पृष्ठे

बुधवार, १६ नोव्हेंबर, २०११

शिकवणीची सुरुवात

चंदन -वंदन जंगलाचे महाराज सिंव्हाजी आयाळे सहकुटुंब-सहपरिवार व सहमंत्रीमंडळ परजंगल दौऱ्यावर गेल्याने उपराजा वाघोजी पट्टेदार यांच्या मजबूत खांद्यावर सगळ्या जबाबदाऱ्या वाढल्या. अर्थात जबर कामाला त्यांची ना नव्हती ना त्यांच्या सहकारी जीवनधारिणी वाघीणीची. पण या कामाच्या गडबडीत त्यांचा छोटा, गोड,गुबगुबीत वाघोबा याच्याकडे दुर्लक्ष होऊ लागले होते.

वाघिणीला आपल्या लेकराच्या शिक्षणाची काळजी वाटत होती. विचार करून शेवटी त्यांनी वाघोबाला जवळच राहणाऱ्या जुन्या जाणत्या मित्राच्या म्हणजे मधुकाका अस्वले यांच्या ताब्यात द्यायचे ठरवले कारण शिक्षकांपासून दाईपर्यंत,शाळेपासून पाळणाघरापर्यंत सारेच दौऱ्यावर होते.

सकाळीच  वाघोबाला तयार करून वाघ वाघीण अस्वल काकांकडे आले.नेहमी प्रमाणे अस्वल काका उन्हात पाठ गरम करत पोळ्यातला मध खाण्यात मग्न होते.आसपास माश्या उडत होत्या.त्यांची मधुकाकांनी दाखल घेतली नाही.त्यांनी मन वळवून वजनदार पावलांनी हादरणारी जमीन पाहिली.

"यावं, यावं महाराणी !" अस्वलकाकांनी वाघिणीला नमस्कार केला. "पुरे हं काका. " वाघीण बाई लाजल्या.पण मनात सुखावल्या. बऱ्याच वर्षांपासून मनात असलेली इच्छा पूर्ण होत होती महाराणी बनण्याची. "ये बाळ." अस्वल काकांनी वाघोबाला जवळ बोलावलं. "राजगुरू पोपटोजी लालनाके परत येईपर्यंत  मीही राजगुरू पद  उपभोगतो."अस्वल काकांनी हसत वाघोजीस म्हटले.

वाघोबा मान हलवत होता.वाघिणीला वाटलं तो नाही नाही म्हणतोय पण तो तर नाकापाशी गुणगुण करणारी माशी हटवत होता. "जा की ठोंब्या ." म्हणून वाघिणीने शेपटीने फटका मारला. अचानक काही कळायच्या आत वाघोबा थेट अस्वल काकांच्या मांडीवर गेला. अस्वल काकांचा एक लांबलचक केस त्याच्या नाकात गेला व तो सटासट शिंकला. अस्वल काकांनी डोळे झाकत गडगडाटी हसत पोट हलवल. त्यांच्या पोटावर वाघोबा मजेत वर खाली होत होता.

"आम्ही संध्याकाळी येतो." वाघिणीने सांगितले. "हो हो" अस्वल काका हो म्हणत होते की हो हो करून हसत होते ते कळत नव्हतं.वाघ-वाघिणीने शेपट्या हलवून टाटा  केलं व मोठ्या मोठ्या डरकाळ्या देत आपल्या कामाची सुरुवात केली.

अश्या प्रकारे आपल्या कथानायकाचा अस्वल काकांच्या शाळेत प्रवेश झाला. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा