पृष्ठे

बुधवार, १६ नोव्हेंबर, २०११

काही नियम

आजकाल माणसांच्या भावना कधी दुखावतील याचा काही नेम नाही. त्यामुळे मोठे मोठे लोक, लेखक मंडळी या भावना नामक पदार्थास जरा वचकूनच असतात.आता आम्ही काही तसे लेखक बिखक नाही तरी लिहीत बिहीत असतो म्हणून हा स्पष्टीकरणाचा उपद्व्याप करत आहोत. आधीच काही नियम स्पष्टीकरण सांगितलेले बरे.

वाचकांसाठी  काही स्पष्टीकरणे -

१] लेखक कोणत्याही वेळी, कोणत्याही पूर्व सूचनेशिवाय  नियम बदलण्याचा सर्वाधिकार सुरक्षित ठेवून नियम लिहीत आहे.

२] लेखांत येणाऱ्या उदाहरण,दाखले यांचा काथ्याकुट करण्यापेक्षा त्यातील मूळ विचार,सिद्धांत यावर जास्त लक्ष द्यावे.

३] लेखक कोणत्याही विषयाचा तज्ञ नाही.त्यामुळे प्रत्येक बाबीत अचूकता,वैज्ञानिकता इ.चा जास्त आग्रह धरू नये.आंबे खावेत झाडे मोजू नयेत.

४] ब्लॉगचा मुख्य विषय / आधार  माणूस म्हणून जगणे , माणूस म्हणून कसे जगावे, तसे जगताना येणाऱ्या अडचणी व त्यावर उपाय इ. बाबींवर विचारमंथन करणे, आपले विचार लिहून ठेवणे व स्वत: तसे जगण्याचा प्रयत्न करणे हा आहे.

५] लेखक ना पूर्णपणे  योगी आहे ना पूर्णपणे  भोगी आहे पण योग व भोगावर जरूर लिहून ठेवू इच्छितो. नियतीशरण असहायपणे मध्यम मार्गाचा स्वीकार नव्हे तर वर्तमानाचा जसा आहे तसा स्वीकार करत आनंदाने जीवनमार्गावर चालताना समतापूर्वक प्रत्येक फुलाचा गंध घेत गुंजारव करण्याचा एक प्रयत्न म्हणजे हा ब्लॉग असेल.

६] बहुतांश लेखन ललित , कल्पनारम्य असेल पण इतरही विषयांचा रसास्वाद आवड व सवडीने घेतला जाईल.

७] शीर्षक व मूळ आधार थोडासा तात्विक,आध्यात्मिक वाटत असला तरी कोणताही विषय वर्ज्य नाही.

८] कृपया आपल्या भावना विना कारण दुखावून घेवू नये. जर एखादी गोष्ट पटली तर तिचा स्वीकार करावा न  पटली तर सोडून द्यावी.वादविवादाचे कारणच काय ? लेखक आपल्याला काहीही पटवून देवू इच्छित नाही ना त्याच्यासारखे वागण्याचा अतिरेकी आग्रह करतोय. विचार वाचा.समजले पटले तर जगा नाही तर विसरून जा. व्यर्थ चर्चा करू नये.

९] कोणतीही जाहिरात, स्वत:च्या ब्लॉगचे विवरण टिप्पणीमध्ये लिहू नये. "छान , खूप छान, असेच लिहीत राहा " इ.सामान्य टिप्पण्या लिहून ब्लॉग व इंटरनेटचे वजन वाढवू नये. तसेच खूप जास्तही लिहू नये. टिप्पणी म्हणजे ब्लॉगपोस्ट नव्हे हे लक्षात घ्यावे. विचार पटला तर तो जगा व इतर चार लोकांना सांगा आणि नाही पटला तर विसरून जा.

१०] भाषा समजण्याची जबाबदारी लेखकाची नाही. शक्यतो सामान्य,सहज,सरळ भाषेत लिहिण्याचा प्रयत्न केला जाईल पण लेखकीय उर्मी मारून [तथाकथित] सोप्या भाषेचा वापर केला जाणार नाही. 

११] 'माझिया 'जातीचा' मिळो मज कोणी | ' अशी इच्छा करून व 'माझिया 'जातीचा' मिळेल मज कोणी | ' अशी आशा धरून येथे लेखन केले जात आहे. ' तुमचिया जातीचा नसेन जर  मी ' व ' माझिया जातीचे नसाल जर तुम्ही ' तर बिघडले, बिघडेल कुठे, काय ? ' राहू सुखे आपुलिया जातीचे आपण गुण्या गोविंदाने | '


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा