पृष्ठे

रविवार, २० नोव्हेंबर, २०११

गबरू दोस्त

दुसऱ्या दिवशीही वाघोबाने नाकासमोरच्या माश्या चुकवताना मान हलवली व त्याच वेळी मातोश्री वाघीण बाईंची शेपटी चाबुकाप्रमाणे चालली अन् गुबगुबीत वाघोबा थेट अस्वल काकांच्या मधाच्या बरणीला धडकला. "अरे हो, हो सावकाश." अस्वल काकांनी त्याला सावरलं तोवर वाघ-वाघीण झेपा टाकत निघुन गेले.

वाघोबा उभा रहात होता तोच हांकचू हांकचू करत एक प्राणी उड्या मारतच आला अन् अचानक कोलांटी उडी मारून अस्वल काकांना धडकला. "शाबास गबरू आज फक्त एकदाच पडलास." अस्वल काकांनी डोळे मिचकावत म्हटलं व वाघोबाची ओळख करून दिली." गबरू हा तुझा नवा दोस्त वाघोबा आणि बरं का वाघोबा हा आमचा पहिला विद्यार्थी गबरू गाढवे."

"ये मित्रा गळाभेट करू " गबरू दोन पायावर उभा रहात म्हणाला.वाघोबानं त्याची गळाभेट टाळण्यासाठी झेप टाकली पण दोघे ही अंग न आवरून थेट अस्वल काकांच्या पोटावर धडकले."शाबास ! चांगली गुरुदक्षिणा देताय लाथा घालून " असं म्हणून अस्वल काकांनी दोघांना उठून बसवलं व नेहमीच्या सवयीनं दोघांना गुदगुल्या केल्या.मग काय त्या द्वाड पोरांनी त्यांनाही गुदगुल्या केल्या. अशी दंगामस्ती बराच वेळ चालली. इतकी की ते तिघेही हसून हसून तिथेच पसरले व तो दिवस संपला.

रात्री  वाघोबाला कुशीत घेवून त्याचं अंग चाटत वाघिणीनं विचारलं, "आज काय शिकवलं माझ्या बाळाला ?" एका दिवसातच बाळ हुशार झाला होता. तो म्हणाला," गुदगुल्या कशा कराव्यात व कशा करू नयेत."
" म्हणजे काय ?" " अगं आई , हा माझा पहिला धडा आहे." "असा का ?" म्हणून वाघोजीनी वाघोबाला गुदगुल्या करायला हात पुढं नेला. वाघोबा पटकन वाघिणीच्या मागे लपला व वाघोजीचा हात वाघिणीला गुदगुल्या करून गेला. सटाक करून वाघिणीची शेपटी वाघोजीच्या हातावर बसली "हा काय चावटपणा "वाघोजीनी  हसत म्हटलं, "बेटा धडा तर भलताच कठीण आहे." "झोपा आता." वाघिणीची डरकाळी गुफाघर हादरवून गेली पण तोवर वाघोबा गाढ झोपी गेला होता. 







कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा