पृष्ठे

मंगळवार, १४ फेब्रुवारी, २०१२

दंताक्षीच्या तावडीत दंतोबा

जिसने डाँटना नहीं चाहिए फिर भी जो डाँटता रहता है - वह है डॉक्टर |

[नैचरली] पेन कि वजह से जिसके पेशन्स नहीं रहते फिर भी जिसे पेशन्स रखना पडता है - वह है पेशंट |

गेल्या  काही दिवसांपासून दंतोबा दंतशूल अर्थात दातदुखीने परेशान होते. नेहमीचा जीभबाईंचा कोमल सहवास स्पर्श ही त्यांना सहन होईना. रतिरंग रात्री स्वप्नांच्या दुनियेतून खसकन ओढून आणलं तेव्हा `रात्रीचा समय सरूनी` उष:काल होत होता. फारा वर्षांनंतर तो तांबूस लाल गोळा खिडकीतून आत येताना दिसला. त्यानं आजवर एवढी वेदनांची सोबत कधीच केली नव्हती.

छोट्या दंतोबांच्या छोट्या जगात दुसरं ते कोण असणार ? आज पहाट वाऱ्या आधीच `तिनं` घेरलं होतं. असह्य हा शब्द अनुभवला खरा ! त्या असह्याचा सह्यपणा मुरवण्यासाठी सुरु झाली मग तगमग. आधी वाटलं उघड्या कानात थंड वारं गेल्यानं अर्धं डोकं, दात, घसा असं बरंच काहीबाही दुखतंय. म्हणून मग कानात कापूस घातला वरून टोपी व त्याच्यावर मफलर बांधला.

फरक  शून्य. मग लवंग तेलात कापूस बुडवून तो गोळा दातात धरला. जीभ व गालफाडांना उगीच चटके बसले. 'वेदना' ताईचा मुक्काम वाढतच होता. वैद्यराजांना दुसऱ्या प्रहरापूर्वी भेटणं शक्य नव्हतं. सवती मत्सराची मदत घ्यायचं ठरवलं. दाताची वेदना कमी व्हावी, वाटावी, भासावी म्हणून दुसऱ्या ठिकाणी नवीन वेदना - हो आभासीच का असेना पण - निर्माण करण्याचा प्रयत्न सुरु झाला.

 कान ओढले, केस ओढले शरीराचे जेवढे अवयव ओढता येतील तेवढे ओढले, दाबले,पिळले. वेदना आहे तिथेच आहे. मग कपाळावर टिचक्या मारल्या, हळूहळू कानशिलावर, जबड्यावर बुक्या मारल्या तरीही परिणाम शून्यच. काही मित्रांना फोन केला पण गुलाबी थंडीतली सकाळ दंतोबांच्या दातावर खर्चायला कोणीच तयार नव्हतं. वेगवेगळे खेळ खेळले. त्यानं वेदना कमी व्हायच्या ऐवजी मोबाईलची 'जानच' गेली.

आज वेळ कसा जाता जात नव्हता. आता ९ च वाजलेत. अजून १० म्हणजे १ तास बाकी होता. शेवटी कधी नव्हे तो नट्टापट्टा करत वेळ घालवला. शेकड्याच्या ५-६ नोटा अदृश्य करून वैद्यबुवांनी दातात खड्डा करून घ्यायला सांगितलं. त्यांच्या रिकाम्या पाकिटाचं गलेलठ्ठ बेडूक झाल्याचा भास दन्तोबांना  झाला.

गरीब  दन्तोबांनी ध्वनिभ्रमण करून एक 'धर्मराज' शोधले. या धर्मार्थ रुग्णभवनाने त्यांना दिलासा दिला. पण हाय ! लवकरच तिथल्या यामिनी भगिनी दन्ताविद्यालंकार विदुषीने आपल्या [वेदना] मैत्रिणीचीच साथ दिली. त्या दोघातला हा संवाद -

मऱ्हाट भाषातज्ञ दंतोबा व त्रिभाषा सूत्राचा मोकळ्या हाताने वापर करणारी दंतशास्त्री

डॉक्टर  - क्या होता है ?

दंतोबा - वो .... वो दात मे शूळ है | [ गालावर हात ठेवत दंतोबा वदळे.]

डॉक्टर  - अच्चा, तोंड उघडो. [ ठाक ठाक हातोडा चालला.]

दंतोबा -  आआ ...आआआ .....आ

डॉक्टर  - तुम्हारा दात is infected.  मतलब वो ५ नंबर का  दात मे खड्डा करणा पडेगा. 
               अगर चार बार आ सकता है तो मै आपोइंटमेंट देती. 

दंतोबा - हा, आयेंगा.

डॉक्टर  - अगले परसो ठीक साढे दास बाजे आ जाणा.  [सिस्टरला म्हणते - ] मावशी यांची नोंद करा.

दंतोबा - मदाम, खर्चा किती येईल.

डॉक्टर  - कुच नही. free of cost  हो जायेगा.

दंतोबा - आप ही करिंगी ना |

डॉक्टर  -हां

दंतोबा -आपका नाम जी ?

डॉक्टर  - दंताक्षी दातपाडे. मै इधर महाराष्ट्रकीच हुं. घाबरणा नही. 

[अगले परसो दंतोबा वेळेवर हजर. बरंच वेळानंतर त्यंचा नंबर आला.]

चिकित्सा भगिनी [नर्स] - बसा तिकडे.

[ खुर्चीची पाठ जमिनीला समांतर आहे हे पाहून सगळ्या [तरुण] दंतशास्त्रींसमोर कसे झोपावे हे न कळून दंतोबा दंताक्षीच्या खुर्चीत बसले. बऱ्याच वेळानंतर दन्तोबाकडे पाहून अचानक - ]

डॉक्टर  - अरे , उधर नाही. इसपर लेट जाव. वो डॉक्टर का जगा है. तुम पेशंट है.

दंतोबा - जी....... जी .

डॉक्टर  - चूळ भरो. हां. लेट जाव. थोडा नीचे. थोडा वर. तोंड खोलो. ये उजवा हात उपर लेवो. जबडा नीचे. अरे बाबा, तोंड नाय जबडा नीचे करो.

[ तिला डोकं की मान खाली हवी होती. दंतोबा जबडा म्हणल्यामुळे गोंधळले.]

दंतोबा - हं,.....हुं......[ दंतोबा डॉक्टरच्या सूचना व हिंदी दोघांनी गडबडले. इंजेक्शन पाहून ] ये किस लिये ?

डॉक्टर  - अब हम तुम्हारे दात मे गड्डा करेंगे | उसके लिये दर्द होगा ना ? तो इससे वो नही होगा | थोडा नम्नेस होणे पर बता दो.

दंतोबा - आ..आ ,.........आ........आआ........  

डॉक्टर  - चलो हो गया. अब दो दिन बाद आना.
         
 [दो दिन बाद........]

दंतोबा - माझी आपोइंटमेंट आहे आज.

[ दंतभगिनीने दुर्लक्ष करत कागद ठेवून घेतला.]

[ अभी बैठना पडेगा हां.  दंतोबा थोडा वेळ लागेल हं. अशी आरोळी २-३ वेळा घुमली. मागून आलेले पेशंट तपासून घेवून निघून गेले. दंतोबा बसलेलेच. दंताक्षी दोनदा कुठे तरी गायब झाल्या. दुसऱ्या वेळी दंतभगिनीने ध्वनी दूरवर पाठवून दन्ताक्षींना बोलावून घेतलं. एकट्या दन्तोबांवर कसली ही दया न दाखवता ......] 

डॉक्टर - हं चलो आ जाव लवकर. बितो जल्दी. मू उघडो. मावशी नवीन आरसा दया. थुंको. एक्स रे दया. इतना नीचे नही. थोडा उपर. हे पाणी कोणी सांडलं. राहू द्या आता जे कुच करणा है बाद मे करो. [ एकच वेळी नर्स व दंतोबा भडिमारात सापडले.] दाढी क्यू नही किया? [ दंतोबाच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह. तोंडात सुया असल्याने बोलता ही येईना.] शेव्ह ......... शेव्ह करके नही आ सकते थे क्या ? अब मै कैसे करू ? [तोंडात जणू काही उंदीर मरून पडला आहे व तो उचलायची पाळी आली आहे अश्या पद्धतीने दोन बोटे घालत ...] अगली बार शेव्ह करके आना. [ नाराजी व अनिच्छा दाखविणारे अगम्य उच्चार जे लिपिबद्ध करता येणं शक्य नाही.]   हां हो गया बाकी का अगली बार.

दंतोबा - मदाम वो ६ नंबर मे भी थोडा पेन था.

डॉक्टर - गोळी लिख दीया है. कुच्च भी खा सकते है. बाकी उसको बाद मे देखेंगे. अब जाव.

बिचारे दंतोबा गोळ्यांचा ढिगारा व [शुद्ध] मराठी डॉक्टरच्या महान राष्ट्रभाषेचा डोलारा सांभाळत 'पेन' सहन करत पेशन्स ठेवून आहेत. शेवटी काय ? ते बिच्चारे 'पेशंट' आहेत ना !

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा