीता. ती खरी भूमिकन्या होती. अरण्याचं तिला खूप आकर्षण. जन्मलीचं होती शेतात. झाडे, वेली, झरे, गुहा, खिंडी, वाटा, धबधबे, मूलकंद सारं सारं तिला आवडायचं. राजमहालापेक्षा तिला झोपडीत शांत झोप यायची. सारं आयुष्य नियतीनं तिला अरण्यावासाचंच वरदान दिलं.

अन् लक्ष्मण ? एक वेडा जोगी. रामावर जीवापाड प्रेम केलं त्यानं. का ? कुणास ठाऊक ! रामासाठी बापावर तलवार घेऊन धावणारा.लक्ष्मण. त्यालाच ह्या रामानं जायला सांगितलं. का ? तर वचन. रामवचन! सीतेला पाठवलं, लक्ष्मणाला पाठवलं, का ? तर रामवचन ! लोकापवाद ! अन् म्हणे रामराज्य. रामानं आयुष्यभर कुरतडत जगायचं, प्राणप्रियांना छळायचं, आयुष्यभराची भळभळती जखम द्यायची अन् घ्यायची का , कशासाठी ? तर रामराज्यासाठी ! मर्यादांच्या उत्तम पालनासाठी !!

का मिळाली ही चेतना 'राम' म्हणून जगण्याची ? का मिळालं हे 'रामपण' वानरांना ही आकर्षिणारं ?  का मिळाली ही 'जाण' राजेपणाची ? का मिळाले हे 'भान' समूह संघटनाचे  ? का मिळालं 'मोठेपण' ज्यानं राजसिंहासनाची जबाबदारी दिली ? का मिळालं ते 'सामर्थ्य' साक्षात विश्वमित्रांना साह्य करणारं ? का मोडलं गेलं परशुरामाचं ते शिवधनुष्य ज्यानं सीता मला मिळाली ? का मिळाली सीता मला आयुष्यभर सलवणारी ? का ? का ? का ?

मला तर हवा होता तो चंद्रमागता राम,  मला तर हवा होता तो दशरथश्वास  राम,  मला तर हवा होता तो गुरुसेवक राम,  मला तर हवा होता तो सीताभारीत राम,  मला तर हवा होता तो अरण्यसेवी राम ! असा 'राम' रामाला कधीच मिळाला नाही.

रामानं तेव्हाच 'राम' म्हणायला हवं होतं जेव्हा सीता तिच्या बागेला सजवत होती अन् राम गुरुपूजनासाठी त्याच बागेतील फुले तोडत होता. तिथेच आम्हां दोघांची पहिली भेट झाली. " ऋषीकुमार," तिच्या मंजुळ पण ठाम स्वरांनी माझी एकाग्रता भंग झाली. मी दचकलो. गुलाबाच्या काट्यांनी क्षमा केली नाही. रक्ताळ अंगठ्याला दाबून धरत मी वळलो. " ही माझी बाग आहे व आपण पूर्व परवानगी न घेता खुशाल फुले तोडत आहात." तिच्या धनुष्याकृती भुवया अधिकच वक्रावल्या होत्या. मी घायाळ. स्तब्ध. दोन क्षण आणि ती खुदकन हसली. " एवढं घाबरू नका ऋषीकुमार." तिनं वाकून जखम जोडीचा पाला तोडला, चिमटीत दाबून रस काढला व तो माझ्या  रक्ताळ अंगठ्यावर लावून माझा अंगठा दाबला. मी शहारलो तेव्हाच सीता नाम धन्य झालो !

........किंवा मग धनुष्याला प्रत्यंचा लावताना माझ्या कपाळावर फुगलेली शीर पाहून विवाह साजसज्जित, शृंगार सुंदरा सीता नजरेला नजर देत मंद स्मित करत होती. ते स्मित माझ्या दंड बाहुंना आव्हान देवून गेलं अन् क्षणांत ते मजबूत शिवधनुष्य कडाड कड आवाज करून दोन भागात भंगलं. खरा विश्वामित्र शिष्य शोभलो जेव्हा सीतेने स्वीकारोक्ती नजरेनं पापण्या झुकवल्या. इथे ही 'राम' म्हणाला हरकत नव्हती. दुसऱ्यांनी राम नावाचा जयघोष केला अन् मी नियतीच्या फेऱ्यात अडकलो.

........किंवा मग वल्कलधारित सीतेच्या हातची कंदमुळे ओठांची गोडी वाढवत असताना  लक्ष्मण रक्षित शरदाच्या रात्री श्वासांची उष्णता चंद्राला धुसर बनवत असताना .........

.........किंवा आश्रमहरिणी सुस्नात सीता धबधब्याच्या धारेपल्याड पद्मासनात ध्यानास बसायची तेव्हा त्या जलप्रपाताचं ते प्रचंड संगीत त्या स्वच्छ नितळ पाण्याच्या पडद्या आडच्या त्या प्राणप्रियेचं जे रूप मनावर कोरायचं तेव्हा तरी 'राम' म्हणायची वेळ नक्कीच होती किमान माझ्यासाठी तरी.

पण........

आयुष्यात एक सीता 'पण' जिंकला आणि आणि आयुष्यभर सारा 'राम' पणात हारत गेलो. 'राम' कळायला अजून किती वेळा राम व्हायला हवं ते काही उमगत नाही.

लव-कुशासह आम्हां भावंडाची सारे मुले - सुना व त्यांची दळे घटिका पात्रावर नजरा ठेवून आहेत. माझ्या पाठोपाठ सारे आपापल्या क्षेत्रास जातील. आमची मुलं म्हणजे आम्ही तर नव्हेत ना ! त्यांना पराक्रमासाठी दिशा वाटून दिल्या. लव-कुश राम-लक्ष्मण आहेत पण राहतीलच कशावरून ? नकोच ते. अश्वमेधाचे वारू नेहमीच केंद्रोत्सारी हवेत.

राजवस्त्रे उतरत होती. जगासाठी मी वानप्रस्थाला जात होतो पण मला माहित होतं मी आता वनात जाणार नाही. सीतेच्या भेटण्याची भीती नव्हती तरीही. मला माहितेय, 'राजा' रामावर कोणीही प्रेम करत नाही, केलं नाही. ना सीतेनं, ना लक्ष्मणानं, ना अगदी रामानंही. 'राजा' राम अगदी ....... अगदी एकटा होता, असतो, राहील. आज राजेपणाची सारी चिलखतं उतरवून निघालो होतो 'रामापार' !

   

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा