पृष्ठे

शुक्रवार, २५ नोव्हेंबर, २०११

ययातीची अमरता

प्राचीन भारतीयांनी इतिहासाला भूतकाळाऐवजी संस्कृती-मूल्यांचा आधार दिला. ज्याचे स्वत:चे असे फायदे तोटे मिळाले. ज्यांची ऐतिहासिकता अजून पूर्णपणे सिद्ध, मान्य झाली नाही पण संस्कृती - मूल्यता सार्वकालिक, सार्वलौकिक अन् सार्वभौमिक मान्यता पावली त्या भारतीय महाकाव्यांनी - रामायण, महाभारताने - भारतीय जनमानसावर केलेले गारुड हा एक अभ्यासाचा विषय आहे.

अगदी विसाव्या शतकातसुद्धा आधुनिक भारतीय भाषांना महाभारताने विषय पुरवले आहेत. मराठीला पहिलं ज्ञानपीठ देणारी  सर्वप्रसिध्द कादंबरी ' ययाती ' महाभारताचीच देन आहे. आज पुन्हा एकदा महाभारत घडतंय पाल्य - पालकांत, सोप्या शब्दांत  आई-बाप व मुलांत, सरत्या उगवत्या दोन पिढ्यात आणि म्हणूनच ययातीची पुन्हा आठवण झाली कारण त्याची प्रासंगिकता आम्ही आमच्या कृतीनं अमर बनवली आहे.

मूळ ययाती व खांडेकरांची `ययाती` बऱ्याच विषयांना स्पर्श करतात.फक्त एवढी एकच कादंबरी नीट समजून घेतली तरी एका सामान्य माणसांचं जगणं सुसह्य होईल इतका आवाका यात आहे. आज आपण त्यातल्या एका बाबीवर विचार करू.

ययातीची  गोष्ट एक रेखीय नाही तर ती एक वर्तुळाकार कथा आहे. म्हणजे ययातीचं  ययातीपण एका बिंदूची, घटनेची देन नसून घटनांच्या शृंखलाचं अस्तित्व आहे. सामन्यत: ययाती काममोहित, कामपिपासू व्यक्ती म्हणून ओळखला जातो पण ययाती फक्त इतकाच नाही. तो अजूनही बराच काही आहे.

काम  ऊर्जा निसर्गाची देन आहे, काममोहित होणं असंयमाचं लक्षण आहे, कामपीडित असणं दमनाचा अतिरेक आहे व कामवासना संस्कृतीची विकृती आहे.

काम  ऊर्जा निसर्गाची स्थिती आहे. ती निसर्गाची गरज आहे, निसर्गाच्या अस्तित्वाचा आधार आहे म्हणून ती प्रकृती आहे. कामवासना मनाची विकृती आहे कारण तो हव्यास आहे. गरजेपेक्षा जास्तीची मागणी आहे. निसर्गाच्या विरोधात बंड आहे. ययातीला हा हव्यास परंपरेने मिळालेला होता. त्याची सुरुवात स्पर्शभावित प्रेमाच्या नकाराने होते.

ययातीचा पराक्रमी बाप इंद्राचं राजसिंहासनप्राप्त करतो व इंद्राणीच्या उपभोगाची इच्छा करतो. इंद्राणी मागणी करते की जर तू विद्वान, ऋषी मुनींनी वाहून आणलेल्या पालखीत बसून येशील तरच मी तुझा स्वीकार करीन. पालखीत बसलेल्या कामांध राजाला दुबळ्या विद्वानांची मंद गती सहन न होऊन तो एका ऋषीला लाथ मारून वेगात चालायला सांगतो व ऋषी त्याच्या वंशाला सुखी न होण्याचा शाप देतो.

अशी सुरुवात मिळालेला ययाती. ययातीची आई आपल्या स्त्रीलंपट नवऱ्याला बांधून ठेवण्यासाठी आपल्या यौवनाचं रक्षण,संवर्धन करण्यावर जास्त लक्ष देते. ती तिची अनिवार्यता आहे. सवतीमत्सराच्या जीवघेण्या जगण्यापेक्षा मुलांना त्यांच्या हक्कांपासून,गरजांपासून दूर ठेवलं जातं.

ययाती आईच्या दुधाला पारखा होतो कारण त्याच्या आईला त्याच्या बापासाठी आपल्या छातीचे उभार ओघळू द्यायचे नव्हते. ही पुरुषसत्ताक मानसिकतेची परिणती होती व आजही आहे.

जोपर्यंत  फ्राइड पूर्णपणे चुकीचा ठरून नाकारला जात नाही तोपर्यंत तरी तो एक मानसशास्त्रज्ञ आहे. तो म्हणतो माणसाचं व्यक्तीमत्व त्याच्या बालपणीच्या अनुभवांनी आकारास येतं [ वाचा फ्राइड- मनोलैंगिक विकास ]. ययातीची कामपिपासा त्याच्या मातृप्रेमाच्या गरजेची प्रतिक्रिया तर नव्हे ? कोण जाणे ?

आजही अशा खूप स्त्रिया आहेत ज्या आपल्या मुलांना स्वत:चं दूध पाजत नाहीत. गृहीत धरा त्यातल्या ९० % स्त्रिया योग्य, वैद्यकीय कारणांमुळे दूध पाजत नसाव्यात. [ हे गृहीतक लेखक पुरुष आहे व त्याला स्त्री राज्याची पूर्ण माहिती नाही यावर आधारित आहे.] पण उरलेल्या १० % स्त्रिया ज्या जाणता-अजाणता आपल्या तान्हुल्यांना आईच्या दुधापासून वंचित ठेवत आहेत त्यांचं काय ? सावधान माता `कुमाता' बनू नयेत.

आजकाल सरकार तर्फे यासंदर्भात बऱ्याच जाहिराती, प्रदर्शने जनहितार्थ प्रकाशित होत आहेत. डॉक्टर सामान्यत: सर्वच स्त्रियांना किमान सहा महिने तरी नवजात शिशुंना आईचे दूध पाजण्याचा सल्ला देतात. विचार करण्यासारखी गोष्ट अशी की, गरीब, अशिक्षित स्त्रियांमध्ये दूध न पाजण्याची मानसिकता दिसून येत नाही जर तसेच काही सबळ कारण नसेल तर. शरीराचे सौंदर्य हा आधार जाणून बुजून असो की न जाणता असो उच्चभ्रू, उच्च शिक्षित, श्रीमंत स्त्रियांत हे प्रमाण तुलनेने जास्त आहे.

कल्पनारम्य, ललित, अनैतिहासिक असे महाभारत असो की ययाती कादंबरी असो ,फ्राइड असो की सरकारी जाहिराती, डॉक्टर सांगोत कि न सांगोत नवजात शिशूंचा हा हक्क आहे, ती त्यांची गरज आहे आणि ही बाब पूर्णपणे वैज्ञानिक व प्रासंगिक आहे की आईचे दूध प्रत्येक बालकाला किमान सहा महिने मिळालेच पाहिजे.

एका  स्वस्थ, निकोप व्यक्तिमत्वासाठी व सुरक्षित समाजासाठी हे मातांनो, तुम्ही आपल्या पाडसांवर प्रेम कराल ना ?


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा