पृष्ठे

सोमवार, १२ डिसेंबर, २०११

प्रबुद्ध कृष्ण - काही छटा

'संत' या शब्दाची माझी व्याख्या अशी आहे - संत म्हणजे 'संबुद्ध तरुणता' ! संबुद्धता तारुण्याच्या कालजयी उत्साहाने वावरू लागली, की अमर 'अभंग' संतवचने अवतरतात. त्यातीलच एक म्हणजे -
" अंतरी निर्मळ वाणीचा रसाळ | त्याचे गळा माळ असो नसो |"
 यालाच मी 'प्रबुद्ध कृष्ण' म्हणतो.

अंतरीचे निर्मळत्व म्हणजे प्रबुद्धत्व ! खरे तर निर्मळ हा शब्द नकारार्थी आहे पण येथे तेच गरजेचे आहे. मळ, मलीनत्व काढून टाकणे ही प्राथमिक व अनिवार्य पायरी आहे  कारण एकदा का मालिन्य निघून गेले, की मग जे काही उरते ते शुद्ध, बुद्ध, सत्त्व अस्तित्त्व ‘असते जरी त्याला तत्वज्ञान्यांनी 'शून्य' म्हटले असले तरी !

असे पहा, की आपण एक खूप जुना किंवा खूप मलीन असा दिवा घेतला व त्याला घासून पुसून निर्मळ केले तर काय होईल ? मूळ धातू चकाकू लागेल ना ! आपण फक्त धातू वरील धूळ काढून टाकायची आतली स्वच्छता सुंदरता आपोआप दिसू लागेल. येथे नवीन काही निर्माण करायचे नाही. नवी कल्हई नाही, नवा धातू नाही, नवे मूलद्रव्य नाही ! काही काही नाही. फक्त वरचा अज्ञानाचा थर बाजूला करायचा की आत ‘अस्तित्त्व’ आहेच ! किती सोप्पं काम आहे ना ! पण हे निर्मळ करणं म्हणजे प्रबुद्धत्व नाही महाराजा ! ही क्रिया हे तंत्र आहे तत्व नव्हे. क्रियेचा परिणाम हे तत्त्व आहे. निर्मलीनत्त्व म्हणजे बुद्धत्त्व !

'दिव्याचा' मूळ धातू, रंग - रूप, स्वभाव जो नित्य, कोणत्या ही बंधनाने रहित असा आहे, स्वांतमग्न स्वानंद आहे तो  म्हणजे मूळ भाव, ते मूलतत्व हे आपले साध्य आहे. ते 'तत्' आहे. अंतस्थ दिव्याला साफ,निर्मळ करण्याची क्रिया म्हणजे तंत्र ही पहिली पायरी तर त्या साफसफाई नंतर जे मूळ सत्व उरते, दिसते, असते ते म्हणजे मूलतत्व हे अंतिम साध्य होय. हे तत्व बाहेरून थोडेच आणावे लागते ? ते तर आतच असते. फक्त दार उघडायची खोटी की प्रकाशाने  सारे घर उजळून निघालेच. हे आपले  मूळ सत्व म्हणजेच दिव्यत्व ! हे आपले  मूळ सत्व म्हणजेच बुद्धत्व ! प्रकृतीच्या  या मूळ चेतनेलाच मी 'प्रबुद्ध' म्हणतो.

प्रबुद्धत्वाची ही अवस्था खूप व चिरस्थायी आनंदाची आहे असा अनुभव ज्यांनी ती अवस्था प्राप्त करून घेतली त्यांचा आहे. हा आनंद प्रत्येकाला घेता येतो. नव्हे नव्हे तो त्याचा अधिकार आहे.ते प्रत्येकाचे जीवन ध्येयच आहे. का म्हणून आम्ही आनंदात राहायचे नाही ? का म्हणून आम्ही निराशेत, दु:खात राहायचे ? बिलकुल नाही. आनंद हा जगण्याचा मूलाधार आहे. तो आम्ही प्राप्त करून घेणारच घेणार ! आम्ही प्रबुद्ध होणारच होणार !

आता  हा आनंद, प्रबुद्धपण कसे मिळवायचे ? त्याचे अनेक मार्ग आहेत. आपापल्या आवडी निवडीवर, परिस्थितीवर ते अवलंबून आहे की कोणी कोणता मार्ग निवडायचा. सर्वात सोपा, सर्वाधिक लोकांनी वापरून सिद्ध केलेला, खूप खूप प्राचीन तरीही  आधुनिक असा मार्ग म्हणजे डोळे ‘उघडे’ ठेवून पहायचा मार्ग. नुसतं पाहणं नाही तर विशेषत्वाने पाहणं म्हणून वि + पश्यना. विपश्यना ही पद्धत सार्वकालिक, सार्वभौमिक, सार्वदेशीय तर आहेच शियाय सजीवाच्या - श्वास घेणाऱ्या सर्व सजीवांच्या - अस्तित्वाइतकीच आदिम व प्रत्येक श्वासाइतकीच प्रासंगिक ही आहे. ही पद्धत किंवा अशा पद्धती वारंवार जगाला आठवण करून देणाऱ्यांनाच ऋषी, बुद्ध, प्रेषित म्हटलं गेलं ते त्यांनी त्या पद्धती स्वत: वापरून बुद्धत्व प्राप्त केल्यामुळंच !

या परंपरेतला सर्वात प्रसिद्ध बुद्ध म्हणजे ‘सिद्धार्थ गौतम’ ! आपल्या अस्तित्वानं बुद्धत्वाचा अर्थ सिद्ध करणारा ! प्रबुद्ध या शब्दानं त्या सिद्धार्थ गौतमाची आठवण होत असेल तर ठीक पण मला व्यक्ती नव्हे तर त्याचे कार्य व त्या मूळ सत्त्वाची आठवण होते म्हणून पहिला शब्द ‘प्रबुद्ध’ !

पहिला शब्द अंतस निर्मळ करण्याकडे लक्ष वेधतो व त्याची एक पद्धत संकेतानं सांगतो, की बाबा रे ! या नावाच्या या माणसाच्या मागे मागे – अनुयायी म्हणून नव्हे तर सहप्रवासी म्हणून – गेलास तर तुही तेथेच पोहोचशील जेथे जायचं आहे.

दुसरा शब्द कृष्ण ! येथे मला तो महाभारती कृष्ण अपेक्षित नाही. जो आकर्षून घेतो तो कृष्ण ! शरीर व मनाला जे जे आकर्षित करतं ते ते सारं कृष्ण ! ‘ते’ बुद्धत्व साऱ्यांनाच आकर्षित करत असतं म्हणून ते कृष्ण आणि त्याचा आकर्षिण्याचा गुणधर्म म्हणजे कृष्णत्व ! ज्यांनी ज्यांनी बुद्धत्व प्राप्त केलं आहे त्यांनी त्यांनी साऱ्या जगाला आकर्षित केलं आहे पण आकर्षिणारं ते ते सारं बुद्धत्व नव्हे !

आकर्षित्व अनेक प्रकारांनी दिसून येतं. माझं आकर्षित्व हसतं, खेळतं, नाचतं, गातं, नांदतं आहे. त्याची धीरगंभीरता मंदस्मिता इतकचं खळाळून हसण्यानं भारीत आहे. त्याचं ‘असणं’ आनंदाची धाराप्रवाहिता वृद्धिंगत करणारं आहे. ते नुसतंच गोड नाही तर त्याला नवरसमंजिरीची रसाळ साथ आहे.  

अंतस निर्मळ झाले की वाणी आपोआपच रसाळ होतेच होते. महान वक्ते आपलं बोलणं विविध रसांनी कर्णमधुर बनवतात पण ते तेव्हापर्यंतच गोड वाटते जोवर ते वक्ते व्यासपीठावर उभे असतात. त्यांच्यातला वक्ता लाखोंना भारून टाकतो पण त्यांच्यातला माणूस किती लोकांना आकर्षित करेल हे सांगता येणं कठीण आहे. वाणी ही फक्त जीभेद्वारेच व्यक्त होते असं नाही. संपूर्ण तना - मनाने जे जे व्यक्त होतं, होऊ शकतं ते ते सारं वाणीचं वक्तव्यच असतं.
श्रोत्यांच्या कानांना संमोहित करणं त्यामानानं सोपं आहे पण आत्म्यांना भारीत तेच करू शकतात ज्यांचं अंतस निर्मळ आहे.


व्यक्त होणाऱ्या अस्तित्वाला तेव्हाच ‘व्यक्ती’ म्हणावं जेव्हा अस्तित्व निर्मळ व त्याचं व्यक्त होणं रसाळ असेल ! अशाच ‘व्यक्ती’ला मी ‘प्रबुद्ध कृष्ण’ म्हणतो मग त्याच्या गळ्यात कोणाची ही व कोणतीही ‘माळ’ असो !

एकदा का तुम्ही ‘प्रबुद्ध कृष्णा’त स्थित झालात की मग तुमच्या डोक्यावर पगडी आहे की पागोटे, कपाळावर बिंदी आहे की मांगेत कुंकू, गळ्यात माळ आहे की क्रास, हातात पाटी आहे की फाळ, कमरेला धोतर आहे की जीन्स, पायात पादुका आहेत की पंपशूज यानं काहीही फरक पडत नाही.

जे जे आनंदमय ते ते जीवन. हा आनंद हेच ऐश्वर्य जगण्यातले. हे ऐश्वर्य हाच ईश्वर आयुष्याचा. या ईश्वराचा शोध हे जगातले सार्थक. ही सार्थकता बाहेरच्या धावपळीने नाही तर आतल्या प्रवासाने प्राप्त होते. आतला प्रवास श्वासाच्या मार्गाने होतो. या मार्गावरील प्रवासाने एकदा का ‘अंतस’ निर्मळ झाले की ‘बाह्य’ सारे वाणीद्वारे स्रवणाऱ्या रसांनी न्हाऊन निघते. असं अंतर्बाह्य न्हाणं त्या आनंदाला प्रसवतं ज्याला समृद्ध ‘जगणं’ म्हणता येईल.                 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा