पृष्ठे

रविवार, २५ डिसेंबर, २०११

साहेबाची भाषा

 भाषा आपल्या भावभावना इतरांपर्यंत पोचवायचे एक माध्यम आहे. मानवी गरजांची पूर्ती करण्यासाठी भाषा एक महत्त्वाचे साधन आहे. सामान्यत: भाषेचे मातृभाषा व परभाषा असे दोन प्रकार करता येतात. मातृभाषा आपण जगत असतो.त्यामुळे तिचा वेगळा अभ्यास करायची गरज लक्षात येत नाही.परंतु पराभाषेचे आपले असे महत्त्व असते.

एखादी परभाषा एखाद्या प्रदेशात बोलली जाण्यात बऱ्याचदा आक्रमण, गुलामगिरी,व्यापार, मनोरंजन अशी बरीच कारके महत्त्वाची ठरतात. मराठी आणि अन्य भाषा एक स्वतंत्र अभ्यासाचा विषय आहे पण सहज उल्लेख केला तर  -
१] जननी भाषा म्हणून संस्कृत,
२] धार्मिक चळवळींची भाषा म्हणून अर्धमागधी [जैन] व पाली [बौद्ध],
३] आक्रमक म्हणून
       अ] अरबांची अरबी,
       आ] इराण्याची फारसी,
         इ] पोर्तुगीजांची पोर्तुगीज     
४] अरबी,फारसी व भारतीय भाषांची मिश्रित उर्दू
५] मराठ्यांच्या वाढत्या विस्ताराने कन्नड, मलयालम, तमिळ,तेलुगु, उडिया,बंगाली, हिंदी, राजस्थानी, गुजराती इ.

 या भाषांचा मराठीशी आलेला, येत असलेला संबंध आपल्या रोजच्या जगण्याचा व भाषेचा व्यवहार बदलत असतात. यात सर्वात प्रमुख भाषा म्हणजे साहेबाची भाषा - इंग्रजी होय.

 आपली इच्छा असो वा नसो आज [किमान भारतात] तरी इंग्रजी भाषा जीवन जगण्यातला एक अनिवार्य टप्पा ठरत आहे. बहुभाषिक असणं एका विकसित व्यक्तिमत्त्वाचं लक्षण आहे. कोणतीही भाषा चार टप्प्यांनी आत्मसात करता येते.
१] श्रवण  - लक्षपूर्वक व समजून घेवून ऐकणे.
२] भाषण  - इतरांना समजेल असे अर्थपूर्ण बोलणे.
३] वाचन - समजून घेवून वाचणे.
४] लेखन - इतरांना समजेल असे लिहिणे.

इंग्रजीच्या संदर्भात आपण बर्याचदा व्याकरणाच्या पुस्तकापलीकडे जात नाही. आपली इंग्रजी एक व्याकरणाचे पुस्तक [ सर्वप्रसिध्द तर्खडकर आणि  रेन व मार्टीन (Wren & Martin) ] अन् एक बऱ्यापैकी शब्दकोश या दोन चाकावर चालत असते. यात गैर काही नाही. या [दोन] मजबूत पायामुळेच भारतीय लोक जगात सर्वात जास्त चांगले व शुद्ध इंग्रजी बोलणाऱ्यांपैकी एक मानले जातात. एक वेळ खुद्द इंग्रज चुकीचं बोलेल पण खरा भारतीय आंग्लभाषी कधीच चूक इंग्रजी बोलायचा नाही. यामुळे मातृभाषेप्रमाणे लालित्यपूर्ण इंग्रजी जरा मागे राहून जाते असे वाटते.

या स्तंभात इंग्रजी भाषेतील शब्दांचा खजिना शब्द-परिवार [Word Family]  या प्रकाराणे सजविण्याचा प्रयत्न केला जात आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा