पृष्ठे

सोमवार, २१ नोव्हेंबर, २०११

पुसती लक्ष्मणरेषा

सरत्या पावसाची भुरभूर तनामनाला भिजवत होती तरीही थंडावा काही मिळत नव्हता. नेहमीच्या गतीने जात होतो तरी पायातलं जडत्व मरणयातना देत होतं. पहाटतारा उगवण्यापुर्वी जायचं होतं दूर. खूप दूर. अनंतापार. माझी दत्तचित्त चेतना गेल्या काही रातींपासून प्रचंड अस्वस्थ झाली होती. आता असह्य झालं होतं. उर्मिलेला ते जाणवलं होतं पण तिनं काही विचारलं नाही. नेहमीप्रमाणे. आजची सांज एक गहन स्वस्थता देवून गेली. आता निर्णय पक्का झाला होता.

रामद्वारावरचा हा शेवटचा पहारा असणार होता. पहाऱ्यासाठी नेहमीच भांडणारा भरत आज कसा कोण जाणे एकदम तयार झाला. दुसरा प्रहर होईस्तोवर प्रकृती, नगर आणि राजकाज शांत झालं. नेहमीची शांतता असह्य होत होती. रामदादाचे डोळे माझ्या अस्तित्वानं अर्धोन्मिलीत झाले. अर्धा लक्ष्मण तेव्हांच मेला होता ज्यावेळी रामानं सीतेची लंकेत अग्निपरीक्षा घेतली होती. त्यावेळेपासून लक्ष्मणाचे ओठ अन् रामाचे डोळे परस्परांसाठी अर्धोन्मिलीत झाले.

नेहमीप्रमाणे  साष्टांग नमस्कार न करता मी गुडघे टेकून दोन्ही हात व कपाळ रामाच्या पायावर ठेवलं कारण आता निर्णय पक्का झाला होता. साष्टांग नमस्कार केला अन् पुन्हा त्या जुन्या रामप्रेमानं उसळी मारली तर ....  हा तर टाळायचाच होता. तरीही शेवटी डोळ्यांनी दगा दिलाच. अश्रूंच्या शरयूधारा रामचरणांना भिजवू लागल्या. पण नेहमीची लक्ष्मणवाणी खोल ह्रदयगर्भातून कपाळ टेकल्या वेदनेतून वर आली.

" दादा, आता आज्ञा द्यावी."  शेवटच्या हस्तस्पर्शानं शेवटची मागणी केली.

" तूही जाणार लक्ष्मणा  ? "  रामाच्या त्या दोन अश्रूंनी धनुष्य ठेवून राकट झालेल्या माझ्या खांद्यांना विचारलं.

सारं  बोलणं न बोलताच संपलं. मी उठलो. रामाच्या अश्रूंनी भिजलेला कंठा मंद उजेडात चमकला. प्राणप्रिया सीतेच्या वियोगानं झाडांना कवटाळून रडणारा राम मी पाहिला होता, शक्ती लागल्या लक्ष्मणाला मांडीवर घेवून रणांगणावर रडणारा राम मी पाहिला होता त्या `रडक्या` रामांनी मला आपल्या प्रेमात बांधून ठेवलं होतं पण आजचा हा अश्रूनयन राम मी स्वत:हून सोडून जात होतो.

रामाशिवाय मी जगूच शकत नव्हतो पण आता रामासोबत जगणं ही शक्य नव्हतं. जिच्या रामप्रेमाच्या प्रेरणेनं आजवर मी रामासोबत होतो ती रामप्रिया सीता ही आता नव्हती. आजवर ज्या लोकसेवेच्या निष्ठेनं राजकर्तव्यांचा  काटेरी सहवास सहन केला, ज्यांनी रामाला राम म्हणून जगू दिलं नाही,सीतेला सीता म्हणून जगू दिलं नाही त्यांच्यासाठी आता लक्ष्मणानं का जगावं ?

सीता  वहिनी गेली आणि मी  त्या वचनातून मुक्त झालो जे तिला वाल्मिकीच्या आश्रमात सोडताना दिलं होतं. अजून ही लख्ख आठवतंय, सीतेला वाल्मिकींच्या आश्रम सीमेवर सोडलं तेव्हा आभाळही रडत होतं.

"लक्ष्मणा रथ का थांबवला ?" या प्रश्नानं दाबून धरलेला माझा बांध फुटला. एक क्षण आणि तिच्या चेहऱ्यावरचं आश्चर्य मावळलं.

" पुन्हा एकदा 'राजा' राम !" आपलं गर्भार जडत्व सावरत ती एवढंच म्हणाली.

मी रथाचा ध्वजदंड धरून स्वत:ला सावरत होतो. सीतेनं माझ्या खांद्यावर हात ठेवला.

" मला आधार दे, लक्ष्मणा ! " वाणीची धार व हाताची पकड त्या सुकुमार शरीराला जुळत नव्हती. ही सीता माझ्यासाठी नवीन होती. मी शहारलो.

सावकाश रथातून उतरत ती म्हणाली," ही बेहद्द रामप्रेमाची फळं आहेत बाबा."

माझा हात हातात घेवून ती म्हणाली," आठवतंय का लक्ष्मणा, ती मारीच हाक ? परशुरामाला हरवणाऱ्या रामाची आसमंतात गर्जलेली ती आभासी हाक त्या मारीच्याची शेवटची मृगमरीचीका ठरली. अन् माझ्या हृदयानं तुझ्या चारित्र्यावर असूड फोडले त्या वेड्या रामाप्रेमानंच ना ! कधी कधी संस्कृतीचे संस्कार संहारास कारणीभूत होतात. तू नको म्हणाला होतास तरी मी भिक्षादानाच्या महान पुण्य प्रेमाला बळी पडून लक्ष्मणरेषा ओलांडली अन्  रामायण घडवून आणलं तेही प्रेमानंच ना ! आज पुन्हा त्या प्रेमानंच तुला मला एक वचन द्यावं लागेल बघ."

"माझ्या  मागे रामाची साथ सोडणार नाहीस ना ! तो खूप एकटा आहे रे ! आणि एक गुपित सांगू का ? रामाला सोडून सगळ्यांना सांग. सीतेपेक्षा ही लक्ष्मण रामाच्या खूप जवळ आहे रे !"

ही वेदना होती की काय मला कधीच कळलं नाही. मी भरल्या गळ्यानं म्हणालो," सीताराम हेच माझे प्राण,वहिनी !" तिचं तेव्हाचं भविष्य सूचक मंद स्मित मला आज उमगलं.

अंधाऱ्या चिखलात तिची पद्म पावलं उमटवत  जाता जाता  मात्र ती कडाडली ," आणि म्हणावं त्या महाबाहोला - ज्यानं ते महान शिवधनुष्य मोडून मला जिंकलं होतं - सीता ही एक क्षत्राणि आहे, जिनं त्याच शिवधनुष्याचा गाडा-घोडा करून आपले खेळ खेळले होते, तिच्यावर असं सामान्यांसारखं प्रेम करू नकोस. सोहेच्या क्षमतेने ही भूमी कन्या सीता सारं काही सहन करील पण असा लेचापेचा, कुंपणाआडून प्रेम करणारा  राम तिला बिलकुल आवडणार नाही."

सीता  गेली अन् रामातला `राम' गेला म्हणजे आता सीताही नाही आणि राम ही नाही मग लक्ष्मणाचं  अस्तित्व ते काय ?  मी निघालो. अनंताच्या प्रवासाला.

रामाच्या महालाबाहेर येवून मी उर्मिलेला एवढंच म्हणालो," मी जातो उर्मिला " तिनं माळता गजरा तसाच ठेवला. थंड दगडी पाउल वाटेवरच्या माझ्या पावलांनी राम, उर्मिला व अयोध्येचा निरोप घेतला. अथांग शरयूच्या प्रवाहानं मला अलगद कवेत घेतलं तेव्हा कोणतंही प्रेमळ अस्तित्व साक्षीला नव्हतं मला अडवून धरायला.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा