पृष्ठे

मंगळवार, २० डिसेंबर, २०११

पायतानापासनं सुरुवात

'उफाड्याचा माल ते मातृदेवो भव मार्गे लीलासहधर्मचारिणी' इतक्या विस्तृत प्रतलात स्त्री पुरुषाच्या आयुष्याला व्यापून राहते. या स्तंभात एक मैत्रीण - हो, कोणत्याही विशेषणाशिवाय फक्त मैत्रीण - व फार झालं तर एक प्रेमळ जीवनसाथी एवढाच विस्तार अपेक्षून 'लेखनप्रपंच' केला जाईल. 

सामान्यत: मलमूत्र विसर्जनावर नियंत्रण येवू लागलं की व्यक्तीच्या लैंगिक भावनांचा विकास सुरू होतो. [याला अपवाद असू शकतो.] शरीरशास्त्र याला पौगंडावस्था म्हणतं. येथे आपण या कालाचा विचार करणार नाहीत तर या पुढच्या अवस्थेचा म्हणजेच तारुण्याचा विचार करणार आहोत.

तर महाराजा, आता आपण तरूण सुंदरी कशी आपलीशी करावी ते पाहू. [ पोरगी पटवायचे हे तोडगे प्रामाणिकपणे केल्यास एकापेक्षा जास्त पोरी मागे लागतील हा सावधगिरीचा इशारा देवून आम्ही सुरुवात करीत आहोत. ]

सामान्यपणे  कोणतीही पोरगी कोणाही पुरुषाच्या नजरेला नजर देत नाही तर एका नजरेत त्याला वरपासून खालपर्यंत पाहून आपली दृष्टी जमिनीकडे वळवते. याचा अर्थ असा नव्हे की ती तुमच्याकडे पहात नाही. डोळ्यांच्या कडातून नजरेची बंदूक नेम धरून उभी असते बरं का !

व्यक्ती म्हणजे काही पुतळा नाही. अंतर्बाह्य अभिव्यक्ती म्हणजेच जीवंतता होय. आता अडचण अशी की ही आंतरिक सुंदरता एका नजरेत दिसत नाही म्हणून आधी दृश्य शरीराच्या सौन्दर्यापासून सुरुवात करू. सार्वजनिक ठिकाणी चेहरा व हात वगळता सारं शरीर कपड्यातच बंदिस्त असतं म्हणून आपल्या सुंदरतेचे बरेचसे गुण कपड्यांनाच जातात.संपूर्ण वेशभूषेमध्ये पादत्राणांचा ही समावेश होतो.

आता जर पोरगी नजरेला नजर न देता पायाकडे पाहत असेल तर ? ......... तर महाराजा, चांगली वहाणे वापरावीत दुसरं काय ! [ विक्टोरियन काळात पियानोचेही नागवे पाय झाकले जायचे. तुम्ही तर चक्क एकविसाव्या शतकातील पुरुष आहात की राव ! ] पायतानं चांगली  म्हणजे महागडी नव्हेत. नायके किंवा रिबॉकचेच बूट हवेत असे नव्हे. बूटच हवेत असेही नव्हे. किंवा नेहमीच कोल्हापुरी चप्पल असावी असे ही नव्हे.  

आज पाय कशातही न घालता किंवा पायात काहीही न घालता कोणी फिरत नाही. विशेषत: जिथे पोरी पाहतील अशा ठिकाणी तर नाहीच नाही. [ म्हणजेच कॉलेजात, रस्त्यावर, ट्युशनला इ.इ.] मग मूळ मुद्दा पायतानं हा नाही. ती असावीत व ठीकठाक असावीत एवढेच ! 

मंग महाराजा, पोरगी  पटावी कशी ? तर राजे हो, पोरगी तुम्ही पायतान कसलं घालता याच्यानं नाही पटत तर घातलेलं पायातन कसं वापरता अन् वापरून झाल्यावर कसं सोडता, ठेवता याच्यानं तुमच्यावर मरते. जरा आपलं पायतान [ यात चप्पल, बूट इ.इ. सारं आलं.] काढून त्याचा तळ पहा. घासलेल्या टाचेवरून स्वभाव ओळखायचं एक शास्त्र आहे म्हणे ! आपल्या घासलेल्या टाचेवरून आपला स्वभाव ओळखा. डावीकडचा भाग जास्त घासला आहे की उजवीकडचा ? दिडक्या, पाऊण चालीनं संपूर्ण तळ न घासता विशिष्ट भागच घासला जातो. असं चालणं चुकीचं आहे व ते मुलींना बिलकूल आवडत नाही. तुमच्या पायतानाचा  संपूर्ण तळ जर सगळीकडे समान घासला जात नसेल तर तुमच्या चालण्यात व कदाचित पायातही दोष आहे. असा लंगडा घोडा शर्यत कशी जिंकणार ?

आता या बाबीकडं दुर्लक्ष केलं तरी पोरगी अजूनही उंबरठ्यातच आहे असं समजा. तिला जर मनमंदिरात आणायचं असेल तर आपण पायतान कसं सोडतो ते जरा पहा. पायतान सोडण्यापूर्वी ते घातलेलं असलं पाहिजे. म्हणून आधी पायतान नीट घाला व नीट चाला.  

बऱ्याच जणांना पाय फरफटत, पाय घासत चालायची सवय असते त्यामुळे चालताना पायतानांचा आवाज होतो. ते बरोबर नाही. अर्ध्या चपलेतच पाय ठेवून काही जण चालतात. हेही बरोबर नाही. पायाला घट्टे पडतील अशी घट्ट पायतानं नसावीत. बुटाचे बंद नीट बांधलेले असावेत. ते लोंबणारे नसावेत. सैन्डलचे पट्टे व्यवस्थित बांधलेले,लावलेले असावेत.

पायतानं  जशी नीट घालावीत तशी ती नीट सोडावीत.बंद बांधलेले असतानाच बुटातून पाय काढणारे विद्वान ही आहेत. ते काही विद्वत्तेच लक्षण नाही. बंद सोडून बूट काढावेत. पादत्राण कोणतंही असो  ते एका शेजारी एक असं एका बाजूला आडव्या ओळीत किंवा उभ्या रांगेत किंवा पायठेवतान [ पादत्राणे ठेवायचे लाकडी वा लोखंडी कपाट] जे जसे उपलब्ध असेल तसे ठेवावे. पुढे मागे, आडवे तिडवे, तिरपे असे कसे ही सोडू नये. सगळ्यात महत्वाचे म्हणजे अगदी दारातच, उंबरठ्यातच  अशी कुठेही आपली पादत्राणे सोडू नयेत. 

दाराबाहेर  एका बाजूला, एका ओळीत सोडलेली पादत्राणे घरादाराची तशीच मनाची ही सुंदरता वाढवतात. घाई गर्दीच्या वेळी नेमक्या ठिकाणी कमी वेळात सापडतात. योग्य प्रकारे वापरल्यास पायतानं दीर्घकाळ टिकतात. त्यांच्याशी घसट वाढली की त्यांचा घसारा कमी होतो. अर्थव्यवस्था बचतीची बढती दाखवते. अशा वाचलेल्या पैशातून सिनेमाची दोन  तिकीटं, मोगऱ्याचा गजरा किंवा गुलाबाचं फूल, दोघात शेअर करता येईल असा कटिंग चहा किंवा मलईदार नारळ किंवा.......किंवा........ असं बरंच काही येवू शकतं. 

दारासमोर 'सुंदर रांगोळी काढणारी कोणी एक' दारा आत हवी असेल तर सुंदर घरादारासोबतच ..... सुंदर मनाची ही  गरज असते असं सुंदर मन सजग प्रामाणिकतेनेच निर्माण होतं. अशी सजगता पायतानं नीट काढल्या-घातल्यानं वाढते. 

पोरीवाहो, गळयाच्यान सांगा बरं असला मैतर तुम्हाला नको का ?

[.......... आता अशा जातीच्या सुंदराला कोणती सुंदरी नाकारील बरं ? ]

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा