पृष्ठे

मंगळवार, २४ जानेवारी, २०१२

प्राणभेदी वरदान

माणसाला खरं सुख दु:खाच्या जाणीवेत, सुखशोधाच्या अस्वस्थतेत मिळत असावं. म्हणजे दु:ख ते सुख म्हणून स्वीकारतानाच त्याचा नकार दाखवत रहायचं. असल्याच्या आनंदापेक्षा नसल्याच्या टोचणीमागे धावायचं.कुठून कुठपर्यंत न कळत. 

सगळ्यांसारखं माझं हे असं होतं असतं. जगान्त पराक्रम व त्यामुळं नाव हे असं खूप मोठं - दशरथ, महाराज दशरथ ! आजवरचा, त्रिभुवनातला, देवेन्द्रालाही मदत करणारा सर्वश्रेष्ठ योद्धा दशरथ ! सारी सुखं, सौंदर्यसुंदरीच्या रूपानं हात जोडून समोर उभी असताना मी असा गर्दगडद अंधाऱ्या रात्री एका जुनाट मचाणावर दगडी पुतळ्याच्या स्तब्धतेनं, जंगली चिरटाच्या चाव्यांनी बेजार होत, स्मशानातल्या वेताळासारखा स्वत:ला टांगून घेतल्यासारखा उभी रात्र घालवतोय कसल्या सुखाच्या प्रतीक्षेत ? माझं मलाच समजेनासं झालयं.

या भवभ्रमाच्या भोवऱ्यातही माझ्यातला शिकारी दक्ष आहे. पाऊस पडून गेल्यानं पानावरून गळत्या टीपटीपीनं नेमक्या आवाजाचा कानोसा घेणं कठीण झालंय पण त्या ताणानंच मी दुसऱ्या कुठल्या तरी टोचणीला विसरू शकत होतो. किमान तसा भास तरी निर्माण करून स्वत:ची फसवणूक करत होतो. पण त्या शिकाऱ्याला सतत ढुसण्या देणारे राजेपण, माणूसपण काही स्वस्थता मिळू देत नव्हते. उतार वयाची चाहूल लागलीय अन् तीन महाराण्या [अधिक बाकीचे ..... महाल] असूनही न मिळालेलं बापपण आणि एवढ्या पराक्रमी राज्याच्या उत्तराधिकाराचा प्रश्न एकाच वेळी भावनिक गुंतागुंत व राजकीय अस्वस्थता वाढवत आहेत.

राजाशिवाय राज्य म्हणजे वृक्षाशिवाय वेली असण्याचा असा माझा काळ अन् काळाच्या जबाबदाऱ्या. या जबाबदाऱ्याही मोठ्या खट्याळ असतात त्या मजबूत खांद्याचाच आधार शोधत फिरत असतात. एका वारुळातल्या अगणित मुंग्याप्रमाणेच जबाबदाऱ्याही मजबूत खांद्यावर दाटीवाटीनं लगडलेल्या असतात. मजबूत खांद्यावर जर जबाबदारी पार पाडण्यासाठीचं भान असणारं डोकं असलं तर मग झालंच !

 " बुडबुड बुडबुड" "सूंम्म्म्म्म्म्म्म्म खच् क" " आई गग्ग्ग्ग्ग्ग" क्रिया प्रतिक्रिया व प्रतिक्रियेवरची प्रतिक्रिया काही कळलंच नाही. शब्दभेदी धनुर्विद्येचा मी जागतिक धनुर्धर माझ्याच विचारात गुंगलो असताना पाणवठ्यावर बुडबुड असा आवाज ऐकताच माझ्या प्रतिक्षिप्त क्रिया संचालक यंत्रणेनं सरावानं बाण सोडला व  आई गग्ग्ग्ग्ग्ग ची कळ उठवून गेला. क्षणात मी उडी मारून आवाजाच्या दिशेनं धावलो. एक तरुण कळवळत होता. माझं क्षमापुराण मधेच थांबवून त्यानं म्हटलं," राजन, इथे जवळच एका पडक्या शिवमंदिरात माझे वृद्ध आई-बाप तहानेनं व्याकूळ होवून माझी वाट पहात आहेत. त्यांना एवढं पाणी द्या लवकर. अन् राजा आहे म्हणता तर त्यांची पुत्राप्रमाणे काळजी घ्या." कणभर चमकलेल्या विजेनं त्याच्या डोळ्यातली अपार वेदना अन् त्या निष्प्राण देहस्पर्शानं आलेली चेतनेची बधिरता कर्तव्यकर्माच्या भावनेनं गतिमान झाली. 

" बाळा, बोलत का नाहीस ?" चाहूल लागूनही भयाण शांतता त्या वृद्ध दंपतीस असह्य होवून बोलती झाली. मी हळूच पाण्याचं भांडं सरकवलं. " रागावलास ना ! रागव बेटा, जरूर रागव. तुझ्यासारख्या लक्षगुणी पोरानं तरी दुसऱ्या कोणावर रागवावं रे ! " आईबाप लागोपाठ बोलत होते. जणू एकच  महान कलाकार स्त्री-पुरुषाच्या वेगवेगळ्या आवाजात बोलत असावा.

 " आज आता तुला सांगितलंच पाहिजे सारं. दारिद्र्याच्या असह्य उन्हात पोळून निघताना घरावर गोकुळसुख छाया आयुष्याची संध्याकाळ होत आली तरी उगवलीच नाही बघ. कोणा एका तापसावर विश्वास ठेवून या निबिड अरण्यात आलो त्या भोळ्या शंकरावर पुत्रफळाच्या आशेने कठोर तपाची संततधार धरण्यासाठी. इथे जवळच एक पाणवठा आहे बघ. तिथूनच पाणी आणतोस ना तू तोच ! अन् शेजारचं तेच मचाण. श्वापदांपासून जीवंत राहण्यासाठी बांधलेलं. आता तितकं मजबूत आहे की नाही कुणास ठावूक. पण तेव्हा तरी मोठ्या प्रयासानं उभारलं होतं खरं. पुत्र झाला तर दर श्रावणातले सोमवार अभिषेक करायला इथंच येवू असा नवस करूनच येथेच कंदमुळे खात राहिलो बघ. हा वनवास स्वत:हून पत्करला होता. अपत्यप्राप्तीची आशा अपत्यप्राप्तीच्या वाटेतल्या साऱ्या दु:खांना सहन करायला लावते बघ."    

 "असा घुमा राहू नकोस रे राजा ! " मी दचकलो. मी गप्पच राहिलो. बोलणार तरी काय अन् कसे ? पण ते दोघं बोलतच राहिले. खूप वर्षांपासून साठलेलं गुज ते वृद्ध मायबाप आपल्या प्रियपुत्रापाशी उकलत होते. " बऱ्याच उशिरा, बऱ्याच आशेनं जन्मलेला तू आमच्या प्राणांचं बहिश्च रूपचं होतास. नवसाच्या नावाखाली आम्ही आमचं प्रेम - जे खरोखर दुरावण्याच्या भीतीचं निव्वळ दिखावू रूप होतं - तुझ्यावर थोपत राहिलो ज्यानं तुझ्या गुरुगृही जाण्याच्या इच्छांना बंदिस्त केलं. घरातचं तू बरंच काही शिकलास तरी ते पुरेसं कुठं होतं. हे कळूनही आम्ही मूक राहिलो.कारण थकलेले हातपाय, सुरकुतलेलं शरीर शारीर गरजांनाही थकवू शकत नाही ना ! श्रावणातल्या नवसाचा बाळ म्हणून श्रावण जो आपल्या सात्विक वृत्तीनं अकाली वृद्धत्वाने आपल्या वृद्ध आईबापांची मनोभावे सेवा करत आहे. जगानं हेवा करावा असं जगणं तू आम्हांला देतोयस. कळतंय आम्हांला एवढ्या रात्री पाणी आणणं किती कठीण आहे ते. एखादं श्वापद, कालसर्प टपून बसला असेल, पडल्या पावसानं बनवलेला गुडघाभर चिखल, उघड्या अंगाला बोचणारे चिरट अन् बोचरी थंडी किती अन् काय ! " ............... एक प्रदीर्घ उसासा जीवघेणी शांतता देवून गेला. 

 " एवढं सगळं कशासाठी तर तुझ्यासाठी दिल्या - घेतल्या आमच्या वचनासाठी. पण बाळा, आजचं हे शेवटचं बरं का ? आज तुला सोळावं लागलं. आपली ही तीर्थयात्रा आता थांबली हं ! आमची ही गात्रं आता खूप थकलीत रे ! कधीही हे  पिकलं पान आता गळून पडेल. पण तू असा बोलत का नाहीस. किती रागावशील बाळा ? बोल न रे !" चाचपडत्या हातानं भांडं लवंडलं अन् मला अंधारून आलं. भात्यातले सारे बाण खणखणत विखरून पडले.

 " कोण आहे ? कोण आहे तिथं ? बोल कोण आहे ? श्रावणा ! बाळा ! कुठं आहेस तू ?"  माझ्या कठोर खांद्यावर ती सुरकुतली पण मजबूत पकड रुतत होती. "आमचा बाळ कुठं आहे ? तू कोण आहेस ?"  "तुमचा .... तुमचा बाळ .... मी.... मी राजा ... " आयुष्यात पहिल्यांदा दशरथाची वाचा अडखळत होती. " मी राजा दशरथ शिकारीसाठी पाणवठ्यावर श्वापदांची वाट पहात होतो. इतक्यात तुमचा बाळ तेथे आला अन्  माझ्या शब्दभेदी बाणानं ......"

 " देवा ! " सारा आकांत नंतरच्या भयाण शांततेनं विस्फोटीत केला. इतकी असह्य तगमग त्या अंधुक उजेडात माझे प्राण कंठाशी आणत होती. "बाळा,बाळा" पुटपुटत म्हातारी प्राण बाहेर टाकण्यासाठी की आत धरून ठेवण्यासाठी सारं शरीर आखडत तगमगत, तडफडत होती. प्राणजात्या मुलाला दिलेल्या वचनाला जागूनही मी त्या वृद्ध मातापित्यांची पुत्राप्रमाणे काजळी घेऊ शकत नव्हतो. राजा म्हणून तर दूरच राहो.  

"मला क्षमा करा." माझा हात झिडकारत पत्नीच्या त्या निष्प्राण कुडीला कुरवाळत तो सुरकुतला आवाज शापवाणी बरसून गेला, " आमच्यासारखाच तूही राजा, असाच पुत्रवियोगानं तगमगत, तडफडत प्राण देशील ! " मस्तकावर वीज कोसळावी तसा अंतर्बाह्य हादरून गेलो मी. अन् म्हाताऱ्यानंही मान टाकली काही क्षणातच. तीन मृत्यू इतक्या लवकर, इतक्या जवळून माझ्याचमुळे. 

 पुढं काय केलं काय घडलं फारसं काही आठवतंच नाही. मृगया सुटली की सोडली कळलं नाही. राजकर्तव्य चालूच होती बोचणीच्या टोकावर. वसिष्ठांनी यज्ञ मांडला. बरंच समुपदेशन केलं. "शाप खरा व्हायला आधी पुत्र तर हवा. म्हणजे तो शाप नसून वरदान आहे राजन. दीर्घायुष्य व पुत्रप्राप्तीचा आशीर्वादच जणू ! "

 हळू हळू चित्तवृत्ती पालवल्या. मनवसंत पुन्हा बहरला. राम, लक्ष्मण, भरत अन् शत्रुघ्न तीन महालातले चार चंद्र माझ्या मनाला आपल्या बाललीलेनी रंजवू लागले. पण सल कायम होती. सुकुमार राम - लक्ष्मणाला विश्वामित्रासोबत धाडताना ती पुन्हा उफाळून वर आलीच. गुरुगृही जाण्याची परंपरा, जनमानस, मंत्रीगण,कैकयी, वसिष्ठ,विश्वामित्र, प्रत्यक्ष राम-लक्ष्मणाची इच्छा यामुळं मला मन आवरावं लागलं. तसा त्यांचा आश्रम जवळच होता. तरी मन खुरडतच होतं.


काळ जातच होता. जातच होता. अन् मन बेटं किंचित सुखावत होतं. पण ........... 

पण  आजची गोष्ट काही निराळीच होती. या राजकारणाच्या निमित्तानं ते प्राणभेदी वरदान आपली वेळ साधू पाहत होतं. राजाचं कर्तृत्त्व, कर्तव्य, प्रजेचा विकास व सुख-सुविधा यासाठी रामानं आकाशाला गवसणी घालणं गरजेचं होतं.त्याचं `रामपण` सिद्ध व्हायला दक्षिण-दक्षिणा मिळवायलाच हवी पण ती काळीजकातरी तगमग थांबत का नाही ? राजकारणातल्या नाटकातला मी एक नटसम्राटाची भूमिका वठवतोय की जीवनसंग्रामातला मी एक वठलेला बाप बनत चाललोय काही कळत नाही. हात पुन्हा पुन्हा छातीकडेच जातोय वाचा राम, राम याशिवाय कश्यातच रमत नाही. राजवैद्यांना नाडी, श्वास, डोळे, ऊर्ध्व लागत आहेत.

पण  माझे मलाच कळतंय की खरोखर प्राणच आता ऊर्ध्व लागले आहेत.
 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा